श्रीनाथलीलामृत - अध्याय ५ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमत् आदिनाथ जगादोध्दार । निष्प्रपंचा निर्विकारा । निर्द्वद्वा निःसंगा अगोचरा । परात्परा जगद्गुरु ॥१॥
तूं अहिल प्रकाश सनातना । ज्ञानाग्नि अज्ञानदहना । पूर्ण ब्रह्मा पुरातना पुराणपुरुषा सर्वाद्या ॥२॥
तूं अढळस्थ चिद्‍व्योमी । म्हणून योगी गगनगामी । तेथें होती ब्रह्माहमस्मि । अढळधामीं निवासी ॥३॥
पंचतत्त्वीं योगस्थिति । तेथें धारणेची ऊर्ध्वगति । पश्चिम दिशे गमन करिती । तेथे वस्ती तयांची ॥४॥
योग्याचे गगनी गमन । चातका परी अवलोकन । कीं जलज अवलोकी सूर्यकिरण । व्योमस्थान पाहाती ॥५॥
धन्य धन्य ते गुरुभक्ति । नव्याण्णव कोटि चक्रवर्ति । गोरक्ष उध्दरी तयांप्रति । इतर गणना नव्हेचि ॥६॥
अनेक तारिले नेणों किती । बहुत गेले याच पंथीं । सप्त चिरंजीवांची ख्याति । भुवनत्रयीं न समाये ॥७॥
परि नाथप्रतापें अगाध । चिरंजीव झाले असंक्य सिध्द । पावोनियां अक्षयपद । अभेदले स्वरुपी ॥८॥
भर्तृहरि गोपेंदु ज्ञानेश्वर । अद्यापि असती निरंतर । नाथसांप्रदाय महिमा थोर । शेष अशक्त वर्णितां ॥९॥
ते काळदंडा दंडिती । तेजास मृत्युजरा जाळिती । ते मृत्यूतें मारिती । ग्रास करिती कळिकाळाचा ॥१०॥
काळदंड उच्छेदून । चिरंजीव झाले कोण । विविध नामें करा श्रवण । हठप्रदीपिका श्लोक पैं ॥११॥

श्रीआदिनाथो मत्स्येंद्रः शारदानंदवैभवः । चौरंगीमीनगौरक्षविलेपाक्षबिलेशयाः ॥१॥
मंथारभैरवो योगी सिध्दबुध्दश्व कुक्कुटी । पौरंटकः सुरानंदः सिध्दिपादश्व चर्पटी ॥२॥
करणी पूज्यपादश्व बिल्वनाथो निरंजनः । कपाळी बिंदुनाथश्व काकचंडीश्वरोदयः ॥३॥
तथा सूक्ष्मप्रबुध्दौ च घोंडाचालि घंटिणी तथा । बालकी नागबोधश्व चंडः कापालिकस्तथा ॥४॥
इत्यादयो महासिध्दा हठयोगप्रभावतः । खंडयित्वा कालदंडं ब्रह्मांडे विचरंति ते ॥५॥


श्रीनाथादि मत्स्येंद्रनाथ । शारदानंद वैभवनाथ । चौरंगी मीन गोरक्षनाथ । विलेपाक्ष बिलेशय ॥१२॥
मंथारभैरव योगिनाथ । सिध्दबुध्द कुक्कुटिनाथ । पौरंटक सुरानंदनाथ । सिध्दिपाद चर्पटी ॥१३॥
करणी पूज्यपादनाथ । बिल्व आणि निरंजननाथ । कापालीसह बिंदुनाथ । काकचंडीश्वरोदय ॥१४॥
सूक्ष्मसह प्रबुध्दनाथ । घोंडाचाली घंटिणीनाथ । बालकी आणि नागबोधनाथ । चंडसह कापाली हा ॥१५॥
इत्यादि हे महासमर्थ । हठयोगी यथापंथ । काळदंड खंडिती स्वसामर्थ्य । स्वइच्छें विचरती ब्रह्मांडीं ॥१६॥
काळचक्र सर्वत्र माथा । परि दंड मारिती चक्रमाथा । तेचि साधिती परमार्थ । पिंडब्रह्मांडस्थितीतें ॥१७॥
उभयस्थळीं योगी विचरती । निमग्न स्वानंदी डुल्लती । जे आपपर नेणती । अगाध कीर्ति जयांची ॥१८॥
