कोठे हो जीवन ? जीव हो आर्त
आग ही असह्य बाहेर आत
कोठे ना सहानुभूति
कोठे ना स्नेह ना प्रीति
कोठेहि संगत सोबत नसे
एकान्त काळिज पिंजत बसे.
वाहतो नेहमी उनाड वारा
व्यापवी धुळीने प्रदेश सारा
ओततो रवि तो आग
कठोर रात्रीचा राग
कठोर कधी त्या पाऊसधारा
कापीत कापीत जातात उरा.
वाटते बुल्बुल कोयळ यावे
मंजुळ संगीत तयांनी गावे
जीवन-जाणीव सारी
विरावी घटकाभरी
येऊन कधी ते घुबड मात्र
भीषण भासवी अधिक रात्र.
वसंत येताच उल्हास वाटे
फुलेल वेल का एखादी कोठे
पाहीन फुलांच्या हारी
वेडीच आशा ही परी
येतात जातात वसंत किती
राहते भूमि ही तशीच रिती.
आहे का खरेच नंदनवन
फुलांचे रान अन् खगांचे गान
निर्मळ जलाचा झरा
सुगंधी शीतल वारा
शल्य हे अधिक वा खुपण्याला
केलेली कोणी ही कल्पना-लीला ?
कोठे ना जिवास मायेची ओढ
नाही वा मुळीहि ध्येयाची जोड
सार्थता जीविता नाही
भकास दिशा या दाही
कशास आयुष्य देवा, इतुके
शतकामागुन जाती शतके !