रामदासांचे अभंग - २०१ ते २१०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.
अभंग---२०१
नांव मारुतीचे घ्यावें । पुढे पाऊल टाकावें अवघा मुहूर्त शकून । हृदयीं मारुतीचे ध्यान जिकडे जिकडे जाती भक्त । पाठीं जाय हनुमंत राम उपासना करी । मारुती नांदे त्यांचे घरीं दास म्हणे ऐसें करा । मारुती हृदयीं धरा
भावार्थ---
मनामध्ये मारुतीचे सतत ध्यान लागलेलें असेल तर शुभभशुभ शकून पाहाण्याची गरजच नाही. मारुतीचे नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरवात करण्यासाठी पाऊल पुढे टाकावें कारण हनुमंताचे भक्त जेथेजेथे जातात तेथेतेथे हनुमंत पाठिराखा असतो. रामाची उपासना करणार्या भक्तांच्या घरी मारुतीरायाचा सतत वास असतो. संत रामदास भक्तांना अत्यंत कळकळीने उपदेश करीत आहेत की, त्यांनी सतत मारुतीचे ध्यान करावें.
अभंग---२०२
येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ॥ तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ॥ तुजवांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ॥ नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ॥
भावार्थ---
संत रामदास अत्यंत चिंतातुर मनाने हनुमंताची वाट बघत आहेत. आपण संकटांत सापडलो असून दसरा कोणिही रक्षण करणारा नाही, अशा वेळीं उशीर न करतां अंजनीसुताने धाऊन यावे आणि आपला प्राणसखा असलेल्या हनुमंतांनी आपणास तातडीने भेटावें अशी कळकळीची विनंती संत रामदास करीत आहेत.
अभंग---२०३
कष्टी झाला जीव केली आठवण । पावलें किराण मारुतीचें संसारसागरीं आकांत वाटला । भुभु:कार केला मारुतीनें मज नाही कोणी मारुती वांचोनी । चिंतिता निर्वाणीं उडी घाली माझे जिणें माझ्या मारुतीं लागलें । तेणें माझें केले समाधान उल्हासले मन देखोनि स्वरूप । दास म्हणे रूप राघवाचें
भावार्थ---
संत रामदास या अभंगात म्हणतात, जीव कष्टी झाल्यानें मारुतीची आठवण झाली आणि आनंदाची गोष्ट अशी की, आठवण होतांच मारुतीनें उड्डाण केले. संसारसागरांत माजलेला आकांत पाहून मारुतीने मुखानें प्रचंड आवाज केला. आपणास मारुती शिवाय कोणी तारणारा नाही, निर्वाणिच्या (संकटाच्या अंतिम क्षणीं )मारुतिचे स्मरण करतांच तो धावत येऊन रक्षण करतो. आपले सारे जीवन मारुतिला अर्पण केले की, मन निश्चिंत होऊन मनाचे समाधान होते. राघवाच्या दासाचे स्वरूप पाहून मन उल्हसित( आनंदित )होते.
अभंग---२०४
मेरूचीया माथां देऊनिया पाव ।
जात असे राव कैलासींचा
कैलासींचा राव अक्रावा क्षोभला । देशधडी केला लंकानाथ लंकेच्या चोहटा मांडियेला खेळ । आगीचे कल्लोळ घरोघरीं जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या जानकीचा शोक दुरी दुरावला । यशवंत जाला निजदास
भावार्थ---
मेरू पर्वताच्या शिखरावर निवास करणारा शिवशंकर(कैलासींचा राणा ) अत्यंत क्रोधायमान झाला. हा अकरावा रूद्र मारूतिच्या रुपानें प्रकट झाला आणि त्याने लंकानाथ रावणाला देशोधडीला लावलें. त्याने लंकेमध्यें उघडपणे खेळ मांडला, घरोघरी अग्नीच्या ज्वाळांनी कहर केला. घरें सुंदर मंदिरें जळून खाक झाली. जानकीचा कैवारी बनून त्याने जानकीचा शोक दूर केला. रामाचा दास हनुमान यशवंत झाला.
अभंग---२०५
पावावया रघुनाथ । जया मनीं वाटे आर्त । तेणें घ्यावा हनुमंत । करील भेटी हनुमंत मी नमी । मज भेटविलें रामी । विघ्नांचिया कोटी श्रेणी । अंतरोनी राम उपासकांवरी । अतिप्रेम पडिभरी । होऊनिया कैवारी । निवारी दु:ख रामीरामदासीं श्रेष्ठ । सिध्दसिध्दासी वरिष्ठ । भवाचा भरियेला घोंट । स्मरणमात्रें
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, ज्यांच्या मनामध्ये रामभेटीची उत्कट आर्तता असेल त्यांनी रघुनाथाची कृपा होण्यसाठी हनुमंताची उपासना करावी. आपण हनुमंताची विनवणी केली आणि हनुमंतांनी रामाची भेट घडवली, त्या मध्ये आलेली सर्व विघ्ने निवारून हनुमंतांनी रामभेट घडवून आणली. राम उपासकांवरील अतिप्रेमामुळे त्यांचा कैवारी बनून हनुमंत त्यांची दु:खे निवारण करतो. रामदासांमधील सर्वश्रेष्ठ आणि सिध्दांमध्ये वरिष्ठ सिध्द अशा हनुमंताचे केवळ स्मरण केल्यानें संसार तापापासून सुटका होते.
