रात्रीं शांत निवांत विश्व वश हें निद्रेस झाल्यावरी
निद्रा घालित झांप ये मजवरी, तीतें दुरी सारुनी
काळाचा पडदा वरी उचलुनी गाढांधकारांतुनी
पर्यंकाभवती मुखें प्रकटती निश्शब्द जादूपरी.
दादा, एक म्हणे; दुजें प्रिय सख्या; बाळा तिजें; यापरी
प्रेमें बोलविती मला रिझवुनी तीं मूख संबोधनीं;
पर्यंकावरुनी मला उचलुनी गाढांधकारांतुनी
मंत्रें मोहुनि पाडुनी भुरळ तीं नेती क्षणार्धीं दुरी.
विश्वातें गिळितां तमें उजळती जी ज्योती तीं अंतरीं,
तेणें विस्मृति-अंधकार जळतां, शांत प्रभा फांकुनी
जी रम्या गतसृष्टि द्रुष्टिपथिं ये तीमाजि संचारुनी,
मी माझ्या मृत संसृतींत मिसळें एका क्षणाभीतरी.
आहाहा ! गतसृष्टि सोडुनि जडीं सृष्टींत या येउनी
देवा, तीं गुज सांगतील निज का केव्हां मला भेटुनी ?