जयां आपपर नसेचि दुजें । ते कदा न घेती द्वैतवोझें । उन्मनीसि घेऊनि पैजें । स्वानंदभोग तुर्येसीं ॥१९॥
असो योगसाधन पाताळीं । गोरक्ष साध्य ते काळीं । नंतर येऊन भूमंडळी । चिरंजीव दशा पातळी ॥२०॥
न ढळे जयाचें निमिषानिमिष । अधोगती नसे श्वासोच्छास । पृथ्वीहून अंतरिक्ष असे । छायापात न होय ॥२१॥
सहज जातां पृथ्वीवरुन । जिकडे करिती अवलोकन । परीस चिंतामणी पाषाण । कृपादृष्टीं होताती ॥२२॥
पंचाशत्कोटि विस्तीर्ण । धरादेवीचें प्रमाण । अनेक बीजौषनिर्माण । तेथून प्रगट होतसे ॥२३॥
अष्टादश भार वनस्पति । स्त्रियारुपें सिध्दि तिष्ठति । शरण येऊन बध्दहस्तीं । आज्ञा इच्छिती स्वामीची ॥२४॥
पुनर्वसु महीमंडळीं । शीघ्र प्रगटती पायांतळीं । म्हण्दती आम्हां ये काळी । पादस्पर्श करावा ॥२५॥
सिध्दबरतंत्रादिक । त्यांस शापी कैलासनायक । ती शरण येऊनि सम्यक । उःशाप मागती शिवातें ॥२६॥
प्रसन्न होऊन पिनाकपाणि । उःशाप वदला वरदवाणी । तुम्हीं गोरक्षाश्रय करोनी । सिध्दि होईल तुमची ॥२७॥
चौदा विद्या चौसष्टी कळा । भार्याशेषें तिष्ठती सकळ । अनन्य भावें दीनदयाळा । चरणयुगळां वंदिती ॥२८॥
छप्पन्नकोटि महामंत्र । अनुकूळ होऊनि एकत्र । म्हणती धन्य हा मत्स्येंद्रपुत्र । योगावतंस विरुढला ॥२९॥
सर्वांतर समसाम्य सबाह्ये । पाहातें पाहाणेंही न राहे ।आब्रह्मस्तंभ कोंदलें आहे । रितें न राहे कदाही ॥३०॥
निंद्यवंद्यभेदभास । नाहीं जया आशापाश । स्वयेंचि झाला अविनाश । सर्वत्र असे व्याप्त जो ॥३१॥
काय पहावें काय त्यजावें । काय द्यावें काय घ्यावें । काय वदावें काय पुसावें । जरी असावें द्वैत तें ॥३२॥
तो सर्वांहूनि निराळा । निराळीं वर्ते सुखसोहळा । धन्य धन्य त्याच्या लीळा । त्याच्या कळा तो जाणें ॥३३॥
ऐसें चिन्ही ते मंडित । तेचि माझे सद्गुरुनाथ । त्यांचा मी छात्रांतर्गत । आदिनाथ प्रणामी ॥३४॥
इकडे कथा वर्तली कैसी । मत्स्येंद्र पातले जयश्रियेसीं । उभे ठाकले द्वाराशीं । सद्बोध गृहस्थ गृहासीं ॥३५॥
मत्स्येंद्र मुखी अलक्षोत्तरीं । शब्द सब्दोध सर्वातरीं । चातक मेघबिंदूपरी । हर्षे दर्शना पातली ॥३६॥
नित्यस्मृतीचे परिपाठीं । तो मत्स्येंद्रनाथ देखिले दृष्टीं । हर्षे वोसंडोनि पोटीं । चरणी मिठी घालित ॥३७॥
त्राहे त्राहे म्हणे गुरु दातारा । नेत्रीं वाहती विमलांबुधारा । नको जन्ममृत्युयेरझारा । जगदोद्धार सोडवी ॥३८॥
सहचरी सुवार्ता जाणवी मुखीं । विरुष गृहीं एकाएकीं । सद्वृत्ती सद्गद नेत्रोदकीं । पादपद्म चिंतित ॥३९॥
उठी माये तूं सत्वरी । वारंवार शब्दोत्तरीं । तीतें थापटोनि निजकरीं । म्हणे सावध जननीये ॥४०॥
