रामदासांचे अभंग - १६१ ते १७०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.
अभंग--१६१
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां
भावार्थ--
हा शेवटचा अभंग म्हणजे संत रामदासांनी केलेली रघुनायका ची प्रार्थना आहे. चारच छोट्या ओळींची ही प्रार्थना मन आकर्षित करते. सदा सर्वदा आपणांस रामाचा योग घडावा, रामाचा कार्यासाठी हा देह कारणी लागावा, गुणवंत अनंत राधवानें आपली उपेक्षा करू नये हे एकच मागणे ते रघुनायका कडे मागतात.
अभंग ---१६२
दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन पाहों जातां माया नासे । द्वैत गेलें अनायासें होतां बोधाचा प्रबोध । जाला शब्दाचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें । वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहजसमाधि रामरामदासी वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य
भावार्थ ---
रामचरणाशी मन एकाग्र होतांच मनाचे उन्मन होते म्हणजेमन अधिक उन्नत होते. मी तू पणा विलयास जातो. संसाररुपी माया विरून जाते. मनाला झालेल्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होते पण त्या अनुभवाचे वर्णन करण्यास शब्दच सापडत नाही. ज्ञानाचे विज्ञान होऊन वृत्तिची निवृत्ति होते. ध्यानधारणेची पुढील पायरी म्हणजे सहज समाधी अवस्था प्राप्त होते. संत रामदास म्हणतात कीं, जे बोलून व्यक्त करायचे ते पुढे अनिर्वाच्य होते. रामरुपाशी एकरूप होण्याचा हा अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही.
अभंग--१६३
ज्ञानेविण जे जे कळा । ते तें जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला । चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानची सार्थक । सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण
भावार्थ---
या अभंगात संत रामदास ज्ञानाची महती सांगत आहेत. ज्ञानाशिवाय जे जे प्रयत्न ते सर्व विफल होत, असे प्रत्यक्षभगवंतांनी सांगितले आहे आणि हे बोल चित्तात धारण केलेपाहिजे. ज्ञानामुळे सर्व कर्माचे सार्थक होते, त्या शिवाय सर्वनिरर्थक होय. संत रामदास म्हणतात ज्ञानविहीन प्राणी म्हणजे केवळ पाषाण होय.
अभंग ---१६४
पतित म्हणिजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप एकरूप देव अरूप ठायींचा । तेथें दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरूपीं पाहतां । विचारें राहतां सुख आहे सुख आहे मूळ आपुलें शोधितां । मनासी बोधितां रामदास
भावार्थ---
रामापासून जो अलग झाला तो पतित व परमात्याशी जो एकरूप झाला तो पावन झाला. म्हणुनच परमात्म्याला पतितपावन म्हणतात. देव आणि भक्त जेव्हां एकरूप होताततेव्हां तेथे दुजेपणाचा लोप होतो. देव हे भक्ताचे मूळ स्वरूपआहे या विचारांत सतत रममाण होऊन राहणे यातच खरे सख आहे. आपण कोठून आलो व आपल्या जीवनाचे प्रयोजनकाय याचा बोध करुन घेण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे संत रामदास स्वप्रचिती घेऊन सांगत आहेत.
अभंग---१६५
ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी । व्यर्थ कां जालासी भूमिभार भूमिभार जिणें तुझें गुरूविणे । वचनें प्रमाणें जाण बापा जाण बापा गुरूविण गति नाहीं । पडसी प्रवाहीं मायाजाळीं मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा । जन्मभरी ओढा ताडातोडी कांही ताडातोडी काही राम जोडी । आयुष्याची घडी ऐसी वेंचीं ऐंसी वेंचीं बापा आपुली वयसा । दास म्हणे ऐसा काळ घाली
भावार्थ----
संत रामदास या अभंगात सद्गुरूचा महिमा वर्णन करीतआहेत. ज्याच्यामुळे हा जीवन प्रवाह सुरळीत चालला आहे त्याचेच स्मरण करायला विसरणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय. भूमिभार होऊन जगणे आहे. गुरूकृपेशिवायजीवन निरर्थक आहे हे वचन प्रमाणभूत आहे. सद्गुरूशिवायजीवनाला गती नाही कारण संसाराच्या मायारूपी बंधनापासून सुटण्याचा गुरूकृपा हाच एक मार्ग आहे. याचाविचार न करता आपण अविचाराने या मायाजाळांत गुंतून पडतो आणि सगळा जन्म ओढाताणित व्यर्थ घालवतो. कांहीकाळ संसारातिल कर्तव्य व कांही वेळ रामभजनी लावावाव मानव जन्माचे सार्थक करावें असे संत रामदास सांगतात.
अभंग ---१६६
विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे चंचळपणें मन न करी विषयध्यान । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण । गरुकृपे वांचुनि नव्हे नव्हे भक्तिज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे रामीरामदास म्हणे निर्गुणसुख लाधणे । गुरूकृपे वाचुनि नव्हे नव्हे
भावार्थ ----
इंद्रियांवर निग्रहाने संयम मिळवून त्यांना विषयांपासून विरक्त करणे, मनाचा चंचलपणावर मात करून त्याला विषयाचे ध्यान करण्यापासून परावृत्त करणे, बुध्दी परमात्मस्वरुपाचा बोध करवणारी असून तिच्या सहाय्याने परब्रह्माचा अनुभव घेणे, सप्रेम भक्ति, ज्ञान, वैराग्य या सर्वांचा पारमार्थिक लाभ होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचीनितांत गरज असते. संत रामदास म्हणतात सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलिकडे जाऊन निर्गुणसुख लाभणे केवळ गुरूकृपेनेच शक्य होईल.
अभंग---१६७
सगुण हा देव धरावा निश्चित । तरी नाशवंत विश्व बोले विश्व बोले एका भजावें निर्गुण । परी लक्षवेना काय कीजे काय किजे आतां निर्गुण दिसेना । सगुण असेना सर्वकाळ सर्वकाळ गेला संदेहीं पडतां । कोणे वेळे आतां मोक्ष लाभे मोक्ष लाभे एका सद्गुरूवचनें । आत्मनिवेदनें रामदासीं
भावार्थ---
या अभंगात संत रामदास साधकाच्या मनातिल संदेह वत्यावरील उपाय सांगत आहेत. सगुणाची उपासना करावी असा निश्चय साधक मनोमन करतो परंतू परमेश्वराचे सगुणरूप नाशवंत असून त्याची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचीउपासना करावी, त्याचे भजन करावे असे मत लोक बोलून दाखवतात त्या मुळे साधक द्विधा मनस्थितीत सापडतो. निर्गुणाचे भजन करावे तर ते रूप डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही आणि सगुणरूपही सदासर्वकाळ दिसत नाही तरकाय करावे या संभ्रमात सर्वकाळ निघून जातो आणि आतां केव्हां मोक्ष मिळेल अशी विवंचना मनाला ग्रासून टाकते. संतरामदास म्हणतात एका सद्गुरूवचनावर पूर्ण विश्वास ठेवून, संपूर्ण शरणागती पत्करून आत्मनिवेदन भक्तीने परमेश्वरचरणी लीन होऊन मोक्ष मिळवावा.
अभंग ---१६८
गरुविण प्राणी त्या होय जाचणी । सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला अंती यमघाला चुकेना की चुकेना की यमयातना या जना । वेगीं निरंजना ठाईं पाडा ठाई पाडा वेगीं निरंजन । लावा तनमन सद्गुरूसी सद्गुरूची नाहीं जयाला ओळखी तया झोंकाझोंकी यातनेची यातनेची चिंता चुके एकसरी । वेगीं गुरू करी दास म्हणे
भावार्थ---
संत रामदास या अभंगात प्रतिज्ञेवर सांगतात की, गुरूशिवाय कोणत्याही माणसाला यमयातना चुकवता येणार नाहीत. निरंजन परमेश्वराची प्राप्ती सद्गरूशिवाय शक्य नाही. यासाठी तनमनधनाने सद्गुरूची उपासना केली पाहिजे. सद्गुरूकृपेने यमयातनेची चिंता तात्काळ निरसून जाईल यासाठी संत रामदास लवकरात लवकर गुरूचरणांचा आश्रय घेण्यास सांगत आहेत ।
अभंग---१६९
आमुचा तो देव एक गुरूराव । द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें गुरूने व्यापिले स्थिर आणि चर । पहा निर्विकार कोंदलासे रामीरामदास उभा तये ठाई । माझी रामाबाई निर्विकार
भावार्थ----
या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू श्री रामाचा महिमासांगत आहेत. आपले सद्गुरू श्रीराम हे एकमेव अद्वितियअसून तेथे द्वैताला जागाच नाही. त्यांनी सर्व चराचर व्यापले असून त्यांत ते निर्विकारपणे सामावले आहेत. संत रामदासम्हणतात आपण श्रीरामांच्या निराकार स्वरूपाशी एकरूपझाले आहोत.
अभंग---१७०
श्रीगुरूकृपाज्योती । नयनीं प्रकाशली अवचिती तेथे कापूस नाही वाती । तैलविण राहिली ज्योती नाहीं सम ई दिवे लावणे । अग्निविण दीप जाणे रामीरामदास म्हणे । अनुभवाची हे खूण
भावार्थ--- संत रामदास म्हणतात, श्रीकृपेची ज्योती माझ्या लोचनांत अचानक प्रकाशित झाली. कापूस, वाती आणि तेलाशिवायतेवणारी ही असामान्य ज्योती आहे. दिवा व अग्नीशिवाय प्रकाश देणारी ही कृपेची ज्योत म्हणजे दैवी अनुभवाची खूण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : March 11, 2023
TOP