तू उंच गडी राहसि गे राजकुमारी,
रानात फिरे गाळित मी घाम दुपारी !
प्रीतीस तुझ्या पात्र न हा दीन दरिद्री
शब्दास्तव सम्राट तुझ्या तिष्ठति दारी
आकाशि भिडे ती तव गर्वाढ्य हवेली
कङ्गाल कुटी केवळ ही दौलत सारी
सुग्रास तुझे भोजन पात्रात रुपेरी
कष्टार्जित थाळीत इथे मात्र जवारी
विश्रान्ति तुला मंचकि देतात दुशाला
बाहूच उशाला मज भूमीच पथारी
वाळूरणि ओढीत असे जीवन-रिक्षा
पुष्पाकुल भूमीत तुझा मार्ग किशोरी
काव्यातिल कोमेजुन जाईल फुलोरा
अन् कण्टक येतील करी मात्र विखारी
स्वप्नांसह जाईल सखे, रात्र सरोनी
येता रवि माथ्यावर संपेल उभारी
तू हंस निवासास तुझ्या योग्य हिमाद्री
साहेल कसे जीवित या रुक्ष पठारी !