इच्छिले काळीं लाभ साधे । तारी उदेलें जाण प्रारब्ध । चंद्रवृध्दीं सुख आगाध । उत्तरोत्तर होतसे ॥४१॥
विदेशीं रत्न अदृश्य झालें । तें आंगणीं प्रगटलें । भुजग्रंथीं निक्षेपिलें । संरक्षिलें ह्र्त्कोशीं ॥४२॥
भूमि स्पर्शोनियां भाळ । गृहस्थ वदे प्रसादफळ । प्राप्त केलें ते चिरकाळ । चिरंजीवा संरक्षी ॥४३॥
सद्वृत्ति लागूनि पायां । म्हणे कृपा करी सद्गुरुराया । व्यर्थ जन्म गेला वाया । परत्रसाधनावांचूनि ॥४४॥
ऐहिक दिधलें पुत्रफळ । आतां परत्र प्राप्तकाळ । म्हणोनि देखिलें चरणकमळ । स्वानंदसोहळे पुरवावे ॥४५॥
आजि आशीर्वादासरिसें । आजि लाधलें आपैसें । उत्कंठित होतों दर्शनोद्देशें । तो उत्साहदिवस आजिचा ॥४६॥
जो भवरोगें पीडिला प्राणी । त्यासीं भेटे गुरुदेव अश्विनी । त्रिपापें संतप्त गंगाजीवनीं । श्रांतिविश्रांत ज्यापरी ॥४७॥
प्रारब्धाचे अभ्युदयास । लक्ष्मी घर पुसोनि येतसे । चतुर्दिशे येतसे यश । कीर्तिघोष मिरवीत ॥४८॥
तैसें झालें आजि मातें । कृपा केली सद्गुरुनाथें । आळशावरी गंगाप्रवाह ते । स्नान करवी निजांगें ॥४९॥
पश्चात्ताप येऊनि पोटीं । सद्गदत दाटोनि कंठी । दृढ चरणी घालोनि मिठी । पदांगुष्ठपान आननीं ॥५०॥
हेलावला करुणासमुद्र । अवश्य वदती श्रीमत्स्येंद्र । तात्काळ दिधला उपदेशमंत्र । मस्तकीं हस्त ठेविला ॥५१॥
तों ती झाली समाधिस्थ । स्वस्वरुपीं उभयदंपत्य । तों मत्स्येंद्रनाथ झाले गुप्त । स्वेच्छागमन अविलंबे ॥५२॥
तये स्थळीं अकस्मात । गोरक्ष पातले फिरत फिरत । समाधि विसर्जूनि जागृत । द्वार उजूनि राखिलें ॥५३॥
सर्वातीत अलिप्तवेषी । उभा असे द्वाराश्रयेसीं । नेणों स्वदेशी कीं विदेशी । पूर्ववयेसी दिसतो ॥५४॥
ऐसें भासे माझे मनीं । देवदानवमानव श्रेणी । ऐसा नसे या त्रिभुवनीं । योगचिन्हीं मंडित ॥५५॥
जेवीं बाळाक बाळवेष । विशाळ भाळ सरळ डोळस । अतिसौंदर्यरुपें रुपस । नेत्रां आवेश येतसे ॥५६॥
परमात्मा वाटे हा केवळ । बाळभावें भावा स्त्रेहाळ । परिमळ रातोत्पळ । चरणयुगुळ आरक्त ॥५७॥
प्रकाश प्रगटे कोटिभानु । तेवि दैदीप्य सुप्रभ तनु । वत्स देखोनि धांवे धेनु । तैसी वृत्ति वेधली ॥५८॥
सन्निध जाऊन पाहे । तों गोरक्षनाथमूर्ति उभी आहे । कंठी कवळून उभय बाहे । निंबलोण उतरीत ॥५९॥
म्हणे आजिचा धन्य सुदिवस । भेटी झाली उभयतांस । स्वानंदरुतें उल्हास । अकस्मात पातले ॥६०॥
पुत्र पाचारोनि सत्वर । करविते झाले नमस्कार । गोरक्षमस्तकीं ठेवूनि कर । क्षेमालिंगन देतसे ॥६१॥
गृहस्थ वदे पुरले अर्थ । अवशिष्ट राहिले मनोरथ । ते पुरवीत नाथ समर्थ । कल्पतरुसारिखे ॥६२॥
यावरी वदती गोरक्ष वचन । तुम्हां घडलें सर्व साधन । आतां प्राप्तपदनिर्वाण । पावाल तुम्ही अक्षयी ॥६३॥
श्रौत स्मार्त वेदाध्ययन । नित्य नैमित्य अतिथिपूजन । गृहस्थाश्रम संपन्न । मग वैराग्य कासया ॥६४॥
गृहस्थ देतसे उत्तर । गृहीं न राहे वैराग्य स्थिर । विषयांध होऊनि निर्भर । आत्मविचार घडेना ॥६५॥
गृहीं प्रपंचीं घडे साधन । तरी कां सेविती गिरिकानन । दूधशर्करें रोगशमन । तरी निंबसेवन कां ॥६६॥
ऐका वचन सावधान । प्रपंचीं घडे सर्व साधन । श्रवण मनन यजन याजन । सत्समागम धरावा ॥६७॥
दुर्घट वोढवे जरी प्रसंग । तरी न सोडावा सत्संग । सत्संगतीनें भवभंग । निश्चयें सांग होतसे ॥६८॥
निश्चयानें महत्साधन । साधतसे आत्मानुसंधान । आत्मसाधनें निधान । नरदेहीं विख्यात प्रत्यक्ष ॥६९॥
म्हणाल प्रत्यय येईल कैसा । तरी मुख्य धरावी निराशा । निराशेनें वैराग्यदशा । येईल हा निश्चय ॥७०॥
वैराग्यदशा आली पाहे । मग देहींच होय विदेह । विदेह झालिया निर्भय । ईश्वरचि आपण ॥७१॥
ईश्वर झालिया आपण । उडोनि जाय दृश्यपण । दृश्य आपणा गेलिया जाण । अवघा पण ब्रह्मास्मि ॥७२॥
अहं ब्रह्मास्मि होतां पाही । मीतूंपण हा भेद नाहीं । स्वानंदाचे प्रेमडोहीं । निमग्न राहिले सर्वदा ॥७३॥
तों वार्ता फांकली नगरांत । पातले येथें गोरक्षनाथ । ऐकोनि धांवे नृपनाथ । पुत्रासवें येतसे ॥७४॥
पाहूं पातल्या पौरजथाटी जय जय शब्दबोभाटी । तेथें स्वानंदाची घनवृष्टि । आनंद पोटी न समाये ॥७५॥
सप्रेम नृपति लागे चरणीं । सन्मुख तिष्ठे बध्दपाणी । आनंदाश्रु सजलनयनीं । रोमांच स्फुरण सर्वांगीं ॥७६॥
राजपुत्रें करुन नमन । तंव गोरक्ष करिती कृपावलोकन । बहुत झाले समाधान । परस्परें करुनियां ॥७७॥
तंव श्रीगुरु वदती पाही । तव पुत्रनाम कळले नाहीं । राजा म्हणे आम्ही सर्वही । नाथप्रसाद वद्तसों ॥७८॥
नृपति म्हणे एक प्रार्थना । प्रार्थित असें दयाघना । तेचि पुरवावी वासना । विनवीत चरणां अनन्य ॥७९॥
पुरे राज्य नको आतां । परिणाम दुःख मूळ पाहतां । नाथदीक्षेची धरोनि आर्ता । शरण समर्था पातलों ॥८०॥
ऐक या दीक्षेचें काय सुख । घरोघरीं मागावी लागे भीक । देहप्रपंच करोनि राख । अरण्यांत फिरावें ॥८१॥
जन्मांतरीं अर्चिला पार्थिव । म्हणोनि झाला नर पार्थिव । तुज प्राप्त वैभव गौरव । त्यांत अपूर्व हें दिसे ॥८२॥
जन्मांतरीं आचरलासी तप । म्हणोनि झालासी सदैव नृप । कासया धरिसी अनुताप । योगसाक्षेप कासया ॥८३॥
वैभवें घडे तीर्थयात्रा । दान देणे घडे सत्पात्रा । अन्नशांति अन्नसत्रा । घालून सर्वत्रां संरक्षी ॥८४॥
