भांडार प्रीतिचे भरले, का धनचिंता,
दशदिशा चांदणे, का पणतीस्तव झुरता,
आकाश-पथातुनि नक्षत्रापरि फिरता
घरट्याचा केवा कशास प्रणय-भ्रांता !
डोहावर देउळ चिराचिरा खळलेला,
पारावर वरतुन पाचोला पडलेला,
तो कळस कोसळुन अर्ध्यावर अडलेला,
मूर्तीला बिलगे तरी कुणाची माला !
तू ऐसे गडी वा पडशाळेच्या कोनी,
तू नीज परांवर वा पर्णावर रानी,
फुलरास फुलो वा फुलो निखारा चरणी,
तू राजा आणिक तुझी प्रिया; मी राणी !