तूं हुबेहूब साउली त्याच मूर्तिची
हरपली दिवंगत झाली जी मूर्ति साउली तिची,
भटकतां विदेशीं दीन हीन जी मुली,
कधिंकधीं मनोमय ऐशा स्वप्नभूमधें भेटली.
संपला दिवस, गे अतां सांज जाहली;
कधिं घोर रात्र ये ऐशी हुरहूर जया लागली,
त्याचिया उषेचें चित्र, तया दाविशी !
का जन्मभरी रचिली गे ती घडी अंतिं मोडिशी ?
तें विकसित कमलापरी बिंब, ती प्रभा
सौवर्ण शरांसम हा हा ! ते किरण झोंबती नभा;
तें हरित पल्लवांतील मंजु कूजन,
उघडणें नयन वेलींचें, तें त्यांचें आंदोलन !
आवरीं, आवरीं मुली ! जाइं निर्दये !
जाईल जीव हा माझा पाहतां चित्र तें बये !
लाविलें दर जखडोनि , कुलुप घातलें,
तें वाद्य उघडुनी हा हा ! कळ फिरवूं मन धावलें.
गत सूर ऐकतां भान न उरलें मुली,
जा ! पुरे करीं तव माया, हा हाय हद्द जाहली !
चळ भरला म्हणशिल मला खरें तें मुली,
विसरूनि मला मी गेलों पाहूनि तुला या स्थळीं.
बालार्क-किरण हे तुला न्हाउं घालिती,
या संध्याभेसुर छाया चहुंकडे मला घेरिती.
चढणीवर पाउल तुझें, उतरणीवरी
भरभरा पाउलें माझीं पडतात सावरीं तरी.
तुज मंडोळ्या प्रीतिच्या शोभती, परी
वांकलों मृताशाभारें वाहुनि त्या पाठीवरी.
यापरी कोण तूं, कोण मीहि आठवें;
जें मेलें गेलें त्याचें भूत गे कशाला हवें ?
जा ! जाइं इथोनी, सुखें मरूं दे मला,
या लीला त्यास्तव राखीं जो प्रतिमदें झिंगला.
परि दया करीं त्यावरी जया भेदिशी;
नच हत्या करि कवणाची, बघ दशा होय मम कशी !
तूं नात जिची गे पणतू होउत तिला ?
रडणार कोण मजसाठीं ? नशिबास नर्क ठेविला !