अभंग--१२१
घात करा घात करा । घात करा ममतेचा ममतागुणें खवळें दुणें । राग सुणें आवरेना ममता मनीं लागतां झणीं । संतजनीं दुरावली दास म्हणे बुध्दि हरी । ममता करी देशधडी
संदर्भ-- या अभंगात संत रामदास ममतेचा घात करा असे सांगत आहेत. ममता म्हणजे माझे पणा किंवा ममत्व त्यामुळे माझे व दुसर्याचे असा दुजाभाव वाढीस लागतो. त्यामुळे क्रोध आवरणे कठीण होते. मनात ममत्व निर्माण झाले की संतांचा उपदेश आवडेनासा होतो परिणामी संतजन दुरावतात. संत रामदास म्हणतात बुद्धी हरण करणारी ममता मनातून काढून टाकावी तिला देशोधडीला लावावें.
अभंग--१२२
सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे तयाची संगति जोडे । परम भाग्यें सकळांचे अंतर जाणे । मीपणें हुंबरों नेणें ऐसियावरून । प्राणसांडण करुं साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें समचि देखणें उणें । अधिक नाहीं अभिमान नावडे । धांवती दीनांकडे तयांचे जे उकरडे । महाल त्यांचे आपपर नाही ज्यासी । पुसतां सांगती त्यासी ऐकतांचि भाविकांसी । पालट होये रामीरामदास । वास । पाहतो रात्रंदिस ऐसियाचा सौरस । देईं राघवा
भावार्थ--
या अभंगात रामदास संतांचा महिमा सांगत आहे. ज्यांना रामभक्तीचे उदंड वेड लागले आहे असे सज्जन अगदीच थोडे असतात. मोठ्या भाग्याने त्यांच्या संगतीचा लाभ होतो. ते सर्वांच्या अंतकरणातील विचार जाणतात. अहंकाराने कधीच गुरगुरत नाहीत. अशा संत-सज्जनां वरुन आपले प्राण ओवाळून टाकावेत असे संत रामदास म्हणतात. अज्ञानी लोकांचे कठोर भाषण सहन करतात. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करीत नाहीत. कुणीही विचारल्याशिवाय समजुतीच्या गोष्टी सांगतात. ते सर्वांना समभावाने वागवतात । जे दीनदुबळे आहेत त्यांच्याकडे धाव घेतात. अभिमान, गर्विष्ठपणा त्यांना अजिबात आवडत नाही. सज्जन कधी आपला व परका असा दुजाभाव करीत नाहीत. भाविक लोक संतांचा उपदेश ऐकताच त्यांच्या विचारात बदल घडून येतो. संत रामदास म्हणतात आपण रात्रंदिवस या संतांची वाट पाहतो व त्यांची संगती घडवून आणावी अशी राघवाला प्रार्थना करतो.
अभंग--१२३
शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर । परि नाहीं चतुर ।
तेथें निरंतर मन माझें रे
भेदिक शाहाणे जनी । सगुण समाधानी धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे रामीरामदासीं मन । जाहलें उदासीन ऐसे ते सज्जन पहावया रे
भावार्थ--
संत रामदास म्हणतात जगात अनेक थोर माणसे आहेत पण अत्यंत चतुर, विवेकी, समाधानी व सद्गुणी सज्जन मात्र नित्य, निरंतर शोधूनही सापडत नाहीत. असें सज्जन ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ धन्य होय. अशा संत सज्जनांचा शोध घेताना आपले मन उदासीन झाले आहे.
अभंग--१२४
साधुसंतां मागणें हेंची आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां वृत्ति शून्य जालीया संसारा । संतांपदीं घेतला आम्हीं थारा आशा तृष्णा राहिल्या नाहीं कांहीं । देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी । दास म्हणे सप्रेम निरंतरीं
भावार्थ --
या अभंगात रामदास साधुसंतांकडे एक मागणे मागत आहेत. त्यांनी आपल्या मनामध्ये गोविंदाचे गुण गाण्यासाठी प्रेम निर्माण करावे. सांसारिक सुखदुःखा मुळे वृत्ती शून्य झाल्याने मनातील आसक्ती, आशा, तृष्णा यांचा लोप झाला आहे. आता देहबुद्धीमुळे भोगायला लागणारे प्रारब्धाचे भोग राहिले नाही. उदासीन वृत्ती निर्माण झाल्याने संतपदी आश्रय घेऊन गोविंदाचे गुण आठवून त्याचे कीर्तन करावे व त्याविषयी अंतरात निरंतर प्रेम असावे एवढी एकच इच्छा उरली आहे, ती साधुसंतांनी पूर्ण करावी अशी याचना संत रामदास करतात.
अभंग--१२५
पावनभिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम अभेदभक्ति दे रे राम । आत्मनिवेदन दे रे राम तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ब्रह्मानुभव दे रे राम । अनन्य सेवा दे रे राम मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम
भावार्थ--
या अभंगात रामदास श्रीरामा जवळ पावन भिक्षा मागताहेत कोणताही संदेह नसलेली भक्ती, नवविधा भक्तीमध्ये अगदी शेवटची आत्मनिवेदन भक्ती, कोणत्याही विषयाशी एकरूप होऊन त्यातील अर्थ ग्रहण करण्याची शक्ती, सज्जनांची संगती, केवळ साक्षीभावाने अलिप्तपणे येणारा ब्रह्मानुभव, स्वामींची अनन्य भावाने सेवा करण्याची वृत्ती श्री रामाने आपणांस द्यावी अशी प्रार्थना करून शेवटी संत रामदास म्हणतात, माझ्या मीपणाचे, अहंकाराचे विसर्जन करून श्रीरामाने आपल्याला भेट द्यावी.
अभंग--१२६
कोमळ वाचा देरे राम । विमळ करणी दे रे राम हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम अंतरपारखी दे रे राम । बहु जनमैत्री दे रे राम विद्या-वैभव दे रे राम । उदासिनता दे रे राम मागो नेणें दे रे राम । मज न कळे तें दे रे राम तुझी आवडी दे रे राम । दास म्ह्णे मज दे रे राम
भावार्थ--
या अभंगात संत रामदास जे लोकांसाठी हितकारक, सुखकर, सुखदायक आहे अशा गोष्टींची रघुनायका कडे मागणी करीत आहेत. आपली वाणी कोमल व कृती निर्मळ असावी असे ते म्हणतात. आपल्याला इतरांचे अंतरंग जाणून घेण्याची कला द्यावी त्यामुळे लोकांची अतूट मैत्री मिळवता येईल असे संत रामदास म्हणतात. वैभवा बरोबरच ते अंतकरणाची उदासीनता मागताहेत. अभंगाचे शेवटी रामदास म्हणतात की आपल्याला काय मागावे हे कळत नाही पण तेच रामाने आपल्याला द्यावें आणि रामाचे प्रेम सतत हृदयात रहावें अशी मागणीही ते करतात.
अभंग--१२७
संगित गायन दे रे राम । आलाप गोडी दे रे राम धात माता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा दे रे राम प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम दास म्हणे रे गुणधामा । उत्तम गुण मज दे रे राम
भावार्थ--
या अभंगात रामदास गुंणधाम रामाकडे उत्तमगुणांची मागणी करीत आहेत. मधुर संगीत, गायन करताना मुद्रेवर दिसणारे रसाळ भाव, मनोहर शब्दांनी सजवलेली आकर्षक कथा याबरोबरच व्यवहारातील नित्य सावधपणा व विपुल पाठांतर हे सर्व गुण आपल्याला द्यावेत असे संत रामदास म्हणतात.
अभंग--१२८
अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा दुर्लभ देह दिधले असतां नाहीं तुझिया प्रेमा व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा नयनासारिखें दिव्य निधान पावुनियां श्री रामा विश्वप्रकाशक तुझे रुपडें न पाहें मेघश्यामा श्रवणें सावध असतां तव गुणकीर्तनि त्रास आरामा षड्रसभोजनि जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरुपा गुणधामा मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृतवामा
भावार्थ--
संत रामदासांच्या हा अभंग धावा या स्वरूपाचा आहे. माणसाला दुर्लभ मनुष्य देह मिळूनही विषय वासनेमुळे श्रीरामाच्या प्रेमाला आपण पारखे झालो आहोत. मनुष्य जन्माला येऊन आयुष्य व्यर्थ घालविले असा पश्चात्ताप संत रामदास व्यक्त करतात. नयना सारखी दिव्य देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणार्या मेघश्याम राम दर्शनाचे सुख आपणास लाभले नाही याबद्दल ते खंत व्यक्त करतात. सावध कर्णेंद्रिय मिळूनही रामगुण कीर्तनाचा लाभ झाला नाही. सहा प्रकारच्या रसांनी युक्त असलेल्या भोजनासाठी लंपट असलेली जीभ रामनामाचा जप करण्यास मात्र विसरली. सुवासिक फुलांचा, फळांचा सुगंध घेण्यास चटावलेली श्रवणेंद्रिय श्रीरामाच्या पदकमली वाहिलेल्या निर्माल्याचा सुगंध चाखू शकली नाही. सुवर्ण भुषणांनी सुखावलेल्या हातांनी कधी रामाची पूजा केली नाही. सर्वश्रेष्ठ अशा मस्तकाने कधी रामाचा पदकमलांना वंदन केले नाही. अशा असंख्य अपराधांना दयाघन श्रीरामानें क्षमा करावी असे संत रामदास विनवणी करून अत्यंत कृपाळूपणे ही आस पुरवावी असे सांगतात.
अभंग--१२९
शरण तुज रघुवीरा । हो रामा, गुणगंभीरा धन्य धन्य दातारा । कृपाळू खरा जन्मदु:ख सांगता नये । सांगू मी काय दूरी करुनि अपाय । केले उपाय बाळपणापासुनि वेडें । तुज सांकडें सांगू मी कवणापुढें । जालें एवढें जीवींचें मनींचें पुरविलें । गोमटें केलें सर्व साहोनियां नेलें । नाहीं पाहिलें देवा तूं त्रैलोक्यनाथ । मी रे अनाथ मज करुनि सनाथ । केले समर्थ दास म्हणे तुझ्या अन्नाचा । वाढलों साचा मज हा संसार कैचा । सर्व देवाचा
भावार्थ-- अत्यंत कृपाळू उदार गुणगंभीर अशा श्री रामाला शरण जाऊन संत रामदास म्हणतात की, जन्माला येण्याचे दुःख वर्णन करून सांगण्यासारखे नाही परंतु श्रीरामाने त्यातील उणिवा काढून उपाय केले आहेत. बाळपणापासून वेड्या मनाने श्रीरामाला अनेक वेळा सांकडे घातले ते इतके झाले आहे की कुणाला सांगता येत नाही. आपल्या जीवनाच्या सर्व मागण्या श्रीरामांनी पूर्ण करून जीवन साजरे बनवले. श्रीराम त्रैलोक्याचे स्वामी असून आपल्यासारख्या अनाथांला नाथ बनून सनाथ केले, समर्थ बनवले. संत रामदास शेवटी म्हणतात श्रीरामाने अन्न देऊन या देहाचे पोषण केले. येथे आपले काही नसून सर्व संसार देवाचा आहे.
अभंग --१३०
हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामि राघवा प्रथम का मला लाविली सवे । मग उपेक्षणें योग्य हें नव्हे सकळ जाणतां अंतर स्थिति । तरी तुम्हांप्रति काय विनंति दास तुमचा वाट पाहतो बोलतां नये कंठ दाटतो
भावार्थ--
या अभंगात रामदास आपले स्वामी राघव अत्यंत दयाळू असून आपल्या अंतःकरणाची स्थिती ते जाणतात. त्यामुळे त्यांना विनंती करून सांगण्याची जरूर नाही पण प्रथम श्रीरामाने दयाळूपणे कोड पुरवून तशी सवय लावली आहे, तेव्हा त्यांनी अशी उपेक्षा करणे योग्य नाही. आतुरतेने वाट बघणार्या या दासाला त्यांनी भेट द्यावी. कंठ दाटून आल्याने अधिक बोलता येत नाही असे संत रामदास म्हणतात.