अभंग २१
पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे । तेथें रुप आहे राघवाचें निराकार राम देखतां विश्राम । दुरी ठाके श्रम संसारींचा सर्वकाळ रामदर्शन होतसे । निर्गुणीं विश्वासें मन माझें संतसंगें घडे नि:संगाचा संग । राघवाचा योग रामदासीं
भावार्थ--
साध्या चर्मचक्षुंनी जे दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तेथेच राघवाचै रुप आहे. अशा निराकार रामाला पाहताच मनाला विश्राम मिळतो. संसारातील सर्व श्रम दूर निघून जातात. सर्व ठिकाणी सर्वकाळी केवळ रामच भरून राहिला आहे याची ष्रचिती येते व अशा रितीने रामदासांना रामाचा योग जुळून येतो.
अभंग २२
देव जवळी अंतरीं । भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन । जालें देवाचे दर्शन मूर्ति त्रैलोक्यीं संचली । द़ष्टि विश्वाची चुकली रामदासीं योग जाला । देहीं देव प्रगटला
भावार्थ--
देव अगदी आपल्या जवळ असतो, आपल्या अंतरी असतो पण जन्मभर त्याची भेट घडत नाही. एकदा भाग्य फळाला आले आणि संतांची भेट घडली, त्यांच्या मुळे देवाचे दर्शन झाले. देव स्वर्ग, प़ुथ्वी, पाताळ असा त्रैलोकी भरुन राहिला आहे पण जगाच्या नजर चुकीमुळे देवाचे दर्शन घडत नाही असे । सांगून संत रामदास म्हणतात की, रामाचा दास बनण्याचा योग आला आणि रामदासांच्या देहात देव प्रगट झाला.
अभंग २३
आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित । कोण करील गणित मज सर्वस्वे पाळिलें । प्रचितीने संभाळिलें माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं
भावार्थ--
या अभंगात संत रामदासांची अपराधीपणाची भावना व्यक्त झाली आहे. आपल्याला निश्चयी बुध्दी नाही, ज्यांचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित अन्याय घडले आहेत. वाईट करणी असूनही राघवाने सर्वस्वाने पालन केले आहे, अनेक वेळा सांभाळले आहे. अशी प्रचिती आली आहे. असे प्रांजलपणे सांगून, संत रामदास राम चरणीं लोटांगण घालून, आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागत आहेत.
अभंग २४
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें भक्तीची आवडी नाहीं निरंतर । कोरडे अंतर भावेविण माझें मीतूपण गेलें नाहीं देवा । काय करु ठेवा संचिताचा रामदास म्हणे पतिताचे उणे । पतितपावनें सांभाळावें
भावार्थ--
या अभंगात संत रामदास आपल्या मनात प्रभु रामचंद्राने वेगानं बदल घडवून आणावा अशी प्रार्थना करीत आहेत. आपले अंत:करण भक्तीभावाशिवाय अगदी कोरडे असून मनामध्ये निरंतर भक्तिची आवड निर्माण होत नाहीं. अहंकार, मीतूपणा यांनी मन ग्रासलेले आहे कारण पूर्व संचिताचा ठेवा भक्तिच्या आड येतो. संत रामदास म्हणतात की, पतितांच्या उणिवा लक्ष्यात घेवून पतितपावन श्री रामाने पतितांना पावन करावे, सांभाळावे.
अभंग २५
पतितपावना जानकीजीवना । वेगीमाझ्या मना पालटावें वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी । बोलतसें जगीं शब्दज्ञान देह हें कारणीं लावावें नावडे । आळस आवडे सर्वकाळ रामदास म्हणे लाज तुझी तुज । कोण पुसे मज अनाथासी
भावार्थ--
संत रामदास श्री रामाला प्रार्थना करतात की, त्यांनी आपले मन पालटून टाकावे. जगामध्ये कितीही शब्दज्ञान सांगत असलो तरी वैराग्याचा लवलेशही आपल्या अंगी नाही. देह सत्कारणी लावावा असे वाटत नाही. सदासर्वकाळ आळसच आवडतो. आपल्यातील हे सर्व दोष मान्य करून संत रामदास म्हणतात, भक्तांचे हे सर्व दोष स्वामिंच्या स्वामीपणाला कमीपणा आणणारे आहेत कारण आम्हा अनाथांना या साठी कोणी विचारणार नाही.
अभंग २६
पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें मन हे चंचळ न राहे निश्चळ । निरुपणीं पळ स्थिरावेना सांडुनियां ध्यान विषयचिंतन । करितसे मन आवरेना रामदास म्हणे कथा निरुपणे । मनाची लक्षणे जैसीं तैसीं
भावार्थ--
आपले मन हे अतिशय चंचल असून एक क्षणभरही शांत राहत नाही. धर्मग्रंथाच्या निरुपणात स्थिरावत नाही. ध्यान सोडून देऊन विषयांचे चिंतन करणाय्रा या मनाला कसे आवरावे हे समजत नाही. संत रामदास म्हणतात, कितीही कथा व निरूपणे ऐकली तरी मनाची लक्षणे बदलत नाही, जशीच्या तशीच राहतात. श्री रामाला शरण जावून, या चंचल मनाला पुर्णपणे बदलवून टाकण्याची ते विनंति करतात.
