विद्याऽविद्ये मम तनू विद्ध्युद्धव शरीरिणाम् ।
मोक्षबंधकरी आद्ये मायया मे विनिर्मिते ॥३॥
निजबोधें येत बोधा । ब्रह्माहमस्मि स्फुरे सदा ।
ते जाण शुद्ध विद्या । जें अविद्याछेदक ॥९८॥
मी पापी मी सदा निर्दैवो । ऐसा नित्य स्फुरे भावो ।
तेचि सबळ अविद्या पहा हो । जे नाना संदेहो उपजवी ॥९९॥
एकी जीवातें घाली बंदी । एकी जीवाचें बंधन छेदी ।
या दोनी माझ्या अवस्थाशक्ति अनादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१००॥
तूं चिन्मात्र चैतन्यघन । चित्स्वरूपें वृत्तिशून्य ।
तुज शक्ती कैंच्या जाण । निर्धर्मकपणे सर्वदा ॥१॥
उद्धवा हे आशंका वाया । कारण नाहीं करावया ।
या शक्ती जन्मवी माझी माया । जे न ये आया सुरनरां ॥२॥
सत् म्हणों तरी तत्काळ नासे । असत् म्हणों तरी आभासे ।
जिने नामरूपांचें पिसें । लाविलें असे जगासी ॥३॥
नातुडे संतासंतबोली । माया अनिर्वचनीय जाली ।
तिणें विद्या-अविद्या इये पिलीं । वाढविलीं निजपक्षीं ॥४॥
आजिकाळीं केल्या नव्हती । विद्या अविद्या अनादिशक्ती ।
बंधमोक्षातें भासविती । या दोनी शक्ती मायेच्या ॥५॥
ते माया तूं म्हणसी कोण । तुझी कल्पना ते माया पूर्ण ।
बद्धमुक्तता स्फुरण । तीमाजीं जाण स्फुरताति ॥६॥
बंधमोक्षांची राहती स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती ।
ऐक उद्धवा निश्चितीं । यथानिगुतीं निवाडें ॥७॥
स्वप्नीं न देखे आराधन । ज्यासी नाहीं माझें भजन ।
अविद्या त्यामाजीं संपूर्ण । प्रबळ जाण वाढत ॥८॥
तो माझ्या ठायीं अतिसादर । भजनशीळ आठौ प्रहर ।
तेंचि ब्रह्मविद्येचे घर । तेथें निरंतर ते वाढे ॥९॥
जेथ माझ्या भजनाचा उल्हासू । तेथ अविद्येचा निरासू ।
तोचि ब्रह्मविद्येचा प्रवेशू । हा अतिविश्वासू भक्तांचा ॥११०॥
येथ बद्धाचें कारण । आणि मोक्षाचें साधन ।
भक्तीचें दृढ स्थापन-। अर्थास्तव जाण बोलिलों ॥११॥
ज्या बंधमोक्षा दोनी वृत्ती । त्या तूं मायेच्या म्हणसी शक्ती ।
तेव्हां माया जाली मोक्षदाती । हें केवीं श्रीपति घडेल ॥१२॥
जरी माया जाली मोक्षदाती । तरी कां करावी तुझी भक्ती ।
हेंचि सत्य गा श्रीपती । सांग निश्चितीं निवाडू ॥१३॥
कृष्ण म्हणे उद्धवासी । स्वयें चलन नाहीं छायेसी ।
तेवीं सामर्थ्य नाहीं मायेसी । केवीं मोक्षासी ते देईल ॥१४॥
जो मायेचा नियंता । तो विष्णु मोक्षाचा दाता ।
तोडूनि जीवाची बद्धता । सायुज्यता देतसे ॥१५॥
म्हणसी अविद्या-कामकर्मादृष्टें । जीवासी बंधन लागे मोटे ।
तें ब्रह्मविद्या-निष्कर्में तुटे । हा बोध करी नेटें गुरु श्रुतिद्वारा ॥१६॥
येथ विष्णु काय जाला कर्ता । मा तो होईल मोक्षदाता ।
हे विकल्पाची वार्ता । न घडे सर्वथा उद्धवा ॥१७॥
गुरुरूपें विष्णु जाण । श्रुत्यर्थ विष्णूचि आपण ।
शमदमादि साधन । तेंही जाण विष्णूचि ॥१८॥
शिष्यबुद्धीसी बोधकता । विष्णूचि जाण तत्त्वतां ।
यापरी गा निजभक्तां । मोक्षदाता श्रीकृष्ण ॥१९॥
त्या मोक्षाचा जो परिपाक । ते समाधि श्रीविष्णूचि देख ।
समाधीचें समाधिसुख । आवश्यक श्रीविष्णू ॥१२०॥
परमात्मा परिपूर्ण । तो मी विष्णु ब्रह्मा सनातन ।
भक्तभवपाशमोचन । कृपाळू जाण करीतसें ॥२१॥
गतश्लोकींचेनि अनुवादें । शरीरिणाम् येणें पदें ।
जीवासी बद्धपण उद्बोधे । तेंही विनोदें निवारितो ॥२२॥
एकाशीच बद्धमुक्तता । घडे न घडे तत्त्वतां ।
या उद्धवाच्या प्रश्नार्था । विशद आतां करीतसे ॥२३॥