रामदासांचे अभंग - २४१ ते २५०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग---२४१

कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ॥ स्वप्न सत्यचि वाटलें । दृढ जीवेसीं धरिलें ॥ अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ॥ नानि मंदिरें सुंदरे । दिव्यांबरें मनोहरें ॥ जीव सुखें सुखावला । थोर आनंद भासला ॥ रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ॥

भावार्थ---

माणसाचे मन सतत कल्पनांच्या भरारी घेण्यांत रममाण होत असते, स्वप्न हेच सत्य समजून तो त्याला घट्ट कवटाळून धरतो.   हा सगळा मायेचा खेळ तो खरा आहे असे समजतो. अनेक भव्य, दिव्य, सुंदर मंदिरें त्याच्या मनाला मोह घालतात, जीवाला सुखावतात, खूप आनंद देतात. संत रामदास म्हणतात, हा केवळ देहाचा आनंद असून तो नश्वर आहे, स्वप्ना सारखा काल्पनिक आहे.

अभंग---२४२

नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागीं जालां कासाविस कासाविस जाला प्रपंच करितां । सर्वकाळ चिंता प्रपंचाची प्रपंचाची चिंता करितांचि मेला । तो काय देवाला उपकार उपकार जाला सर्व ज्यां लागोनि । ते गेलीं मरोनि पाहतसे पहातसे पुढें आपणहि मेला । देवासि चुकला जन्मवरी

भावार्थ---

सर्वसामान्यपणे माणुस सतत प्रपंचाची चिंता करीत असतो, प्रपंच्याच्या काळजीने त्याचा जीव कासाविस होतो. त्या मुळे तो देवाला पुजून नवस बोलतो. देव नवसाला पावावा या लोभामुळे काकुळतिला येतो आणि प्रपंचाची चिंता करता करता मरून जातो, शेवटी तो प्रपंचाला व परमार्थाला दोन्हीला पारखा होतो.  संत रामदास म्हणतात, प्रपंचाचा लोभ सोडून सर्वभावे देवाची भक्ती करून, सर्व भाव देवावर सोपवल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतां येईल.

अभंग---२४३

कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये ॥ देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे देता देवविता नेता नेवविता । कर्ता करविता जीवा नव्हे ॥

निमित्ताचा धणी केला असे प्राणी  ।

पाहतां निर्वाणीं जीव कैचा ॥ लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण देवाची उरी नाहीं ॥ दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित नसावे सर्वकाळ ॥

भावार्थ---

देव सर्व घटनांचा कर्ता असून त्यानेच हा सर्व विश्व पसारा निर्माण केला आहे तेव्हां आपण गर्व करणे योग्य नाही. आपला देह देवाचा असून धनसंपत्ती कुबेराची आहे.  देव सारे देणारा, नेणारा आणि करविणारा आहे. मनुष्य प्राणी केवळ निमित्तमात्र आहे.  लक्षुमी व सर्व सत्ता देवाची असून देवाशिवाय जीवाचे कांहीं नाही या साठी संत रामदास सांगतात कीं, आपण केव्हांही मनाने खिन्न न होतां सावधचित्त असावें.  

अभंग---२४४

नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ॥ बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ॥ जे जे म्हणती मी शक्त । ते ते जाहले अशक्त ॥ रामदास सांगे वाट । कैसा होईल शेवट ॥

भावार्थ---

संत रामदास सांगतात, भविष्यातील सर्व घटना दैवाधीन आहेत.  त्यांचा अभिमान धरु नये.  खूप धन संपत्तीने धनिक भुलून जातात परंतू ती नश्वर असल्याने कालांतराने विनाश पावते.  जे स्वता:ला शक्तीशाली समजतात ते शक्तीहीन होऊन लयास जातात,

अभंग---२४५

अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ कां मरावें घोकुनियां ॥ घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें । अर्थरूप राहे होउनियां ॥ होउनियां अर्थ सार्थक करावें । रामदास भावें सांगतसे ॥

भावार्थ---

पसंत रामदास सांगतात, अभंगातिल शब्दांचे अर्थ समजून न घेतां केवळ घोकून पाठांतर करण्याचे सारे श्रम फुकट जातात.  कवनातील अर्थाशी एकरूप होऊन पाठ केले तर त्याचे सार्थक होते, त्यात सांगितलेला भाव जीवनांत उतरतो आणि जीवाचे कल्याण होते.  

अभंग---२४६

माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ॥ घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ॥ विषयवल्ली अमरवल्ली । अवघीं देवेचि निर्मिली ॥ अवघें सृष्टीचें लगट । करुं नये कीं सगट ॥ अवघें सगट सारिखेंची । वाट मोडली साधनाची ॥ आवघेचि देवे केलें । जें मानेल तेंचि घ्यावें ॥ दास म्हणे हरिजन । धन्य जाणते सज्जन ॥

भावार्थ---

पाण्यामध्ये पोहतांना भोपळा बांधून पाण्यांत उतरल्यास बुडण्याची भिती नसते, पण त्या ऐवजी शिळा बांधली तर पोहणारा शिळेसह पाण्यांत बुडून जाणार या साठी ज्या कामासाठी ज्या गोष्टीचा उपयोग करणे योग्य त्यांचाच उपयोग करावा, अयोग्य गोष्टींचा त्याग करावा. विषवल्ली (जी सेवन केल्यानंतर तात्काळ मृत्यु येतो)व अमरवल्ली ( जिच्यामुळे अमरत्व प्राप्त होते) या दोन्हीही निसर्गनिर्मित आहेत परंतू त्यांचा उपयोग सरसकट करता येत नाही. जे आपल्याला मानवेल तेच स्विकारावे असे सांगून संत रामदास म्हणतात, संत सज्जन धन्य होत ते आपल्या हिताचे असेल ते च करायला सांगतात.

