आवर पद हे मत्त प्रवासी,
पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्
घेत सुगंधाचा मागोसा
अलीपरी आलास विलासा
आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्
प्रवासी, पहा जरा परतून्
कलेकलेने चान्द खरोनी
आवस आली माझ्या गगनी
तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्
प्रवासी, पहा जर परतून्
आणि चान्दणे सवे घेउनी
दुणावुनी तम जासी निघुनी
कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्
प्रवासी, पहा जरा परतून्
क्षणभर येउन क्षणभर राहुन
क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन
क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून
प्रवासी, पहा जरा परतून्
वाळवण्टि तू एक पदाती
ना कुणि सोबत ना साङ्गाती
पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्
प्रवासी, पहा जरा परतून्
परत पाखरा, खन्त कशाला
घालिन तनुची तुला दुशाला
उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्
प्रवासी, पहा जरा परतून्
जाणारच का-सुखात जा तर
बाग मोहरो तव वाटेवर
माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्
प्रवासी, पहा जरा परतून्
शेवटले जा पान मिटू दे
सुखेनैव यापुढे तुटू दे-
ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून
प्रवासी, पहा जरा परतून्