अभंग---१८१
संसार करावा सुखें यथासांग । परी संतसंग मनीं धरा मनीं धरा संतसंगतिविचार । येणें पैलपार पाविजेतो पाविजेतो याची प्रचीत पहावी । निरूपणी व्हावी अतिप्रीती अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा । संसारी उध्दरा असोनिया असोनियां नाहीं माया सर्वकांहीं । विवंचूनि पाहीं दास म्हणे ।
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, साधकाने प्रपंच सुखाने यथासांग करावा पण मनाने मात्र संतसंगतीची आस धरावी. या संसार सागरातून तरून जाण्याचा संतसंग हा एकच मार्ग आहे, याच अनुभव घ्यावा. परमेश्वराच्या रम्य कथांच्या निरूपणांचा अतिप्रीतीने अस्वाद घ्यावा आणि संसारांत राहून स्वता:चा उध्दार करून घ्यावा. माया असूनही सर्वकाही नाही ही क्षणभंगूरता विचाराने समजून घ्यावी.
अभंग---१८२
ज्या जैसी संगति त्या तैसीच गति । समागमें रीति सर्वकांहीं सर्वकांहीं घडे संगती गुणें । साधूचीं लक्षणें साधुसंगे साधुसंगें साधु होइजे आपण । रामदास खूण सांगतसे
भावार्थ---
ज्याची संगत जशी असेल त्या प्रमाणेच तो वागत असतो, त्या प्रमाणेच त्याची कर्म गती ठरते. सर्वकांही जे चांगले, वाईट घडते ते संगतीच्या गुणांमुळेच घडत असते. साधूंच्या संगतीने साधक साधू बनतो असे संत रामदास स्वप्रचितीने सांगतात.
अभंग---१८३
दुर्जनाचा संग होय मना भंग । सज्जनाचा योग सुखकारी सुखकारी संग संतसज्जनाचा । संताप मनाचा दुरी ठाके दुरी ठाके दु:ख सर्व होय सुख । पाहों जातां शोक आढळेना आढळेना लोभ तेथें कैंचा क्षोभ । अलभ्याचा लाभ संतसंगें संतसंगें सुख रामीरामदासी । देहसंबंधासी उरी नाही
भावार्थ---
दुर्जनांचा संग मनोभंग करणारा असतो तर सज्जनांचा सहवास सुखकारी आहे कारण त्या मुळे मनाचा संताप नाहिसा होतो, दु:ख दूर होते, शोक नाहीसा होतो. संत सहवासात मन लोभातीत होते आणि निर्लोभी मन क्षोभापासून मुक्त होते. संताप, दु:ख, लोभ व क्षोभ नाहिसे करून निरामय शांती सुखाचा अलभ्य लाभ संतसंगामुळे घडून येतो. त्या मुळे देहबुध्दी विलयास जावून आत्मसुखाचा लाभ होतो असे श्रीरामी मन गुंतलेले संत रामदास आत्मप्रचीतीने सांगत आहेत.
अभंग---१८४
प्रवृत्ति सासुर निवृति माहेर । तेथे निरंतर मन माझें माझे मनीं सदा माहेर तुटेना । सासुर सुटेना काय करूं काय करूं मज लागला लौकिक । तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मजचि देखतां । प्रेत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं प्रेत्न संतसंगेंविण । रामदास खूण सांगतसें
भावार्थ---
संत रामदास म्हणतात, साधकाच्या जिवनांत सासर हे प्रवृत्तिसारखे असून माहेर हे निवृत्ति प्रमाणे आहे. नववधूला माहेरची ओढ अनिवार असते कारण तेथें संसारातिल दु:ख काळजी, चिंता या पासून मुक्तता असते तर सासर हें प्रवृत्तिसारखे आहे, सासरच्या जबाबदार्यां पासून सुटका नाही. संसारांत राहून सतत लौकिकाचा विचार करावा लागतो त्यामुळे निवृत्तिचा विवेक दूर जातो, जसे स्त्री ला माहेर पारखे होते, प्रयत्न करुनही विवेकाचा मार्ग सापडत नाही हा विवेकाचा मार्ग केवळ संताच्या संगतिनेच सापडू शकेल असे संत रामदास अनुभवाने सांगतात,
अभंग---१८६
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु । भूतांचा विरोधु जेथ नाहीं कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो । सदा नि:संदेह देहातीत । जया नाहीं क्रोध जया नाहीं खेद । जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूचीं लक्षणें अति सुलक्षणें अभ्यासावीं
भावार्थ---
पूर्ण बोध असलेला साधू कसा ओळखावा याची लक्षणे संत रामदास या अभंगात सांगत आहेत, सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेमभाव असणें, कोणताही वैरभाव नसणे हे साधूचे प्रथम लक्षण आहे. तो पूर्णपणें नि:संदेह, संशयातित असतो तसेच त्याची देहबुध्दी संपूर्ण नाहीशी झालेली असते, खेद आणि राग या पासून मुक्त असून कांचनाचा (पैशाचा) अजिबात मोह नसतो. या सुलक्षणावरुन खरा साधू आओळखावा.