अभंग---२४७

त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ॥ तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ॥ जें या विश्वजनां उपयोगी आलें । बहुतांचें जालें समाधान ॥ रामीरामदासीं राघवीं विश्वास । तेणें गर्भवास दुरी ठेला ॥

भावार्थ---

त्रिभुवन(स्वर्ग, पृथ्वी, पाताळ ) या तिन्ही भुवनांचे सार जे वेदामध्ये स्पष्ट केले आहे ते संत सामान्य लोकांना सांगतात, आपण ते खोटे आहे असे मानू नये कारण ते ज्ञान विश्वतील अनेक लोकांना उपयोगी आले आहे, त्या मुळे अनेकांचे समाधान झाले आहे. संत रामदास म्हणतात, आपला राघवावर दृढ विश्वास आहे कारण श्री रामाच्या कृपाप्रसादामुळेच आपली जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली.  

अभंग---२४८

वेधें बोधावें अंतर । भक्ति घडे तदनंतर ॥ मनासारिखें चालावें । हेत जाणोनि बोलावें ॥ जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ॥ बरें परिक्षावें जनां । अवघें सगट पिटावेना ॥ दास म्हणे निवडावे । लोक जाणोनियां घ्यावे ॥

भावार्थ---

संत रामदास या अभंगात लोकनेत्याने कसे आचरण ठेवावे या विषयी मार्गदर्शन करीत आहेत.  अनेक लोकांचे अंतरंग समजून घ्यावे, त्या नंतर लोक भक्तिमार्गाला लागतात. लोकांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे, त्यांच्या मनाप्रमाणे वागावे. लोकांना प्रिय असलेले नेतेच लोक संत सज्जन म्हणून स्विकारतात. सरसकट सर्व माणसे सारखी नसतात तेव्हां लोकांना समजून घेऊन योग्य माणसांची निवड करावी.

अभंग---२४९

एक उपासना धरीं । भक्ति भावें त्याची करीं ॥ तेणें संशय तुटती । पूर्वगुण पालटती ॥ सर्व नश्वर जाणोन वृत्ति करी उदासीन ॥ सत्य वस्तूच साचार । त्याचा करावा विचार ॥ त्यागोनियां अनर्गळ । सदा असावें निर्मळ ॥ ध्याने आवरावें मन । आणि इंद्रियदमन ॥ अखंड वाचे रामनाम । स्नान संध्या नित्यनेम ॥ दास म्हणे सर्वभाव । जेथे भाव तेथें देव ॥

भावार्थ---

या अभंगात संत रामदास साधकांना मार्गदर्शन करीत आहेत.  आपले एक उपास्य दैवत ठरवून भक्तिभावाने त्याची उपासना करावी.  त्या मुळे मनातिल सर्व संशयाचे निरसन होते आणि आपले पूर्वगुण पालटतात.  केवळ ईश्वर हीच सत्य वस्तू असून बाकी सर्व विनाशी आहे, याचा विचार करून आपली वृत्ति उदासीन करावी (मोह, माया, राग, लोभ यांचा त्याग करावा.  )समाजांत अमान्य असलेल्या (अनर्गळ ) गोष्टींचा त्याग करावा, मनानें निर्मळ असावे.  इंद्रिये ताब्यांत ठेवून ध्यानमार्गाने मनावर ताबा मिळवावा.  स्नानसंध्या नित्यनेमाने करावी आणि वाचेने अखंड रामनामाचा जप करावा.  जेथें भक्तिभाव तेथे देव असून बाकी सर्व फापट पसारा आहे असे समजून त्याचा त्याग करावा.  

अभंग---२५०

दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ॥ बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ॥ हटानें हट वळावें । मिळतां मिळणी फावें ॥ सुशब्दे माणुस जोडें । कुशब्दे अंतर मोडें ॥ प्रीतीनें प्रीतीच लागे । विकल्पें अंतर भंगें ॥ सेवके दास्य करावें । राघवें प्रसन्न व्हावें ॥

भावार्थ---

चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट असते हा कर्मफळाचा सनातन सिध्दांत सागून संत रामदास म्हणतात, दु:खानें दु:ख आणि सुख दिल्यानें सुख वाढते.  दुष्ट लोकांकडून दुष्टांना वठणीवर आणावें आणि चांगल्या लोकांना सुशब्दांनी आपलेसे करावें.  प्रेमळपणे प्रेमळांना जिंकावें.  संशयामुळे मने दुखावली जातात म्हणुन मनामध्यें विकल्प नसावा.  श्रीरामाचा दास बनून राघवाचे दास्य करावें आणि राघवाने प्रसन्न होऊन कृपा करावी.  

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP