घट तेजाचे भवती ओतित
असंख्य रवि-राजाचे प्रेषित
महाद्वार पूर्वेचे खोलुन क्षितिजावर येती !
चराचरांचे घेउन जीवन
करात, उदयाद्गीवर मागुन
टाकित पद गंभीर येतसे परमेश्वरमूर्ती.
आणि प्रभूचे आरुण, मंगल
पडता क्षितिजावरती पाउल
अग्निरसाच्या उठू लागल्या लाटा भूवरती.
देवाचा कर जाता स्पर्शुन
मेघखंडही दुभंग होउन
ज्योती उज्ज्वल निघुनी आतुन गगना आक्रमती.
करण्या सम्राटांचे स्वागत
नटलेली भू, नटले पर्वत
फुलातही शृंगारुन बसली नाजुक हिमवंती.
या माझ्या ह्रदयावर देवा,
पवित्र अपुले पाउल ठेवा
अद्यापी अंधार रात्रिचा रेंगाळत अंती.
राहिल चरणांची ह्रदयी खुण
उतरिल अंतरि तेजाचे कण
रात्रीमागुन रात्र येउ द्या कसली मग खंती !