अभंग २७
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें मुखें बोले ज्ञान पोटीं अभिमान । पाहे परन्यून सर्वकाळ द्रुढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि । जाहलों मी क्रोधी अनावर रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान । सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां
भावार्थ--
मुखाने ज्ञानाच्या कितिही गोष्टी बोलत असलो तरी मन मात्र अहंकाराने भरलेले आहे. हे मन सतत इतरांचे न्यून शोधत असते. देहबुध्दी इतकी घट्ट आहे की, अंतःकरणाची शुध्दि होत नाही. क्रोध अनावर होतो. संत रामदास म्हणतात सर्व ब्रह्मज्ञान बोलुनही अहंकार व क्रोध यांना जिंकू शकत नाही. श्री रामाने त्वरित अज्ञानी मनाला पालटून टाकावे अशी कळकळीची विनंति करतात.
अभंग २८
पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों । संदेहीं पडलों मीपणाचें सदा खळखळ निर्गुणाची घडे । सगुण नावडे ज्ञानगर्वे रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणें अनंत पाहों जातां
भावार्थ--
या अभंगात संत रामदास पतितपावन रघूनायकला आपले मन परिवर्तन घडवून आणावे अशी विनंति करीत आहेत. ते म्हणतात की, खोट्या शब्दज्ञानाच्या भोवर्यात सापडून मन साशंक बनले आहे. निर्गुण भक्तीची ओढ वाटु लागली आहे. ज्ञानाचा गर्व वाटु लागल्याने सगुण भक्ती आवडेनाशी झाली आहे. ज्ञानाच्या फसव्या अहंकाराने रामभक्तीला परखा झालो आहे, पतित बनलो आहे.
अभंग २९
बिभिषण भावें शरण आला परी । तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी । तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा । कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले । मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं । परि तूं धनुर्धारी पाठीराखा तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें । नामीं सर्वभावें विश्वासलों सकळांहूनि साना रामदास जालों । परिवारेंसि आलो शरण तुज
भावार्थ--
श्री राम लंकेच्या समुद्र किनार्यावर येवून पोहचले आहेत ही बातमी रावण बंधू बिभिषण याला समजताच तो अत्यंत भक्तिभावाने त्यांना शरण गेला आणि प्रभू रामचंद्रांनी तात्काळ त्याला आश्वासन दिले परंतू हे भाग्य आपल्या वाट्याला कसे येणार असे विचारुन संत रामदास म्हणातात की, ते कलियुगातील रामदास आहेत. श्री रामाने वानरपती सुग्रीवाला आधी दर्शन सौख्य दिले आणि नंतर त्याने प्रभुरामाचे दास्य पत्करले. वानरसेनेने रामांसाठी स्वता:चे प्राण खर्ची घातले पण त्यांना हे माहिती होते की प्रभू रामा सारखा धनुर्धारी त्यांच्या पाठिशी आहे. संत रामदास म्हणतात श्री रामांचे रूप नजरेला पडले नसतांना सुध्दां केवळ त्यांच्या नामावर विश्वास ठेऊन आपण सर्वभावे श्री रामांना शरण गेलो. बिभीषण, सुग्रीव व वानरसेना यांच्या पेक्षा लीन होऊन रामदास झालो आणि सर्व परिवारासह रामांना शरण गेलो.
अभंग ३०
रामा तुझ्या स्वामीपणे । मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे । अंतर आमुचें तुजविण मज माया । नाहीं नाहीं रामराया आम्हां अनाथां कासयां । उपेक्षिसी तुज समुदाय दासांचा । परि आम्हां स्वामी कैंचा तुजसाठीं जिवलगाचा । संग सोडिला सगुण रघुनाथ मुद्दल । माझें हेंचि भांडवल
भावार्थ--
या अभंगात संत रामदास रामाची आळवणी करीत आहेत. रामाशिवाय दुसरे कुणी अंतरंगातील भावना जाणू शकत नाही. स्वामी रघुनाथा शिवाय मनापासून कुणावर माया कराविशी वाटत नाही. रामा सारखा स्वामी लाभल्यामुळे ब्रह्मांड मिळाल्या सारखे वाटते. असे असतांना श्री रामांनी आपल्या या एकनिष्ठ भक्तांची उपेक्षा करु नये अशी विनंति ते प्रभू रामचंद्रांना करतात. रामासाठी आपण अत्यंत जिवलग व्यक्तिंचा त्याग केला आहं. रामाची सगुण भक्ती हेच आपले एकमेव भांडवल आहे. रामांच्या सभोवताली दासांचा मोठा समुदाय आहे पण आम्हा भक्तांना श्री राम हे एकटेच स्वामी आहेत. रामांनी क्रुपा करुन या दासाला भव सागराच्या पार करावे अशी ईच्छा ते रामचरणी करीत आहेत.