सात

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


[ शिवाजीचा सेनापति प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव करून तो पळाला. शिवाजीला ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भर्त्सनात्मक पत्र लिहिले. ते वाचून आलेल्या उद्‌वेगाच्या आवेशात प्रतापरावाने सात सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला. वेड्या प्रयत्‍नामध्ये ते सातही वीर प्राणास मुकले. कवीतेची सुरवात शिवाजीच्या पत्रापासून आहे.]

वेडात मराठे वीर दौडले सात !

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता

रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता

अबलाहि घरोघर खर्‍या लाजतिल आता

भर दिवसा आम्हा दिसू लागली रात"

वेडात मराठे वीर दौडले सात !

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दील

माघारी वळणे नाहि मराठी शील

विसरला महाशय काय लाविता जात ?"

वेडात मराठे वीर दौडले सात !

वर भिवई चढली दात दाबती ओठ

छातीवर तुटली पटबंदाची गाठ

डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ

म्यानातुन उसळे तरवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात !

"जरि काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ

जरि काल विसरलो जरा मराठी जात

हा असा धावतो आज अरी-शिबिरात

तव मानकरी हा घेउनि शीर करात"

वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले

सरदार सहा सरसावुनि उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीच मेघ सात निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळात सात दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग आग बाजूंनी,

समशेर उसळली सहस्त्र क्‍रूर, इमानी,

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा

अद्याप विराणि कुणि वार्‍यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३६


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP