अभंग---२५१
माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ॥ गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ॥ लागलीसे परी तुवां न धरावी । स्वहितें करावी रामभक्ति ॥ रामभक्तिविण होसिल हिंपुटी । एकलें शेवटीं जाणें लागे ॥ जाणें लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ॥
भावार्थ---
आई, वडील, नातेवाईक, सगेसोयरे, प्रिय पत्नी, मुलेबाळे यांच्यामध्यें मन अडकवू नकोस. समाजांत राहातांना लोकमताचा विचार करावा लागतो परंतू त्या गोष्टीचा फार विचार न करतां स्वता:च्या हिताचा विचार करून रामभक्ति करण्यांत आपला वेळ सार्थकी लावावा. आयुष्याच्या शेवटी सर्व सोडून एकट्याला मृत्युला सामोरे जावेंलागते. अंतकाळी एका राघवाचा आसरा लाभतो, तोच जीवन मरणाच्या चक्रातून सोडवणारा आहे. श्री रामाचे सतत स्मरण ठेवून निरंतर रामाचे ध्यान करणे या शिवाय दुसरे सुलक्षण नाही हे समजून घेऊन रामभजनी लागावें असे संत रामदास या अभंगात सांगत आहेत.
अभंग---२५२
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ॥ जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ॥ दृष्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा ॥ दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ॥
भावार्थ---
पाषाणाची (दगडाची ) मुर्ती करून तोच देव आहे असा भाव अंतरात निर्माण केला तर तीच प्रतिमा मनांत ठसतें. जसा भाव तसाच देव दिसतो. विश्वाचा पसारा निर्माण करून परमेश्वर त्या पासून निराळा झाला. संत रामदास म्हणतात, इंद्रियांना दिसणार्या दृष्य विश्वापासून दूर (भावातीत ) झाल्याशिवाय अनंत परमेश्वराचे दर्शन घडणार नाही.
अभंग---२५३
जाला स्वरुपीं निश्चय । तरि कां वाटतसे भय ॥ ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ॥ क्षण एक निराभास । क्षणें म्हणे मी मनुष्य ॥ रामीरामदास म्हणे । देहबिध्दीचेनि । गुणे ॥
भावार्थ---
आपण परमेश्वराचा अंश आहोत असा अद्वैत भाव मनामध्यें स्नानिर्माण होऊन अहंम ब्रह्मास्मी असा मनाचा निश्चय होतो, तरी भयाची भावना निर्माण होते कारण आपल्या मूळ स्वरुपाचा आपल्याला विसर पडतो. हेच भ्रमाचे लक्षण आहे. एका क्षणी सर्व संशयाचा निरास होऊन मन नराभास होते, आपल्या स्वरुपाशी एकरूप होते तर दुसर्या क्षणी आपण व सत्स्वरुप भिन्न असून, आपण अविनाशी आत्मतत्व नसून मर्त्य मानव आहोत अशी धारणा होते हे देहबुध्दी मुळे घडते असे संत रामदास म्हणतात.
अभंग---२५४
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ॥ ऐसे कैसें रे सोवळें ॥ शिवतां होतसे ओवळें ॥ नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ॥ बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ॥ नित्यनेम खटाटोप । मनीं विषयाचा जप ॥ रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ॥
भावार्थ---
कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करून रोज नियमाने स्नान संध्या करुनही मनामध्ये कामक्रोधाची भावना असेल तर हा व्यर्थ खटाटोप आहे. देहदंड करून उपासना केली तर मनाची झळफळ शांत होत नसेल तर हा केवळ बाह्य देखावा ठरतो. त्यामुळे सोवळे, ओवळे हे संदेह मिटत नसतील मनातील नाना कामना, वासना नाहिशा होत नसतील तर हा केवळ देहबुध्दीचा विटाळ समजावा. संत रामदास म्हणतात, राम चरणी दृढ विश्वास असल्याशिवाय या सर्व गोष्टी मातीमोलाच्या आहेत.
अभंग---२५५
सुडकें होतसे झाडाचें । पटकर होतसे हाडाचें ॥ यांत सोवळें तें कोण । पाहा पाहा विचक्षण ॥ पाहों जातां घरोघर । कथीकेची एक धार ॥ चुडे दांतवले हाडें । पाहा सोंवळें निवाडें ॥ न्यायनीति विवंचना । हिंगावाचुनी चालेना ॥ दास म्हणे रे संतत । कांहीं पाहों नये अंत ॥
भावार्थ---
झाडापासून कापसाचे वस्त्र (सुडकें ) मिळते तर हाडापासून रेशमी वस्त्र (पटकर), या वर सखोल विचार केला तर समजते कीं, सोवळे कोणते. घरोघर जाऊन पाहिले तर हे लक्ष्यांत येते कीं, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे (कढीची धार एकच आहे ) संत रामदास म्हणतात, सोवळे ओवळे, न्यायनिती यांचा निवाडा हिंगावाचुन चालत नाही म्हणजे जिवनावश्यक गोष्टींशिवाय होत नाही तेव्हा न्याय, निती, सोवळें, ओवळे यांचा सतत विचार करु नये.
अभंग---२५६
एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ॥ लाभ नाही यावेगळा । थोर भक्तीचा जिव्हाळा ॥ हरिकथा निरूपण । सदा श्रवणमनन ॥ दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ॥
भावार्थ---
जीवनांत सीतापतीचा (श्रीरामभक्तीचा ) लाभ होणे हा सर्वात मोठा लाभ आहे या शिवाय संतांची संगती लाभणे हा दुसरा महत्त्वाचा लाभ होय. भक्तिचा जिव्हाळा हा सर्वात थोर लाभ आहे असे सांगून संत रामदास म्हणतात कीं, हरिकथेचे सतत श्रवण, मनन आणि निरुपण तसेच दानधर्म आणि परोपकार हे जीवनाचे सार आहे,
अभंग---२५७
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ॥
याचें सार्थक करावें । आपणासी उध्दरावें ॥
बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ॥ रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ॥
भावार्थ---
संत रामदास म्हणतात कीं, जेव्हां साधकाच्या जीवनांत पाप पुण्याचे माप सारखे होते, समानता घडते तेव्हांच नरदेहाची प्राप्ती होते. पुष्कळ जन्मांचे शेवटी हा योग घडून येतो आणि त्यानंतर परत पुण्कोटी नरदेहाचा लाभ मिळत नाही या साठी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व आपला उद्धार करून घ्यावा.
अभंग---२५८
तीर्था जाती देखोवेखी । तेथे कैसी होतें पाखी ॥ पाप-गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ॥ दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ॥ म्हणती जाऊ वैकुंठासी । कैसें येते प्रत्ययासी॥ रामदास म्हणे हित । कैसें जाहलें । स्वहित ॥
भावार्थ---
साधकानें पवित्र तिर्थस्थाने बघण्यासाठी तेथे जाऊन त्याच्या देहमनाची शुध्दता कशी होते, पाप धुऊन जावून पुण्य कसे झाले याचा प्रत्यय (अनुभव )कसा आला, दोषापासून सुटून प्राणी मुक्त कसा झाला हे कसे समजून घ्यावे यानंतर वैकुंठाची प्राप्ती होणार हा विश्वास कसा निर्माण झाला. संत रामदास म्हणतात, केवळ देवावरील अढळ विश्वासामुळें हिताचे स्वहित झालें.
अभंग---२५९
मन-कर्णिकेमाझारी । स्नानसंकल्प निवारी ॥ स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ॥ गुरुपायी शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ॥ रामकृपेचे वाहे जळ । रामदासी कैसा मळ ॥
भावार्थ---
साधक पवित्र तिर्थस्थानी जाऊन तेथील पावन नदीच्या जलांत (मनकर्णिका) स्नान करण्याचा संकल्प पुर्ण करतो या पुण्याने त्याचे अंतरंग अमल होते. या शुध्द अंतकरणाने साधक आपल्या गुरु चरणांशी प्रेमाने शरणागत होतो. संत रामदास म्हणतात, रामकृपेच्या पवित्र जलांत रामाचे दास अंतरंगाने मलीन राहूच शकणार नाही. कारण हा त्रिवेणी संगम आहे ।
अभंग---२६०
आत्मारामेविण । रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ॥ पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ॥ सवडी नाहीं तीर्थगमना । रामें रुधिलें त्रिभुवन ॥ रामदासी । तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ॥
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, आत्माराम सर्व अणुरेणुमध्ये व्यापून राहिला आहे. असे एकही ठिकाण नाही कीं, तेथे आत्माराम नाही. मन, बुध्दी आणि लोचन यापैकीं कोणत्याही आंतर किंवा बाह्य ज्ञानेंद्रियांनी पाहिले तरी रामाशिवाय अन्य कांही दिसत नाही. रामाने हे त्रिभुवन व्यापून टाकले आहे त्या मुळे तीर्थाटना साठी स्थानच उरले नाही. जेथे जावे तेथे श्री रामच भरून राहिला आहे.