नदीकिनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात
अन् पर्णाची जलराणीवर उधळी बरसात !
लतालतांवर खोलुनि बसली फुले अन्तरङ्ग
लुटण्या ते मधुकोश रुंजती भवताली भृंग
कडेकपारीवरुनी दौडत निर्झर हा आला
कुजबुज काही करी नदीच्या बिलगे ह्रदयाला.
आकाशातुन घनश्याम आळवती धरणीला
आणि सखीच्या गळा घालती मोत्याची माला.
कणाकणातुन घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत
ऐकू येइल सुखमय मंगल प्रेमाचे गीत.
ग्रहतार्यांचे रासनृत्य हो गगनी दिनरात
पक्षापरि सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात.
विसरुनि वैकुंठातिल यास्तव आसन श्रीमन्त
ह्रदयाह्रदयांमधून राहू लागे भगवन्त !