मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
काळेभोर विशाळ केस

काळेभोर विशाळ केस

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


काळेभोर विशाळ केस रुळती तिच्या नितंबावरी;

तैसें भाळ विशाळ गौर झळके चंद्रापरी तें तिचें;

ते डोळे नच छे ! विलासगृह कीं माहेर चिच्छक्तिचें;

किंवा काव्यलतेवरी उमललीं हीं दोन पुष्पें तरी.

श्री ही केवळ का वसंतऋतुची येई नटोनी खरी;

किंवा मूर्तिमती प्रभात उमले; कीं फांकली पौर्णिमा;

प्रीतिज्योतिच काय ही उजळली; कीं शारदा; कीं रमा ?

वाटे ही रचितां, विहार कविता चित्तीं विधीच्या करी !

काळा, लावुनि तूं तुझी कलम या रूपास याऊपरी

रेखामात्र उणेंअधीक करुनी नाशूं नको पूर्णता;

गालीं ज्या खुलती छटा वितळती, साश्चर्य त्या पाहतां

वाटे सांठविलें कळे न किति तें सौंदर्य या अंतरीं.

पापाची स्मृति राहिली जर नरा पाहुनि ही सुंदरी,

धिग्धिक् ! त्या कळली अगाध हरिची नाहींच कारागिरी !

N/A

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार - सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - गुदरखेडा

दिनांक - फेब्रुवारी १९१०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP