शैशवदिन जरि गेले निघुनी
निर्मळ किति तरि ती शिशुहूनी !
छबि जरि खुलली नसांनसांतुनि
ह्रदय विशुद्ध अती. १
मास दिवस सुखिं भितचि लोटतां
होइल विकसित रति मनिं आतां;
गुलाब उकली ह्रन्मधु, स्वता
वसंतमृदुकिरणीं २
ऐसें वाटे आम्हांला जरि
तरी हरीची रचना दुसरी;
दिव्य नभोज्योति ती सुंदरी
केवि धरेस पचे ? ३
बाल्यदशाचि न जोंवरि सरली
तोंचि अहा अंतर्हित झाली !
हाय हाय ! ती गेली गेली !
काय अतां उरलें ? ४
घनपल्लवयुत तरुराजींतुनि,
पक्षिगानही जातें लोपुनि,
मधुर हास्यही वदनावरुनी
याचपरी वितळे. ५