तेची चिरंजीव जगीं जहाले,
हाले जयांचे मरणें धरा ही;
राही जयांचें यश शुभ्र येथे,
येतें जयांचे स्मरणें दृगंबू.
झंझानिला वा अशनिप्रपाता,
पातालभेदीहि नदीपुरांना,
रानांतल्या चंड दवानला जे
लाजेप्रती लाविति हिंस्त्र जीवां,
ऐशा महाक्रूर नराधमांना
मानार्थि, केव्हां न जुमानुनीया,
मानूनिया केवळ देशमाता,
माथां तिला वंदुनि मात्र लोकीं,
वेल्हाळ कांता गृहिं सोडुनीया
तोडोनिया जे धन मोहजाला,
ज्याला रुची अन्न असें त्यजोनी
यजोनि तेजा निजदेशकार्यीं
उग्रारिशीं झुंजुनि झुंजुनी जे
नीजेस ठेले समरांगणात
गणाग्रणीं रोवुनिया ध्वजाते;
ज्यांतें अरीही स्तविती मनांत
ये वास त्यांच्या जरि त्या शवांशी,
शिवा शिवो क्षुद्रहि भक्षणार्थ,
क्षणार्ध भीत्यार्त अरी तयांना
यानांस बांधोनि निघो स्वदेशा;
हालाहालप्राय अरी शिरांना
रानांत फेको, स्वपुरा हरो वा
रोवावयालागि शिरें स्वदुर्गा,
दुर्गावली त्यांस करो खुशाल.
अरीस होवो बघुनी प्रमोद,
आमोद त्यांचा तरि सर्वदाही
दाही दिशा व्यापुनिया उरेल,
भरेल चित्तीं निजदेशजांच्या.
विभूति त्यांच्या धरणीप्रदीप,
प्रदीपतील स्वसुतीं स्वतेजां,
ते ज्या करीं होति विदेहधारी
धारीं असीच्या चिरण्या अरी ते.
न मानवां केवळ ते सजीव,
निर्जीव वारी, गिरि, पादपाशीं
पाशीं उभे ते गमती सदैव,
सुदैव त्यांच्या जननीपित्यांचें !
ज्यां पूत केलें निजवारिपानें
पानें दुरी सारुनिया करांनीं
रानीं झरे ते अतिदीनवाणी
वाणी करोनी रडती तयांना !
तत्पादधूली शिरी पुष्पमाना
मानावली ज्यां गिरिराज ते ज्यां
स्वजातवारिप्रबलीं रवांनीं
वानीत गातील सदैव त्यांना.
छायेंत ज्यांच्या बसुनी कदा ते
दाते सुखाचे गमले जयांस
जयांस त्यांच्या दंव-आसवांनीं
वानीत गातील तरु प्रभातीं.
आश्चर्य तें काय जरी प्रबंधीं
बंदीजनें गाउनिया यशाला
शाला स्वभू केलि गुणां शिकाया
काया विनाशी झिजवावयाच्या
रणार्क राणा मृत का 'प्रताप'
प्रताप तापप्रद यद्रिपूतें ?
पूतं रिपूनें प्रबलें जयाच्या
यांचा करोनी बहुमान केला !
तेजोबलौदार्यगुणानुपेत
न पेटते ज्योति अजून कां ती ?
कांती तयांची तनुजांतरंगीं
तरंगिलेली न दिसे कुणाला ?
अशांस ये मृत्युहि मृत्युहीन,
हीनां अम्हां मृत्युच जीवनांत.
वनांत थोडें तृण होय तें का,
तें काय हाले न डुले न किंवा ?