बाहुपराक्रमेंकरुन । दुष्ट टाकावे निवटून । सुखी करावे गोब्राह्मण । हाचि बाहुजधर्म हा ॥८५॥
शरणागताची पाठी राखी । कीर्तिध्वज उभवी उभय लोकीं । इहपरसाधन लौकिकीं । कुळोध्दार करावा ॥८६॥
यावरी वदे नृपनाथ । प्रपंचीं न घडे परमार्थ । तरी सायास वायां व्यर्थ । प्रपंचीं अनर्थ होतसे ॥८७॥
मुख्य नांव प्रपंच याचें । तेथें सत्यत्व घडे कैंचे । असत्य मानूनि साचें । अनर्थाचें कारण हें ॥८८॥
मुळींच जन्म हा अमंगळ । रजस्वलेचा पाहतां विटाळ । पितृवीर्यमांसगोळ । वृध्दि पावे गर्भस्थ ॥८९॥
विष्ठामूत्राचा दाथर । जठराग्नीतें पचे दुस्तर । अधोमुखी यातना तीव्र । सोसून जन्मे अधोगती ॥९०॥
पाहतां जन्म अधोगती । ऊर्ध्वगति योगी पाहती । मग केवी घडे ऊर्ध्वगति । कृपा करिती तरी बरें ॥९१॥
चौर्‍यांशी लक्ष जन्मपंक्ति । मागें झाल्या पुढें होती । नाथानुग्रहें पुनरावृत्ति । नाही नाहीं त्रिवाचा ॥९२॥
जया नाथ अनुग्रह असे । तया यमाचा दंड सहसा नसे । काळ भय वागवीतसे । नाथप्रताप अगाध ॥९३॥
म्हणोनियां सद्गुरुनाथा । अनुग्रह द्यावा मज अनाथा । भाव सुदृढ नसे अन्यथा । चरणीं माथा ठेवितों ॥९४॥
शरणागतांचा अभिमानी । ऐसी कीर्ति विश्ववदनीं । माझी उपेक्षा केली झणी । अनाथनाथ मग कैंचा ॥९५॥
येरु म्हणती मार्ग कठिण । न पुसे वायां कदां जाण । आतांचि त्यागिसी रत्नभूषण । धुळी घालिसी मस्तकीं ॥९६॥
मुक्ततुराचि साजिरा । आतां त्यागिशी पडेल सैरा । रत्नमाळा तोडिशी सत्वरा । सुगंध उपचारा त्यागिशी ॥९७॥
उत्तरीवस्त्र फाडोनि गळां । आतांचि घालिसी तूं मेखळा । हा कां भिक्षेचा डोहळा । तुज झाला नेणवे ॥९८॥
तूं एकुलता एक मायेचा । काय भोग या योगाचा । भोगत्याग शतस्त्रियांचा । वियोग त्यांचा अयोग्य ॥९९॥
गज वाजि शिबिका रथ । राज्यत्याग करिसी व्यर्थ । नवयौवन स्त्रियांचा अनथ । परमार्थ किमर्थ करिसी तूं ॥१००॥
देश दुर्ग नगरें पट्टणें । त्यागिसी का मूर्खपणें । या योगाचें काय घेणें । भीक मागणें चुकेना ॥१॥
लोकेषणा वित्तेषणा । दारेषणा संकोच मना । काय करुन व्यर्थ वल्गना । अनुभव खूण वेगळी ॥२॥
यावरी नृप वदे वचन । स्त्रियामात्र मातृसमान । विषय विषवत्‍ धन वमन । सूकरविष्ठेसम राज्य ॥३॥
ध्रुवनिश्चय नाथें पाहोन । वद्ती सत्कीर्तीस पुसून । तिची आज्ञा शास्त्रप्रमाण । योगदीक्षाग्रहणार्थ ॥४॥
आज्ञा होतां ते अवसरीं । जाता झाला अंतःपुरीं । सत्कीर्ति नामें सुंदरी । पट्टराणी ज्येष्ठ ते ॥५॥
विरक्तदशा आरक्तनयनीं । विकारचेष्टा नसे चिन्हीं । अकस्मात म्हणे जननी । योगदीक्षे आज्ञापी ॥६॥
ऐसा शब्द ऐकोन श्रवणीं । दचकल्या मग नितंबिनी । कोटि कोसळल्या सौदामिनी । वज्रपात पै जैसा ॥७॥
