मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
आईकडे न्या !

आईकडे न्या !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कोवळीं फुलें वाळलीं कोवळ्या गालीं;

'मज आइकडे न्या' म्हणे, आसवें आलीं.

उरिं धरा, कांहिंही करा, न हासे-खेळें;

'मज आइकडे न्या' असें सोनुलें बोले.

चहुंकडे घेउनी कडे फिरविलें त्यास,

''मज आइकडे न्या' ! खळचि नसे तोंडास.

'सोनुल्या, छान बाहुल्या आणि घे घोडे'

'मज आइकडे न्या' गोष्ट न अपुली सोडे.

'खाउ घे, रहा पण उगें ! किती समजावूं ?'

'मज आइकडे न्या' म्हणे - काय त्या खाऊ ?

माउची, चिउ-काउची कहाणी सांगे

'मज आइकडे न्या' एक, पाठिला लागे,

काउची, गाउ-बाउचीं गाइलीं गाणी;

'मज आइकडे न्या' मनीं न दुसरें आणी.

'किती लांब मुला, तें गांव जिथे गेली ती !'

'मज आइकडे न्या' गोष्ट एक पहिली ती.

'वांकड्या मधें टेकड्या, नद्या, किति रानें !

घे ऐकुनि, 'आईकडे न्याच' परि गाणें.

किति किती योजिल्या रिती तया रिझवाया !

'मज आइकडे न्या' दुसरें सारें वाया.

भगवान ! वांचती प्राण कसे तरि त्यांचे

जग सोडुनि जाती आइबाप हे ज्यांचे ?

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - भूपति

ठिकाण - इंदूर,

दिनांक -१८ जून १९०७

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP