या क्षिप्रा-चमळा परस्पर कशा आलिंगिती धावुनी !
आला हा गिरि आडवा, बघ कशा याला त्रिधा भेदिती !
याचे हे तुकडे तटांवर, तसा मध्यें त्रिकोणाकृती
होवोनी तट भव्य उंच दिसती; शोभा प्रिये, हो दुणी.
आतां मूक उभे पुकार करिती सार्या जगालागुनी
"प्रेमाचें भरतें अनावर ! बघा ही आमुची दुर्गती !"
आहाहा किति रम्य संगम ! गमे श्री-शारदा भेटती,
किंवा या भगिनीच गीति-कविता आसक्त आलिंगनीं-
सांगूं याहुनि काय ? भिन्न कुलिं गे पावोनिया संभवा
तूं मी ज्यापरि भेटलों मिसळलों, गे एक झालों सखे.
येथें रम्य गभीर भीषण अशा या सृष्टीच्या वैभवा
वाटे शांति भुलोनिया पसरली, ती ही निजे का सुखें ?
आरोळ्या पिटतों मदें, शिशुपरी नाचोनि मी या स्थळीं,
संवादीच, गभीर, खोल घुमते आरण्य शब्दावली.