हाहाःकार एकचि जाहला । वाटे ब्रह्मांडगोळ खचल । विरहअग्नि अति पेटला । वचनोक्ती सिंचिला सघृतीं ॥८॥
नृपवचन नवनीत उंडी । पतन झाली श्रवणकुंडी । विरहज्वाळामाळी धडाडी । श्वासधूम्र दाटला ॥९॥
उदासोत्तरीं वायुनळिके । श्रवणरंध्री येऊन धडके । धडाडिला दुःखपावक । राख झाली गात्रांची ॥११०॥
नृपती जळद घन वोळला । वैराग्यवातें झडपोनि नेला । चकोरवृंद तृषार्थिला । अति वोढवला प्रसंग ॥११॥
अहा प्रारब्ध कटकटा । कां टाकिलें हव्यवाटा । अरे विधातिया नष्टा । दुःख अदृष्टा निर्मिलें ॥१२॥
अहा विधि करिसी अविधि । रायासी योजिली विपरीतबुध्दि । वज्रलेख जो प्रारब्धी । न चुके जाण सर्वथा ॥१३॥
एकचि हाहाःकार वोढवला । काय दुःखर्णवचि फुटला । किंवा पर्वत कोसळला । अंगावरी आज पैं ॥१४॥
चंडवातफडत्कारें । कर्दळी पडे पृथ्वीवर । तेंवी राजललना एकसरें । भूमीं मुर्च्छित पडियेल्या ॥१५॥
कोणी मस्तक आपटिती । कोणी केश आक्रोशें तोडिती । क्लेशें आवेशें ताडिती । मस्तक स्तंभी सरोषें ॥१६॥
भळभळां वाहे रुधिर । प्रळयकाळ वोढवला थोर । दुःखार्णवाअवर्ती दुस्तर । किती विस्तार वदावा ॥१७॥
एका नेत्रधारा सतत । पयोधरलिंगा अभिषेकित । मोठा वोढवला अनर्थ । अपारसिंधूसारिखा ॥१८॥
एकी धावून धरी चरण । एक देत अलिंगन । एक करी अवलोकन । मुखें म्लान करुनी ॥१९॥
प्राणप्रिया प्राणनाथा । प्राणसख्या आत्मनाथा । त्यागोनि जासी योगपंथा । आलें उचिता हे माझ्या ॥१२०॥
धर्मे अर्थे च कामे च पाहीं । देवद्विज साक्षी अग्नीही । त्याचा परिणाम ऐसा नाहीं । विचारी कांही मानसीं ॥२२॥
स्त्रियेसंगें राहे स्वधर्म श्लाघ्य गृहस्था ऐश्वर्य । वीर्य शौर्य औदार्य । सर्व लाहे स्त्रीसंगें ॥२३॥
यावरी वदे नृपसत्तम । स्त्रीपुरुषादि भासभ्रम । आत्मा वेगळा सर्वोत्तम । तो पुरुष नपुंसक स्त्री नव्हे ॥२४॥
कोण कोणाची जनक जननी । कोण कोणाची प्रिय कामिनी । कोण कोणाची सुह्र्द भगिनी । गृहमंदिर कोणाचें ॥२५॥
कोण कोणाचा मित्र पुत्र । कोण कोणाची कन्या कलत्र । कोण कोणाचें कुळगोत्र । आत्मा स्वतंत्र वेगळा ॥२६॥
कोणाचें राज्य कोणाचें धन । व्यर्थ वाहती अभिमान । विषयासक्त सूकर श्वान । तेवीं रमती दिननिशी ॥२७॥
ऐश्वर्य संपत्ति राज्यदिक । हें सर्व भासे मज मायिक । वित्त आयुष्य क्षणिक । कांहीं विवेक स्मरेना ॥२८॥
मुळींच शरीर हें कुश्विळ । चर्मपोतडी नरक अमंगळ । हाडें नाडी श्लेष्मा निखिळ । शुध्द केवळ नसेचि ॥२९॥
अप्रयोजक निरर्थक देहे । साधन केलिइया काय नव्हे । जीवचि शिव होतसे पाहे । गुरुकृपा साह्य झालिया ॥१३०॥
