रामदासांचे अभंग - ८१ ते ९०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.
अभंग--८१
मनोगत जाणे सूत्र ॥जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी । ज्ञानें उदंड विवरी स्तुती कोणाची न करी । प्राणिमात्र लोभ करी कदा विश्वास मोडीना । कोणी माणूस तोडीना जनीं बहुतचि साहतो । कीर्तिरुपेचि राहतो दास म्हणे नव्हे दु:खी । आपण सुखी लोक सुखी
भावार्थ--
इतरांचे मनोगत जाणण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे तो जगत मित्र बनतो. तो नेहमी उद्योगात व ज्ञान उपासनेत दंग असतो. तो कुणाचीच स्तुती करीत नाही पण सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतो. तो स्वतःवरील विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. माणसांना कधीही तोडून टाकीत नाही. लोकांचे अनेक अपराध सहन करतो पण मनात दुःखाचा लवलेशही नसतो. तो स्वतः सुखी असतो व लोकांना सुखी करतो असे संत किर्तीरुपाने उरतात असे संत रामदास म्हणतात.
अभंग--८२
संतांची आकृति आणवेल युक्ती । कामक्रोधा शांति नये नये भागवतींचा भाव आणवेल आव । करणीचा स्वभाव नये नये रामदास म्हणे रामकृपेवांचोनी । बोलाऐसी करणी नये नये
भावार्थ--
सामान्य माणूस युक्ती प्रयुक्तिने संतांची नक्कल करू शकेल पण त्यामुळे काम व क्रोध जिंकण्याचे कौशल्य मिळवता येणार नाही. एखादी स्त्री देवीचे सोंग घेऊ शकेल पण भगवती सारखी करणी करणे शक्य नाही. संत रामदास म्हणतात, रामकृपेशिवाय माणुस देवत्वाला पोचू शकत नाही.
अभंग--८३
कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापाशीं गर्व कामा नये देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणीं जीव कैचा दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित्त नसावें सर्वकाळ
भावार्थ-- सर्व सजीव सृष्टी ही देवाची निर्मिती असून सर्व धन कुबेराचे आहे. येथे जिव केवळ निमित्तमात्र आहे असा संत रामदासांच्या विश्वास आहे. देवापाशी अहंकारानें वागू नये. चित्त निर्मल ठेवण्यासाठी मनाने सतत सावध असावे असा उपदेश संत रामदास करीत आहेत.
अभंग--८४
दृढ धरी मना जानकीजीवना । तेणें समाधाना पावशील पावशील निज स्वरुप आपुलें । जरी तें घडलें रामदास्य रामदास्य घडे बहुतां सुक्रुतें । कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें
भावार्थ--
जानकी जीवन श्रीरामाची मनामध्ये अढळ भक्ती निर्माण होईल तेव्हाच आपले जे निजरूप आत्माराम ते आपल्याला प्राप्त होईल. त्यातूनच अतीव समाधान मिळेल रामाचे दास्यत्व पूर्वसुकृतामुळे व पूर्वजांच्या पुण्याईने मिळते असे संत रामदास निष्ठापूर्वक सांगतात.
अभंग --८६
शरण जावें रामराया । पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार । विश्व होतसे काहार एक शोकें आक्रंदती । तेणें दुजे सुखी होती दास म्हणे सर्व दु:ख । रामाविण कैसे सुख
भावार्थ--
हे विश्व म्हणजे एक मोठा शिकारखाना आहे. येथे दुर्बळ जीव सबळ प्राण्यांचा आहार आहे. काही दुःखाने आक्रंदत असतात तेव्हां काही सुखाने जगतात. जन्म मरणाचा खेळ अव्याहत सुरू आहे. संत रामदास म्हणतात जन्म-मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी रामरायाला शरण जावे. रामाशिवाय यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही.
अभंग--८६
वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी । वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला । संचित खायाला पुण्य नाही भक्ति पांघरूण तें माझें सांडलें । मज ओसंडिलें संतजनीं रामदास म्हणे ऐसियाचें जिणें । सदा दैन्यवाणें रामेविण
भावार्थ--
आत्म बुद्धीचा सरळ मार्ग सोडून देहबुद्धीच्या वाकड्या मार्गाने जात असताना वैराग्याचा अग्नी विझून गेला आहे माया ममतेच्या थंडगार स्पर्शाने हुडहुडी भरलीआहे. पायात वासनेची बेडी पडली आहे. भक्तीचे उबदार वस्त्र हरवून गेले आहे. पूर्वसंचिताचा पुण्यरुपी ठेवा गाठीशी राहिला नाही. संतजनांच्या संगतीला पारखा झालो आहे. । संत रामदास म्हणतात अशा लोकांचे जीवन रामाशिवाय दैन्यवाणे आहे.
अभंग --८७
परिचयें जेथें अत्यंत संबंध । तेथें उठे खेद विक्ल्पाचा म्हणोनियां मना निस्प्रुह असावें सर्वथा नसावें एके ठायीं सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां । कोणे वेळे आतां समाधान अभ्यंतर पोळे राम विसंभतां । दास म्हणे आतां समाधान
भावार्थ--
अतिपरिचयाने घनिष्ठ संबंधजुळतो तेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतात, उद्वेग वाटतो, समाधान नाहीसे होते यासाठी माणसाने एका ठिकाणी फार काळ राहू नये व निरपेक्षपणे राहावे असे संत रामदास सुचवतात. श्रीरामाच्या विसर पडल्यामुळे पश्चात्तापाने अंतरंग पोळून निघतेंआणि मग चित्त शुध्द होऊन समाधान मिळतें.
अभंग--८९
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथे दृश्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत
भावार्थ--
दगडाचा देव करून त्याची भक्तिभावाने पूजा केली तोच देव अंतकरणात प्रकटला कारण जसा भाव तसा देव असे म्हणतात. संसाराचा दृश्य पसार्यात माणसाला गुंतवून देव अदृश्य झाला. संत रामदास म्हणतात भाव- भावनांच्या पलीकडे गेल्यास अनंत प्रकट होते.
अभंग--८९
एक लाभ सीतापती । दुजी संताची संगती लाभ नाहीं यावेगळा । थोर भक्तीचा सोहळा हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार
भावार्थ--
सीतापती श्रीरामांचा लाभ व संतांची संगती याशिवाय दुसरा अपूर्व लाभ नाही. हा भक्तीचा सोहळा आहे. संत रामदास म्हणतात, हरिकथेचे सतत श्रवण मनन व निरुपण तसेच दानधर्म व परोपकार हे भक्तीचे सार आहे.
अभंग--९० जो कां भगवंताचा दास । त्याने असावें उदास सदा श्रवण मनन । आणि इंद्रियदमन नानापरी बोधुनि जीवा । आपुला परमार्थ करावा आशा कोणाची न करावी । बुध्दि भगवंतीं लावावी रामदासीं पूर्णकाम । बुध्दि दिली हे श्रीरामे
भावार्थ-- या अभंगात संत रामदास भगवंताचा दास कसा असावा याचे विवेचन करीत आहेत. आशा-अपेक्षा, हवेसे नकोसे, याबाबतीत उदासीन असावा. सतत हरि कथा श्रवण मनन करून इंद्रियांचे दमन करावे. कोणाकडूनही कसलीही आशा, अभिलाषा नसावी. आपल्या सार्या वृत्ती भगवंताकडे लावाव्यात. दिलेल्या बुध्दीचा उपयोग करून पूर्णकाम, समाधानी बनावे.
N/A
References : N/A
Last Updated : March 11, 2023
TOP