अभंग ३१
माझा देह तुज देखतां पडावा । आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां । चारी देह आतां हारपले सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले । दास म्हणे आलें प्रत्ययासी
भावार्थ--
संत रामदास म्हणतात की, रामासमक्ष आपला देह पडावा अशी मनापासून आपली अपेक्षा होती आणि ती पुरवली गेली हे पाहतांना त्यांचे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चारी देह हारपले. रामदास म्हणतात आपल्या असे अनुभवास आले आहे की, आपण मनापासून जे कल्पिले होते ते सिध्दीस आले आहे.
अभंग ३२
काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा काहीं धांवाधांव करी । जंव तो आहे काळ दुरी मायाजाळीं गुंतलें मन । परि हें दु:खासि कारण सत्य वाटतें सकळ । परि हें जातां नाहीं वेळ रामींरामदास म्हणें । आतां सावधान होणें
भावार्थ--
काळ क्षणाक्षणाला पुढे जात आहे, मरणाचे मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही. संसाराच्या माया जाळ्यात मन गुंतले आहे पण संसार हेंच दु:खाचे कारण आहे. नाशवंत संसार सत्य वाटतो परंतू त्याचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही, जो पर्यंत मरण काळ दूर आहे तो वरच सावधान होऊन मुक्ती साठी प्रयत्न केले पाहिजेत असा उपदेश संत रामदास करीत आहेत.
अभंग ३३
नदी मर्यादा सांडती । उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर । सवें होतसे उतार भाग्य चढे लागवेगैं । सवेंचि प्राणी भीक मागे रामदास म्हणे काळ । दोनी दिवस पर्वकाळ भावार्थ- पावसाळ्यात नद्या पुराच्या पाण्यामुळे फोफावतात व किनारा सोडून वाहू लागतात, तर उन्हाळ्यात कोरड्या पडतात. संत रामदास म्हणतात तारुण्याचा भर नदीच्या पाण्यासारखा असतो, त्याला लवकरच उतार पडतो. माणसाचे भाग्य तसेच आहे. एकाएकी भाग्य उजळते आणि अचानक मावळते, माणसावर भीक मागण्याची वेळ येते. संत रामदास म्हणतात सतत बदलणाय्रा संसारात लाभ-हानी दोन्हीही पर्वकाळच समजावेत.
अभंग ३४
पुरें पट्टणें वसती । एक वेळ ओस होती तैसे वैभव हें सकळ । येतां जातां नाहीं वेळ बहुत स्रुष्टीची रचना । होय जाय क्षणक्षणा दास म्हणे सांगों किती । आले गेले चक्रवर्ती
भावार्थ--
अनेक शहरे, राजधान्या वसवल्या जातात पण एक वेळ अशी येते कीं, त्या ओस पडतात. तसेच सगळे वैभव येते आणि लयाला जाते त्याला वेळ लागत नाही. सर्व स्रुष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि बदलते. संत रामदास म्हणतात कितीतरी चक्रवर्ती राजे आले आणि काळाच्या पडद्याआड नाहिसे झाले.
अभंग ३५
सांजे ओसरतां सांत । वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें । जाती एकमेकांमागें चारी दिवस यात्रा भरे । सवेंचि मागुति ओसरे पूर्ण होतां महोत्साव । फुटे अवघा समुदाव बहू वह्राडी मिळाले । जैसे आले तैसै गेले एक येती एक जाती । नाना कौतुक पाहती रामीरामदास म्हणे । संसारासी येणे जाणे
भावार्थ--
संध्याकाळ होताच सूर्य अस्ताला जातो त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे तसेच आपले सगे, सोयरे, , जिवलग एका पाठोपाठ आपल्याला सोडून निघून जातात. चार दिवस यात्रा भरते आणि हळूहळू ओसरते. एखादा मोठा उत्सव पूर्ण होतो आणि उत्सवाला आलेले सर्व लोक पांगतात. लग्न समारंभा साठी पुष्कळ वह्राडी जमतात, आले तसे निघून जातात. काही येणाय्रा जाणाय्रांचे कौतुक पाहत असतात. संत रामदास म्हणतात या प्रमाणे संसारी येणे जाणे अटळ आहे.
अभंग ३६
एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे । मागे मूळ सांभाळावें उदंड झाला समुदाय । तरि आदि सांडू नये रामीरामदास म्हणे । जनीं मान्य हें बोलणें
भावार्थ--
संत रामदास म्हणतात, सामान्य जन व सज्जन असे दोन प्रकारचे लोक पहावयास मिळतात. समाजात माणसाने विवेकाने वागावे, आपली मूळ परंपरा सोडू नये. आपल्याला जनमान्यता मिळून मोठा समुदाय सभोवती जमा झाला तरीही आपण ज्या गुरु परंपरेतून आलो आहे तिचा आदर राखून त्या प्रमाणेच वागावे, त्याला बाधा आणू नये असे मत संत रामदास या अभंगात व्यक्त करतात.
अभंग ३७
प्रपंच सांडुनिया बुध्दी । जडली परमार्थ उपाधि मना होईं सावचित्त । त्याग करणें उचित संप्रदाय समुदाव । तेणें जडे अहंभाव रामदास म्हणे नेमें । भिक्षा मागणें उत्तम
भावार्थ--
प्रपंच सोडण्याची बुध्दी झाली, परमार्थाची उपाधि जडली परंतू समुदाय गोळा झाला आणि संप्रदाय निर्माण झाला की अहंभाव जडतो. संत रामदास सांगतात की, अहंकार निर्मूलन होण्यासाठी भिक्षा मागणे हा मार्ग आहे. यासाठी सावध राहून अहंकाराचा त्याग करणे उचित आहे.
अभंग ३८
नको ओळखीच जन । आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना । जेथे कोणी ओळखेना लोक म्हणती कोण आहे । पुसों जाता सागों नये रामदास म्हणे पाहीं । तेथे कांहीं चिंता नाही
भावार्थ--
ओळखीच्या लोकांमध्यै सतत राहिल्याने मनाला अभिमानाचा रोग जडतो. अशा वेळी अशा ठिकाणि निघून जावें की जेथें ओळखिचे लोक फारसे भेटणार नाहीत. जेंव्हा लोक आपण कोण असे विचारतील तेंव्हा ओळख सांगू नये. संत रामदास म्हणतात कीं, असे वागल्यास तेथे काहीं चिंता राहत नाही.
अभंग ३९
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन । आम्ही स्वानंदसंपन्न समाधान तें सभाग्य । असमाधान तें अभाग्य रामीरामदासीं देव । सख्यासहित स्वानुभव
भावार्थ--
या अभंगात संत रामदास आपण भाग्यवंत आहोत कारण मोक्षलक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे, त्यामुळे संसारातील दारिद्रय आमच्याकडे नाही. आपण स्वानंद संपन्न् आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगतात. समाधान हे सौभाग्य आणि असमाधान हेंच दारिद्र्य होय असे त्यांचे मत आहे. श्री राम हे रामदासांचे दैवत असून श्रीराम सौख्याचा त्यांना स्वानुभव आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अभंग-४०
स्नान संध्या टिळेमाळा । पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे । शिवतां होतसे ओंवळें नित्य दंडितां हा देहो । परि फिटेना संदेहो बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ नित्यनेम खटाटोप । मनीं विषयाचा जप रामदासीं द़ुढभाव । तेणेंविण सर्व वाव
भावार्थ--
मनामध्ये खरा भक्तीभाव नसतांना केवळ बाहय उपचारांचे अवडंबर माजवणाय्रा दांभिक भक्तांवर टीका केली आहे. संत रामदास म्हणतात, नेहमी नियमितपणे स्नान संध्या करणारे, कपाळावर टिळे व गळ्यात माळा घालणाय्रांच्या मनात जर राग धुमसत असेल तर किंवा उपास तापास देहदंडना करुनही मनातील संशय फिटला नसेल, बाहेरुन खूप खटाटोप करनही देहबुध्दी कायम असेल, केवळ बाह्यतः उपासनेचा देखावा करीत मनात विषयाचा विचार करीत असेल, सोवळ्या ओवळ्याच्या संकुचित कल्पनांवर विश्वास असेल, तर हे सर्व बाह्य उपचार निर्मळ भक्ती भावाशिवाय व्यर्थ होत असे स्पष्ट मत संत रामदास या अभंगात मांडत आहेत.