सद्गुरुस गेलिया शरण । चुकवीतसे जन्ममरण । याचि देही प्रचिती जाण । प्रत्यक्ष प्रमाण कासया ॥३१॥
तुम्ही आपुला स्वार्थ पाहतां । मी तों जातसें निरंजनपंथा । तुम्ही सर्व मिळोनि माता । आज्ञा द्यावी मजप्रति ॥३२॥
स्त्रियांसीं पुसून सत्वर । निघता झाला नृपवर । रुदन करिती दीर्घस्वरें । कांता आकांता एकांतीं ॥३३॥
एक भूमीं भाळ आपटिती । मृत्तिका वदनी घालिती । एकी सक्रोध धुळी चर्चिती । बिटबिती देहाते ॥३४॥
एक म्हणती हा जोगडा । कोठोनि आला कानफाडा । आमुचा भ्रतार केला वेडा । मोहिनी घातली पै ॥३५॥
नृपें बुध्दि धरोनि गाढ । गोरक्षचरणीं मस्तक दृढ । ठेवूनि वदे मागेंपुढें । सबाह्य रोकडे गुरुरुप ॥३६॥
क्षणिक चित्त वित्त जीवित्व । जाणुनि पातलों शरण त्वरित । आता होऊनि समर्थ । दीक्षापंथ देइजे ॥३७॥
मनेंद्रिया काया वाचा । संकल्प केला सर्वस्वाचा । झालों अधिकारी योगाचा । निश्चय साचा धरोनी ॥३८॥
मुकुट कुंडलें अळंकार । फिरकाविलीं एकसरें । मन होऊन एकाग्र । अनुराग त्याग जाहला ॥३९॥
मग पदत्रयाचें पूजन । करिता जाहला नृपनंदन । मंगळ जननीचें आराधन । मंगळप्रद करीतसे ॥१४०॥
ज्ञानशलाका प्रज्वळित । श्रवणी घालोनि मुद्रा स्थापित । उन्मनीवस्त्रें आच्छादित । अगाध मंत्र दिधला ॥४१॥
भस्म चर्चूनि सर्वांगी । काषायभूषित भव्य योगी । समंत्रक देत शैली शृंगी । झोळी फावडी हस्तकीं ॥४२॥
अलक्षोच्चार करी वदनीं । सत्वार जाई मातृसदनीं । भिक्षा मागून ये क्षणीं । सोहंस्मरणीं असावें ॥४३॥
नाम ठेविले विजयनाथ । कुळ री आदिनाथा समर्थ । पंथ श्रेष्ठ नाथपंथ । धर्म निर्गुण बोलती ॥४४॥
घेऊनियां नाथदीक्षे । मग जातसें मातृभिक्षे । राज्यपदीं पुत्रा स्थापित । गुरु आज्ञे पैं ॥४५॥
सिंहासनीं विजयी पुत्र । मस्तकीं धरवी सुवर्णछत्र । मंत्री पाचारोनि सर्वत्र । अर्पिती ते राजमुद्रा ॥४६॥
इकडे राजालयीं येऊन । मातेस करुनियां नमन । अलक्ष शब्द उच्चारुन । भिक्षा मागे जननीतें ॥४७॥
पुत्राचें वैराग्य देखून । राजमाता करी रुदन । कां त्यागिसी राज्यसदन । तीतें वचन बोलत ॥४८॥
जननी तुझे उदरीं येऊन । माझें चुकले जन्ममरण । श्रीगोरक्षकृपेंकरुन । चिरंजीव जाहलों ॥४९॥
सकळ झाला कुळोध्दार । चुकला माझा यमप्रहार । ब्रह्मीभूत होऊनि शरीर । स्वयंब्रह्म जाहलों ॥१५०॥
झटकूनि निघे तो सत्वरगती । तेथूनि जातसे सहजस्थिती । तंव स्त्रिया धांवोनि येती । वेष्टून घेती तयातें ॥५१॥
त्यागून जासी प्राणनाथा । दुर्धर दंड कां आम्हांस अनाथा । मारुन जाई सत्वर आतां । नव्हे अन्यथा वाणी ही ॥५२॥
कांही अपराध नसोन । आमुचा घेऊं पाहसी प्राण । प्राणेश्वरा तुजवीण । शरण कोणा जावें पां ॥५३॥
