जागशी जरी सुकुमारी हे कुमरि, उघड या दारा.
शेवटला देत पहारा ये पहाटचा वर तारा. ध्रु०
तोडोनि मोहमायेतें
करिं धाइ वनीं जायातें;
राहुं दे शालुशालीतें,
राहू दे तुझ्या मणिहारा. १
पळ खरा कठिण मज कळतें,
सोडुनिया नातेंगोतें
जायचें घोर रानातें
कळ सोस करूनि विचारा. २
विकतिल तुज दादा आई,
गृह शून्य, गृहिं न या राहीं,
येथे सुख पळभर नाहीं-
सोड ही मनोहर कारा. ३
नरमांसा टपती रानीं
पशु, बरे राक्षसाहूनी
विकती जे जरठा तरुणी-
निजमांस नेति बाजरा. ४
तुजसाठीं सोडुनि माया
जाहलों सिद्ध टाकाया
गणगोत, मित्र सर्वां या-
सुंदरी, तशा घरदारा. ५
तूं जिथे, सदा सुख तेथे
तूं जिथे नगर वनही तें;
तूं जिथे दरी घर मज तें,
चल वनीं थाटुं संसारा. ६
नभ निर्मल जीवित्वाचें
जरि भाळीं नाहीं अमुचे;
हरिचाप होउं मेघाचें;
चल एकमेक कांतारा. ७