राम राम श्रीराम स्मरणकर हाच सुखाचा मंत्र खरा । हा भव हारक, हा भव तारक, नेईल तुजला पैलतिरा ॥धृ॥
या मंत्राने शबरी तरली सति आहिल्या पावन झाले, रामबाण ही कारण झाले, दशाननाच्या उद्धारा ॥१॥
या मंत्रीची ही पुण्याई, वाल्या कोळी वाल्मिकी होई, मरा मरा नित जपता, राम राम ये उच्चारा ॥२॥
राम राम नित वदता वाचे, काय कुणाचे काही वेचे, अलंकार हा बिनमोलाचा, शोभा देईल तव शरीरा ॥३॥
राम तात अन राम माउली, भव तापावर राम सावली । राम दयाधन राम कल्प तरू राम पावली तुज थारा ॥४॥
जळी स्थळी मज राम दिसावा, रामावीण ना छंद असावा, श्री रघुनाथा, दीन अनाथा, ध्यास असा नित हृदयी धरा ॥५॥