वियोगदुःख दुर्धर । न साहती हे दुर्वारशर । विकळ पडती पृथ्वीवर । उभे शरीर टाकिती ॥५४॥
शरणागताचा करुनि घात । यांत साधिसी काय पुरुषार्थ । प्राणसख्याचें कठोर चित्त । केंवी झालें कळेना ॥५५॥
आम्हांवेगळा एक क्षण । निमिष जातसे युगासमान । ऐसें असतां ह्र्दय कठिण । कां झालें कळेना ॥५६॥
अखंड जयाची समाधिस्थिति । इकडे स्त्रिया विलाप करिती । देही नसे तया क्षिती । अव्यक्त व्यक्तीं वर्तत ॥५७॥
निःस्पृह जयाचें अंतःकरण । निर्विषय जयाचें मन । निःसंग निरभिमान । निर्द्वद्व अभेद विचरत ॥५८॥
स्त्रिया आंदोळती कुचसंलग्न । परी विकारी नुठे जयाचें मन । स्वरुपीं अखंड दंडायमान । विकार कोठें न होत ॥५९॥
भार्या वदती नृपवर्या । केशीं झाडूं तुझ्या पायां । रुष्ट होऊन कोप कायसा । प्राणविसाव्या गुणाब्धी ॥१६०॥
अरे भूपाळा जोगिया । आम्हां करी तूं जोगिणिया । सेवा करोनि राहुं पायां । वायां त्यागिसी आमुतें ॥६१॥
तिरस्कारोनि वदे वदनीं । भिक्षा आणावी सत्वर जननी । हाहाःकारोनियां भामिनी । रुदन करिती सर्वही ॥६२॥
निघे तेथूनि सत्वरगती । वेगीं पातला पुनरावृत्ती । नमस्कारोनि नाथमूर्ती । आज्ञा मागे पुढारीं ॥६३॥
गुरु वदती करी तीर्थाटण । अनेक सिध्दनाथदर्शन । घेऊन येई परतून । बदरिकाश्रमा पाठवूं ॥६४॥
आज्ञा वंदोनि निघे ते क्षणीं । रुदन करिती पौरजश्रेणी । पुत्र प्रधान मिळोनी । बोळवीत जातसे ॥६५॥
सब्दोधपुत्र नाथ । राजपुत्र नाथवरद । उभयप्रीती अभेद । एकोदरासारिखी ॥६६॥
असो इकडे गोरक्षमुनि । निघते झाले तेथूनि । सवें नाथवरदास घेऊनि । सब्दोधवृत्तीसमवेत ॥६७॥
तेथून निघाले सत्वर । उभविते झाले गोरक्षपुर । तेथें स्थापी वरदनृपवर । राज्य दिधलें तयातें ॥६८॥
सब्दोधसद्वृतिप्रति । नाथ सांगती करा वस्ती । राजयोग यथानिगुती । सांगते झाले समर्थ ॥६९॥
उभयतां म्हणती नाथासी । आम्ही राहूं अरण्यवासी । किंवा आज्ञा बदरिकाश्रमासीं । देईजे जी आमुतें ॥१७०॥
गोरक्ष वदती कासया साधन । व्रत तप नलगे पुरश्चरण । अंती पद निर्माण । प्राप्त होय निश्चयें ॥७१॥
अयोध्यासंनिध गोरक्षपुर । अद्यापि आहे क्षेत्र पवित्र । रजतताम्रमुद्रा सुंदर । गोरक्षनामें चालती ॥७२॥
नाथ पंचमोध्यायीं जाण । साक्षात्‍ सांब पंचवदन । कीं पंचायतनपूजन । श्रवणमननें घडे पैं ॥७३॥
पंचमतत्त्व जें निराळ । तेंचि योगियांचे विश्रांतिस्थळ । तेथीन भेदिती सूर्यमंडळ । अध्याय केवळ तो असे ॥७४॥
श्रीमत् आदिनाथलीला सुरस । भैरवपदीं आदिनाथवास । ग्रंथ पावन परमरहस्य । पंचमोध्यायीं वंदितों ॥१७५॥
॥ संमतिश्लोक ॥५॥ ओव्या ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP