रामदासांचे अभंग - ६१ ते ७०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.
अभंग--६१
राघवाची कथा पतितपावन । गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण । धर्मसंरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला
भावार्थ-- राघवाची कथा पतितांना पावन करणारी असल्याने भक्त ती आवडीने गातात. श्रीराम सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून भक्तांचे भुषण आहेत. धर्म रक्षणाचे काम करणारे श्रीराम केवळ एकमेव अद्वितीय आहेत. रामाचे गुण अतुलनीय आहेत. रामदास म्हणतात अशा गुणसंपन्न रामाच्या कथांचे निरूपण करणारे भक्त धन्य होत. त्यांचे जीवन सफल झाले आह.
अभंग--६२
त्याचे पाय हो नमावें । त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा । आपण वर्ते त्याचि पंथा कीर्तनाचें न करी मोल । जैसे अमृताचे बोल सन्मानिता नाहीं सुख । अपमानितां नाहीं दु:ख ऐसा तोचि हरिदास । लटकें न वदे रामदास
भावार्थ--
हरिदास आपल्या कीर्तनातून हरिकथा भक्तांना ऐकवतात एवढच नव्हे तर कथेतील आदर्शांचे स्वतः पालन करतात. अशा हरिदासांना सन्मानाचे सुख नसते व अपमानाचे दुःख नसते. त्यांचे कीर्तन म्हणजे केवळ अमृताचे बोल असतात. अनमोल असतात. संत रामदास म्हणतात, अशा हरिदासांचे किर्तन ऐकावे व आदराने त्यांना नमन करावे. . हे भक्तच केवळ हरिदास म्हणवून घेण्यास योग्य असतात. हे लटके नसून निसंशय खरे आहे
अभंग--६३
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू । तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव । बापुडे मानव देहधारी रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं । धन्य तो संसारीं दास म्हणे
भावार्थ--
मुक्तपणे नामाचा अव्हेर करणारा अडाणि कधीही मुक्त होऊ शकणार नाही. शंकराच्या नामाचा जप करणारे कितीतरी मानव देहधारी बापुडवाणे जीवन जगतात. संत रामदास म्हणतात, अंतकरणात रामाचे रूप व मुखात सतत रामाचे नाव असणारे भक्त संसारी असूनही धन्य होत.
अभंग--६४
आत्मज्ञानी आहे भला । आणि संशय उठिला त्यास नामचि कारण । नामें शोकनिवारण नाना दोष केले जनीं । अनुताप आला मनी रामी रामदास म्हणे । जया स्वहित करणें
भावार्थ--
आत्मज्ञानी असूनही जर त्याच्या मनात संशय निर्माण झाला तर संशयाचे निराकरण करण्यासाठी नामाचे साधन केले पाहिजे. कारण नामामुळेच सर्व संशयाचे, दुःखाचे निवारण होते. संसारात असतांना आपल्यात अनेक दोष निर्माण होतात पण त्याबद्दल पश्चाताप झाल्यास त्या दोषांचे निराकरण होऊन अंती कल्याण होते असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.
अभंग--६५
रात्रंदिन मन राघवीं असावें । चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं । तेणें हा संसारू तरशील तरशील भवसागरीं न बुडतां । सत्य त्या अनंताचेनि नामें नामरुपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा
भावार्थ--
या अभंगात संत रामदास सांगतात की, रात्रंदिवस आपले मन राघवाच्या चिंतनात असावे, पैशाचे चिंतन नसावे. धन व परस्त्री चिंतन यामुळेच परत परत जन्मास यावे लागते. त्याच प्रमाणे कुणाची निंदा करू नये. त्यामुळे भवसागरात न बुडता हा संसार तरून जाता येईल. ईश्वर हा अनंत नामा रूपाने नटला आहे. त्या सत्यरूपी अनंताला संत संगती धरल्यास जाणतां येत.
अभंग--६६
लोभा नवसांचा तो देव बध्दांचा । आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा । देव साधकांचा निरंजन निरंजन देव साधकांचे मनीं । सिध्द समाधानी देवरुप देवरुप झाला संदेह तुटला । तोचि एक भला भूमंडळीं भूमंडळीं रामदास्य धन्य आहे । अन्यनता पाहें शोधूनियां
भावार्थ-- ज्यांच्या मनात लोभ असल्याने ते संसारात बद्ध असतात, असे लोक हव्यासापोटी देवाला नवस करतात. त्यांचा देव नवसाचा असतो. मोहापासून सुटलेले लोक मोक्षाची इच्छा करणारे असतात. ते आपल्या गुरुला देव मानतात. इच्छा धरून मोक्षाची जे साधना करतात ते साधक होत, ते निरंजनाला मनात ठेवून त्याची उपासना करतात. तर सिद्ध साधनेमुळे पूर्ण समाधानी बनतात, त्यांच्या मनात कोणताही संदेह नसतो. असे सिद्ध पुरुष भुमंडळावर धन्य होत. असे रामदास शोधूनही इतरत्र सापडणार नाहीत, असे संत रामदास सुचवतात.
अभंग--६७
राम कैसा आहे हें आधीं पाहावें । मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन । जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें दास्य कैचें घडी देवासी नेणतां । वाउगें शिणतां श्रम उरे समाधान देव पाहतां घडेल । येर बिघडेल दास म्हणे
भावार्थ --
रामाचे रूप, गुण, चरित्र कथा हे आधी जाणून मगच सुखाने रामाचे दास बनावे. देवाला ओळखून दास्यत्व पत्करले असता हळूहळू ब्रह्मज्ञान होते. मग दास्यत्वाची भावनाच उरत नाही देवाला न ओळखता दास्य घडू शकत नाही ते केवळ निरर्थक श्रम होतात. देवाला जाणल्यानेच मनाचे समाधान होईल, नाहीतर सारे बिघडेल असे सांगून संत रामदास भक्तांना सावधपणाचा इशारा देत आहेत.
अभंग-६८
जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव । रामपणा कैंचा ठाव रामीं राम तोहि दास । भेद नाहीं त्या आम्हांस रामदास्य करुनि पाहे । सर्व स्रुष्टी चालताहे प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास
भावार्थ-- संत रामदास म्हणतात जो भजनात रममाण झाला तो रामाचा दास झाला. दास्यत्व स्वीकारल्या शिवाय राम चरणी ठाव मिळत नाही. रामातील राम तोच दास होय. राम व रामाचा दास यांच्यात भेद नाही सर्व प्राणीमात्र रामा मुळेच अस्तित्वात आह. राम त्यांच्यातील प्राण आहे असा संत रामदासांचा विश्वास आहे.
अभंग--६९
दिनानाथाचे सेवक । आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे । परि शरण दारिद्रयाचे जें जें देवासी दु:सह । तें तें आम्हां सुखावह रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणें
भावार्थ--
रामदास राघवाचे शरणागत असूनही त्यांना दारिद्र्याच्या झळा सहन कराव्या लागतात. देव सुद्धा जे सहन करू शकत नाही ते रामदास राम कृपेमुळे सहज सहन करू शकतात. सीतापती राम हें दासांची विद्या वैभव व सुवर्ण संपत्ती आहे. श्रीराम हा रामदासांचा एकमेव सोबती आहे. श्रीराम दासांची माता, पिता बंधू आहे. केवळ रामच स्वजन, सोयरा आहे. ध्यानी मनी वसलेला राम ज्ञानाचे भांडार आहे. राम हा रामदासाचे पूर्ण समाधान आहे असे संत रामदास या अभंगात म्हणतात.
अभंग--७०
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकांसी सेवकासी कांहीं न लगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठीं ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे
भावार्थ--
सेवकांच्या भाग्याने त्याच्यावर देवाची कृपा झाली तर देवरा णा त्याचे सर्व प्रकारे रक्षण करतो. सर्व आशा समूळ नाहीशा करून आशा पाशातून मुक्तता करतो. त्यामुळे राघवाचे दास पूर्णपणे उदासीन होतात. त्यासाठी सेवकांना काही साधना करावी लागत नाही. आपले ब्रीद पाळण्यासाठी राघव सेवकांना पावन करतात. आपल्या ब्रीदासाठी राघवाने अनेकांना पतितपावन केले आहे हे संत रामदासांनी अनेकदां सांगितले आहे. त्यासाठी फक्त देवाचे भजन करावे असे संत रामदास सांगत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : March 11, 2023
TOP