अभंग---१८७
आमुचे सज्जन संत साधुजन । होय समाधान तयांचेनि तयांचेनि संगे पाविजे विश्रांति । साधु आदिअंतीं सारखेचि सारखेचि सदा संत समाधानी । म्हणोनियां मनीं आवडती आवडती सदा संत जिवलग । सुखरूप सदा संग सज्जनांचा सज्जनांचा संग पापातें संहारी । म्हणोनियां धरी रामदास
भावार्थ---
या अभंगात संत रामदास म्हणतात, आपले संत हे सज्जन असे साधुजन आहेत, त्यांच्या सहवासाने मनाचे समाधान होते, मनाला शांतता लाभते. संत सदासर्वकाळ सारखेच समाधानी असतात त्यां मुळे ते जिवलग मित्रा प्रमाणे आवडतात, त्यांचा सहवास सुखदायी असतो. संताचा सहवास पापनाशक असतो म्हणून आपल्याला तो आवडतो असे संत रामदास म्हणतात.
अभंग---१८८
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती । जयाकारणें कष्टती रामदास म्हणे भावें । वेगीं संता शरण जावें
भावार्थ---
साधक परमेश्वर प्राप्तीसाठी पर्वतांची शिखरे, कडेकपारी धुंडाळतात, नाना शास्त्रांचा अभ्यास करतात त्या साठी खूप कष्ट करतात. संत रामदास सांगतात, आपल्याला संतसंगती मुळेच परमेश्वर प्राप्ती झाली. पूर्ण भक्तिभावाने संतांना शरण जाणे हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे,
अभंग---१८९
ब्रह्मादिकांसी दुर्लभ । देव भक्तांसी सुलभ थोरपणे आढळेना । जाणपणासी कळेना नाहीं योगाची आटणी । नाहीं तप तीर्थाटणी दास म्हणे साधूविण । नानासाधनांचा शीण
भावार्थ---
ब्रह्मा, विष्णु, महेश या देवांना मिळण्यास कठिण असलेला परमात्मा साध्याभोळ्या प्रेमळ भक्तांना मात्र सुलभ असतो कारण मोठेपणाचा अहंकार व ज्ञानाचा गर्व नसतो. भक्तांना योग, याग, यज्ञ, तप तीर्थयात्रा यांपैकी कोणतेही साधन आवश्यक वाटत नाही. संत रामदास म्हणतात, संत सज्जनांच्या कृपेशिवाय हा सर्व साधनांचा आटापिटा व्यर्थ आहे.
अभंग---१९०
संतांचेनि संगे देव पाठीं लागे । सांडूं जातां मागें सांडवेना सांडवेना देव सदा समगामी । बाह्य अंतर्यामीं सारिखाचि सारिखाचि कडाकपाटीं खिंडारीं । गृहीं वनांतरीं सारिखाचि सारिखाचि तीर्थ सारिखाचि क्षेत्री । दिवा आणि रात्रीं सारिखाचि सारिखाचि अंत नाहीं तो अनंत । रामदासीं किंत मावळला
भावार्थ---
संतांच्या संगतित असतांना देव सतत भक्तांचा पाठिराखा असतो, त्याला पाठिमागे सोडून जाऊ म्हटले तरी सोडवत नाही. देव सतत बाहेर व अंतरंगात सामावलेला असतो. पर्वताच्या शिखरावर, कडे व कपारिमध्ये, वनांत व घरांत तो नेहमीच सोबतिला असतो. दिवस रात्री, तीर्थक्षेत्रीं हा परमेश्वर संतांच्या संगतीत असलेल्या भक्तांची साथ सोडत नाहीं.