अभंग ४१
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड । करिती पवाड विघ्नरुपें यालागीं सगुणभावें उपासना । करिजे निर्गुणा पावावया रामीरामदास विश्वासी सगुण । सगुणीं निर्गुण कळों आलें
भावार्थ--
ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव ब्रह्मज्ञानाआड विघ्न रूपाने अडथळे आणतात. संत रामदास म्हणतात, यासाठी निर्गुणाची उपासना करण्यापूर्वी आधी सगुणाची उपासना करावी. श्री रामाच्या सगुण रूपावर उदंड विश्वास असल्याने आपणास सगुण निर्गुण दोन्हीही कळून आले असे ते आवर्जून सांगतात.
अभंग-४२
बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ धेनु वत्साचेनि लागें । धांवें त्यांचे मागें मागें पक्षी वेंधतसे गगन । पिलांपाशी त्याचें मन मत्स्यआठवितां पाळी । कूर्म द्रुष्टीनें सांभाळी रामीरामदास म्हणे । मायाजाळाचीं लक्षणें
भावार्थ--
लहान मूल आईला ओळखत नाही पण ती मात्र सतत त्याचाच विचार करीत असते देव हा माते सारखाच दयाळू असून तो भक्तांचा सांभाळ करतो. गाय वासरासाठी मागे धावते पक्षी आकाशात उडतो पण त्याचे मन सतत घरट्यातील पिलापाशी असते मासे सतत स्मरण करून आपल्या पिलांचे पालन पोषण करतात तर कासव आपल्याi दृष्टीने पिलांचा सांभाळ करत असते संत रामदास म्हणतात की ही सगळी मायेची लक्षणे आहेत.
अभंग--४३
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं । रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी । रामे तेथे उडी टाकीयेली तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी । रामे तेथे उडी टाकियेली दासा पायी पडली देहबुध्दीबेडी । रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण । रामें भक्त कोण उपेक्षिले
भावार्थ--
श्री राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही, हे पटवून देण्यासाठी संत रामदास अनेक उदाहरणे देत आहेत. गजेंद्राचा पाय मगरीने पकडल्या मुळे तो मोठया संकटात सापडला. श्री रामाने तेथे धाव घेऊन त्याची सुटका केली. भक्त प्रल्हादाला छळत असलेल्या त्याच्या पित्यापासून सुटका करण्यासाठी विष्णु नरसिंह बनून आले. तेहतीस कोटी देवांची सुटका करण्यासाठी श्री रामांनी रावणाचा वध केला. रामदास म्हणतात, दासांच्या पायात जेव्हा देहबुध्दीची बेडी पडते ती सोडवण्यासाठी श्री राम तत्परतेने धाव घेतात, ते भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाहीत तेंव्हा भक्तांनी चिंताग्रस्त होऊन वणवण करू नये.
अभंग ४४
ध्यान करु जातां मन हरपलें । सगुणी जाहलें गुणातीत जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण । करीं चाप बाण शोभतसे रामरुपीं दृष्टि जाऊनी बैसली । सुखें सुखावली न्याहाळितां रामदास म्हणे लांचावलें मन । जेथें तेथें ध्यान दिसतसे
भावार्थ--
या अभंगात संत रामदास रामाचे ध्यान करीत असताना आलेल्या अनुभवाचे वर्णन करीत आहेत ते म्हणतात, ध्यान करीत असताना मनच हरपून गेले मनाचे मनपणच नाहिसे झाले, सत्व, रज, तम या गुणांच्या अतीत झाले. सर्वत्र चापबाणधारी रामरुपच भरुन राहिले आहे अशी जाणिव झाली. हे रामरुप बघताना मन सुखावले. या सुखासाठी मन लालचावले. जेथे तेथे हेच रामरुप, त्या शिवाय दुसरे काही दिसेनासे झाले.
अभंग--४६
सोयरे जिवलग मुरडती जेथूनी । राम तये स्थानीं जिवलग जीवातील जीव स्वजन राघव । माझा अंतर्भाव सर्व जाणे अनन्यशरण जावें तया एका । रामदास रंकाचिया स्वामी
भावार्थ--
आपले सगेसोयरे ज्या प्रसंगी आपली उपेक्षा करुन आपल्याला सोडून निघून जातात त्यावेळी केवळ राम हाच आपला जिवलग सखा असतो. आपल्या मनातील सर्व भावभावना जाणणारा, आपल्या जीवनाचा आधार, आपला स्वामी केवळ राम च आहे. संत रामदास म्हणतात की, राम रंकाचा स्वामी असून त्यांना अनन्य शरण जावे.
अभंग-४६
शिरीं आहे रामराज । औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामाविण । तो तो दु:खासी कारण शंकराचे हळाहळ । जेणें केलें सुशीतळ आम्हा तोचि तो रक्षिता । रामदासीं नाहीं चिंता
भावार्थ--
या अभंगात संत रामदास रामावरील अढळ विश्वास व्यत्त करतात. ते म्हणतात, रामराजा सारखा स्वामी असतांना अन्य उपायांची, औषधाची गरज नाही, कारण रामाच्या क्रुपे शिवाय केलेले सर्व प्रयत्न दु:खाचे कारण आहे. भगवान शंकराचे हळाहळ राम क्रुपेने शीतल बनले. आमचा रक्षणकर्ता रामा सारखा स्वामी असतांना रामदासांना कसलीच चिंता नाही.
अभंग-४७
ठकाराचें ठाण करीं चापबाण । माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो । माझें मनीं राहो सर्वकाळ मुखीं रामनाम चित्ती घनश्याम । होतसे विश्राम आठवितां रामदास म्हणे रामरुपावरीं । भावें मुक्ति चारी ओवाळीन
भावार्थ--
हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले श्री रामाचे रुप पाहातांच मन नि:संदेह बनते. हे रामरुप मनांत, रामाचे नाम मुखात, तोच घनश्याम अंतःकरणात आठवावा कीं ज्या मुळे मनाला पूर्ण विश्वाम, पूर्ण शांती मिळते. संत रामदास म्हणतात, रामरुपा वरुन आपण चारी मुक्ती ओवाळून टाकतो.
अभंग--४८
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत । तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक । पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ । जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं । रामदरुशणीं रामदास
भावार्थ--
संत रामदास म्हणतात, अगदी एकांतात, निवांतपणे कल्पनेच्या मनोराज्यात क्षणभर का होईना सुखेनैव बसून राघवाच्या विवेक विचारावर मन एकाग्र करावेसे वाटते. रामाचे स्वरुप अत्यंत कोमल, निर्मल आहे. तेथे खोट्या मायेचा मळ नाही. रामाचे दर्शन होताच मायेचा मळ निघून जातो आणि चित्त शुध्द होते.
अभंग--४९
भगवंताचे भक्तीसाठी । थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण । तेंचि भागीरथीचे स्नान सकळ लोकांचे भाषण । देवासाठीं संभाषण जें जें हरपलें सांडले । देवाविण कोठें गेलें जठराग्नीस अवदान । लोक म्हणती भोजन एकवीस सहस्त्र जप । होतो न करितां साक्षेप दास म्हणे मोठें चोज । देव सहजीं सहज
भावार्थ--
देवाच्या भक्तीसाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. भक्ती भावामध्ये शरीरावर आलेले स्वेदबिंदू हे जणू गंगेचे स्नान होय. आपल्या जवळच्या लोकांशी झालेले बोलणे हेच देवाशी केलेले संभाषण. आपल्याकडून जे हरवते, जे सांडते ते देवाकडेच जाते कारण देव सगळीकडे आहे सर्व माणसांमध्ये भरून राहिला आहे. पोटात भडकलेल्या भुकेच्या अग्निला घातलेले अन्नाचे इंधन म्हणजेच भोजन. आपण दिवसात जे २१००० श्वास घेतो तोच देवासाठी केलेला अजपा जप होय. संत रामदास म्हणतात हेच एक मोठे कौतुक आहे की, देव इतका सहजा-सहजी प्राप्त होतो.
अभंग--५०
वेधें भेदावें अंतर । भक्ति घडे तदनंतर मनासारखें चालावें । हेत जाणोनि बोलावें जनी आवडीचे जन । त्यांचे होताती सज्जन दास म्हणे निवडावें । लोक जाणोनियां घ्यावे
भावार्थ--
संत रामदास म्हणतात, देव भक्ता मधील अंतर कमी होते तेंव्हाच भक्ति निर्माण होते. आपल्या मना प्रमाणे वागावें आणि आपल्या व इतरांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे. सामान्य लोकांमध्ये जे लोकप्रिय होतात ते सज्जन मानले जातात. म्हणून लोकांची मने जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.