अभंग---१९१
संत सज्जनांचा मेळा । त्यासि लोटांगण घाला तेथें जाऊनि उभे राहा । रामदास नयनीं पहा गुण श्रीरामाचे गाती । कथा रामाची ऐकती तेथे रामही असतो । कथा भक्तांची ऐकतो जेथें राम तेथें दास । सदृढ धरावा विश्वास
भावार्थ---
जेथे संत सज्जनांचा समुदाय असेल तेथें जाऊन उभे राहावें श्रीरामाचे गुण गाणाय्रा, रामकथा आवडीने ऐकणाय्रा त्या रामदासांना डोळ्यांनी प्रत्यक्ष बघावें आणि त्यांना लोटांगण घालावें कारण तेथें स्वता: श्रीराम भक्तांच्या कथा ऐकण्यासाठीं आलेला असतो. जेथें राम तेथें दास असणारचया विषयीं दृढ विश्वास असावा.
अभंग---१९२
तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीर निवासी रूप सांवळें सुंदर । ज्याला ध्यातसे शंकर जडित जडित कुंडलें श्रवणीं । राम लावण्याची खाणी सूर्यवंशाचें मंडण । राम दासाचें जीवन
भावार्थ---
शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरींत निवास करणाय्रा, सावळ्या सुंदर रामरूपाचे मनामध्यें ध्यान करावें कानामध्ये रत्नजडित कुंडले असलेला श्रीराम लावण्याची खाण असून सूर्यवंशाचे भुषण आहे. संत रामदास म्हणतात, श्रीराम रामदासांचे जीवन आहेत.
अभंग---१९३
शोभे ठकाराचें ठाण । एकवचनी एकबाण बाप विसांवा भक्तांचा । स्वामी शोभे हनुमंताचा मूर्ति शोभे सिंहासनीं । तो हा राजीव नयनी सूर्यवंशाचें मंडण । राम दासाचें भूषण
भावार्थ--- संत रामदास म्हणातात, आपल्या स्वामींचे स्थान अत्यंत शोभायमान आहे. तेथें कमला सारखे लोचन असलेल्या श्रीरामांची सुंदर मूर्ती शोभून दिसत आहे जो हनुमंताचा स्वामी आहे. सूर्यवंशाचे भूषण असलेला हा श्रीराम एकवचनी एकबाणी असून भक्तांचा विसावा व रामदासांचे भूषण आहे.
अभंग---१९४
तो हा राम आठवावा । ह़दयांत सांठवावा रामचरणीची गंगा । महापातके जातीं भंगा रामचरणीची ख्याति । चिरंजीव हा मारुती चरण वंदी ज्याचे शिरी । बिभीषण राज्य करी शबरीची बोरें खाय । मोक्ष दिला सांगूं काय रामदास म्हणे भावें । कथा कीर्तन करावें
भावार्थ---
श्री रामाचे सतत स्मरण करावे, रामाचे रूप व गुण अंतरात साठवावे. रामचरणाचे तीर्थ गंगोदका प्रमाणे पवित्र असून महापातकांचा नाश करणारें आहे. रामचरणांचा दास मारुती चिरंजीव झाला अशी त्याची किर्ति आहे. रामचरणांना वंदन करणारा बिभीषण लंकेचा राजा बनला. शबरीची बोरे चाखून श्री रामाने तिला मोक्षाची अधिकारी बनवलें अशा कृपाळू रामाच्या कथांचे कीर्तन करावें असे या अभंगात संत रामदास सांगतात.
अभंग---१९५
ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम नव्हे गणेश गणपाळु । लाडु मोदकांचा काळू नव्हे चंडी मुंडी शक्ति । मद्यमांसाते मागती नव्हे भैरव खंडेराव । रोटी भरितांसाठीं देव नव्हे जोखाई जोखाई । पीडिताती ठाईं ठाईं नव्हे भूत नव्हे खेत । निंब नारळ मागत रामदासी पूर्णकाम । सर्वांभूती सर्वोत्तम
भावार्थ---
या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू कसे नाहीत हें सांगत आहेत. श्रीराम हे गणांधिपती गणेशा सारखे लाडु, मोदक खाणारे नाहीत किंवा चंडी, मुंडी या शक्तिदेवतां प्रमाणें मद्यमांसाचा नैवेद्य मागणारे नाही. श्रीराम भैरव खंडेराया सारखे भरित रोटी घेऊन प्रसन्न होणारे नाहीत, जोखाई सारखे रागावून पीडा देणारे नाहीत तसेच भूताखेतांची बाधा टळावी म्हणुन लिंबू, नारळ मागत नाहीत. सद्गुरू श्रीराम सर्व प्राणिमांत्रांच्या सगळ्या कामना पुर्ण करणारे-असून सर्व जीवांना विश्राम देणारे सर्वोत्तम देवाधिदेव आहेत.