अभंग---२०६
मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें तुम्ही पहा हो मारुती । रामभक्तांचा सारथी देव अंजनीनंदन । रामदासी केलें ध्यान
भावार्थ---
मारुती हा रामाचा मुख्य प्राण असून त्याची पूजा करतांच रामदर्शन घडलें. संत रामदास म्हणतात, भाविकांनी मारुतीचे दर्शन घ्यावे कारण तो रामभक्तांचा सारथी आहे. त्या अंजनीनंदन मारुतीचे आपण सतत ध्यान करतो.
अभंग---२०७
कपिकुळाचें भूषण । चित्त रामाचें तोषण धन्य साधू हा हनुमंत । ज्ञान वैराग्य सुमंत रामरंगीं रंगे चित्त । अखंडित सावचित्त दास म्हणे मी लेकरूं । विस्तारवी बोधांकूरू
भावार्थ---
वानरकुळाचे भूषण असलेल्या हनुमन्ताचे चित्त सतत श्रीरामाला प्रसन्न करण्यांत मग्न असते. ज्ञान, वैराग्य आणि सुबुध्दी असलेला हा हनुमंत एक साधुपुरुष आहे. तो सतत सावधान राहून आपले चित्त जराही विचलित होऊं न देता रामभजनांत रंगून जातो. संत रामदास म्हणतात, आपण हनुमंताचे लेकरु असून त्यांच्या उपदेशाचा विस्तार (प्रसार ) करतो.
अभंग---२०८
पंढरिऐसें तिन्हीं ताळीं । क्षेत्र नाहीं भूमंडळीं दुरूनि देखतां कळस । होय अहंकाराचा नाश होतां संताचिया भेटी । जन्ममरणा पडे तुटी चंद्रभागेमाजीं न्हातां । मुक्ति लाभे सायुज्यता दृष्टीं नपडे ब्रह्मादिकां । प्राप्त जालें तें भाविका रामदासा जाली भेटी । विठ्ठलपायीं दिधली मिठी
भावार्थ---
पंढरीसारखे तीर्थक्षेत्र आकाश, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांत, सर्व भूमंडळावर शोधूनही सापडणार नाही. विठ्ठल मंदिराचा कळस दूरून बघितला तरी भाविकाच्या अहंकाराचा संपूर्ण नाश होतो. येथील संतांच्या भेटी होतांच जन्ममरणाची बंधने तुटून पडतात. चंद्रभागेमध्यें स्नान करतांच भाविकांना सायुज्य मुक्तीचा(पांडुरंगाच्या निकट सानिध्याचा )लाभ होतो. ब्रह्मादिदेवांच्या दृष्टीसुध्दा पडणे कठिण अशा वैकुंठपदाची प्राप्ती होते. संत रामदास म्हणतात, आपली पंढरीच्या पांडुरंगाची भेट झाली आणि त्याच्या पायाला मिठीच घातली.
अभंग---२०९
पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ॥ आम्हीं देखिला विठोबा । आनंदे विटेवरीं उभा ॥ तेथे दृश्यांची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टी ॥ रामदासीं दर्शन जालें । आत्मविठ्ठला देखिलें ॥
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, पंढरी एकदेशी नाही कारण विठ्ठ्लाचा सर्वत्र निवास आहे. पाडुरंगाला स्थळ काळाची बंधन नाही. आनंदाने विटेवर उभा असलेल्या विठोबाचे दर्शन आपल्याला झाले. विठोबाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे, रुक्मिणीदेवीचे दर्शन घडते. पंढरीमध्यें आत्मविठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडलें.
अभंग---२१०
राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ॥
आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।
रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळु राघव पांडुरंग ॥
भावार्थ---
श्रीराम भक्तांवर कृपा करणारा असून विठ्ठ्ल भक्तांच्या हाकेला धावून जाऊन प्रत्यक्ष मदत करणारा आहे. दोघांचेही स्वरूप एकरूप म्हणजे निराकार आहे. ते हृदयांत एकाकार होऊन राहिले आहेत. त्यांची हृदयातिल वस्ती नरंतर आहे, असे सांगून संत रामदास म्हणतात भाविकांनी मनांत भक्तिभाव धरला तर राघव व पांडुरंग दोघेही कृपेचे सागर आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : March 11, 2023
TOP