कांते, या जगतीं जरी मिरविती लावण्यगर्वाप्रती
कोट्यादि युवती तरी न तव ती लाभे तयांना मिती,
नेत्रां या दिसती न त्या तुजपरी, लाजे जरी त्यां रती,
प्रेमांधत्व म्हणोत या जन, रुचे अंधत्व ऐसें अती.
लोकीं मोहविती शशी, कमलिनी, रत्नें असें सांगती,
ओवाळीन तुझ्यावरोनि सकलां नाहीं तयांची क्षिती;
त्वत्प्रेमें कमलास ये कमलता, इंदूस इंदुत्व ये,
रत्ना रत्नपणा, तुझेविण असे निस्सत्त्व सारें प्रिये !
जादूनें जन वेड लाविति नरां ऐसें कुणी बोलती,
सारे ते चुकती जरी न नयनीं जादू भरे या अती;
कांते, तूं असशी खरी कमलजा, अन्या न मी ओळखीं,
सारा सद्गुणसंघ बिंबित तुझ्या आदर्शरूपी मुखीं.
द्यावें आयु मला तुझ्यास्तव करीं ऐसा प्रभूचा स्तव,
त्वद्भिना यदीय काव्यरस हा प्रत्येकिं ओथंबला.
दिव्ये, काव्यमयी प्रिये, सह्रदये, मज्जीवितैकेश्वरी,
मच्चिंताश्रमखेदनाशिनि, सखे, मत्सौख्यतेजस्सरी,
ती सप्रेम विलोकितां, वदत हें, कांता उरीं लाविली,
त्याचें तत्त्व कळे तुलाच सखया, ज्या सत्प्रिया लाभली