अभंग---१९६
सोडवि जो देव तोचि देवराव । येर जाण नांव नाथिलेंचि नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहे । ठेविजेत आहे प्रतापाचें प्रतापाचें नांव एका राघवासी । रामीरामदासी देवराव
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, जो जीवन मरणाच्या चक्रातून सोडवतो तो सर्वश्रेष्ठ देव होय, बाकी सगळे नाथिलें म्हणजे लटके किंवा खोटे आहे. पुण्यप्रतापी असा श्रीराम सर्व लोकांमध्ये प्रसिध्द असून प्रतापी हे नांव केवळ राघवालाच शोभून दिसतें. तो श्रीराम रामदासाचा स्वामी आहे.
अभंग---१९७
अणुपासुनि जगदाकार । ठाणठकार रघुवीर रामाकार जाहली वृत्ती । द्रृश्याद्रृश्य नये हातीं रामीं हरपलें जग । दास म्हणे कैंचे मग
भावार्थ---
अणुपासून जगातील सर्व ठिकाणी रघुवीर व्यापून राहिला आहे, एकदां वृत्ती राम स्वरुपांत विलीन झाली कीं, दिसणारें आणि न दिसणारें सर्व विश्व हरपून जाते, केवळ रामरूपच अंतर-बाह्य व्यापून उरतें.
अभंग---१९८
राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेलें भक्तांचें कल्पतरु चिंतामणी । कामधेनूची दुभणी परिस झालें पाषाण । अंगिकार करी कोण नाना रत्नांचे डोंगर । अमृताचें सरोवर पृथ्वी अवघी सुवर्णमय । कोणीकडे न्यावें काय ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाच्या अंतरीं
भावार्थ---
श्रीराम हे ईच्छीलें फळ देणारा कल्पतरु, चिंतामणी किंवा कामधेनू असून रघुनाथाचे राज्य येतांच भक्तांचे भाग्य उदयास आले. रामराज्यांत सर्वच पाषाणांचे परिस बनले असतां, त्यांचा लोभ कोणाला वाटणार?रामराज्यांत सर्वच डोंगर रत्नांचे बनले आणि सरोवरे अमृताची बनली, अवघी पृथ्वी सुवर्णमय झाली. अशा समृध्द रामराज्यांत कुणालाही काहिही कोठेही नेण्याची अभिलाषाच राहिली नाही. असा हा ब्रह्मदेवापासून सामान्य जनांच्या कामना पूर्ण करणारा श्री राम आपल्या अंतरंगांत वास करतो असे संत रामदास या अभंगात म्हणतात.
अभंग---१९९
स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी उपजतांबाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि आंगीं शेंदुराची उटी । स्वयंभ सोन्याची कांसोटी कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाळा विराजती स्वामीकृपेची साउली । रामदासाची माउली॥
भावार्थ---
हा संत रामदासांचा आपले स्वामी श्री मारुती यांच्यावर लिहिलेला अभंग आहे. या अभंगांत ते म्हणतात आपले स्वामी ब्रह्मचारी असून सर्व स्रिया त्यांना मातेसमान आहेत. जन्म होतांच जेव्हां श्री मारुतीने आकाशातील लालभडक सूर्यबिंब पाहिलें आणि हे फळच आहे असे समजून ते खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली. संत रामदास म्हणतात, श्री मारुतीरायांनी अंगावर शेंदुराची उटी लावली असून सोन्याची स्वयंभू लंगोटी परिधान केली आहे. त्यांच्या कानांत कुंडलें झळकत असून गळ्यामध्यें मोत्याच्या माळा शोभून दिसत आहेत. संत रामदास म्हणतात, श्रीमारुती आपली माउली असून त्यांच्या कृपेची साउली आपल्यावर आहे.
अभंग---२००
पडतां संकट जीवां जडभारी । स्मरावा अंतरी बलभीम बलभीम माझा सखा सहोदर । निवारी दुर्धर तापत्रय तापत्रय बाधा बाधूं न शके काहीं । मारुतीचे पायीं चित्त ठेवा ठेवा संचिताचा मज उघडला । कैवारी जोडला हनुमंत हनुमंत माझें अंगीचें कवच । मग भय कैचें दास म्हणे
भावार्थ---
संत रामदासांची मारुतीराया वरील उत्कट भक्ती या अभंगांत दिसून येते. ते म्हणतात जीवावर बेतलेले कोणतेही मोठे संकट आले असतां बलभीमाचे स्मरण करावे. बलभीम आपला सखा, सहोदर म्हणजे बंधू असून तापदायक अशा कठिण संकटांचे निवारण करतो. बलभीम आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तापत्रयापासून मुक्तता करतो. मारुतीच्या चरणाशीं चित्त जडले असतां तिनही तापांची बाधा होत नाही. ढभहनुमंता सारखा कैवारी जोडल्यामुळे आपणास संचिताचा ठेवा सांपडला असून हनुमंताच्या कृपेचे कवच लाभल्यामुळें कसलेही भय उरले नाही असे संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात.