न स्तुवीत न निन्देत कुर्वतः साध्वसाधु वा ।
वदतो गुणदोषाभ्यां वर्जितः समदृङ् मुनिः ॥१६॥
निंदेच्या तिखट बाणीं । दृढ विंधिल्या दुर्जनीं ।
हे असाधू हें नुपजे मनीं । नो बले वचनीं ते दोष ॥६८॥
भाविक सात्त्विक साधू । मिळोनि करिती स्तुतिवादू ।
तूं ईश्वरी पुरुष शुद्धु । हा गुणानुवादू ऐकोनि ॥६९॥
मी उत्तम हें नुपजे मनीं । उंच नीच नेदखे जनीं ।
हे साधु लोक भले गुणी । हे मुक्ताची वाणी वदेना ॥४७०॥
साधु असाधु पाहतां जनीं । तो ब्रह्मरूप देखे दोनी ।
देखतें देखे तद्रूपपणीं । निजात्मदर्शनीं निजबोधु ॥७१॥
तेथ कोणाची करावी निंदा । कोणाच्या करावें गुणानुवादा ।
मीचि विश्व हें आलें बोधा । स्तुतिनिंदा निमाली ॥७२॥
त्यासी आत्मसाक्षात्कारीं विश्राम । नित्य निजात्मपदीं आराम ।
साधु असाधु हा फिटला भ्रम । स्वयें आत्माराम तो जाला ॥७३॥
असाधुत्वें निंदावे ज्यासी । तंव आत्मस्वरूपें देखे त्यासी ।
साधु म्हणौनि वर्णितां गुणासी । देखे त्यासी निजरूपें ॥७४॥
उजव्या वंद्यत्वें शुद्धभावो । डाव्या निंद्यत्वें निजनिर्वाहो ।
पुरुषासी दोंहीचा समभावो । वंद्य निंद्य पाहा हो समत्वें तैसे ॥७५॥
तेथ साधु असाधु अनुवादा । वर्जिली स्तुति आणि निंदा ।
समत्वें पावला समपदा । सुखस्वानंदाचेनि बोधें ॥७६॥
मुक्ताची हे वोळखण । यापरी उद्धवा तूं जाण ।
आतां आणिकही लक्षण । तुज मी खूण सांगेन ॥७७॥
प्रकट मुक्ताचें लक्षण । म्यां तुज सांगितलें जाण ।
तें लौकिकीं मानी कोण । विकल्प गहन जनाचे ॥७८॥
प्रारब्धवशास्तव जाण । एकादें अवचटे दिसे चिह्न ।
इतुक्यासाठीं मुक्तपण । मानी कोण जगामाजीं ॥७९॥
मुक्त मुक्तपणाची पदवी । सर्वथा जगामाजीं लपवी ।
जो आपुली मुक्तता मिरवी । तो लोभस्वभावी दांभिकु ॥४८०॥
शुक वामदेव मुक्त म्हणतां । सर्वांसी न म्हणवे सर्वथा ।
मा इतरांची काय कथा । माझीही मुक्तता न मानिती ॥८१॥
म्यां गोवर्धनु उचलिला । दावाग्नि प्राशिला ।
अघ बक विदारिला । प्रत्यक्ष नाशिला काळिया ॥८२॥
जों जों हा देहाडा । तों तों नीच नवा पवाडा ।
निजसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळु ॥८३॥
त्या माझें मुक्तपण । न मानिती याज्ञिक ब्राह्मण ।
इतरांची कथा कोण । विकल्प दारुण लौकिकीं ॥८४॥
यालागीं मुक्ताचें मुक्तपण । मुक्तचि जाणे आपण ।
इतरांसी न कळे तें लक्षण । अतिविचक्षण जर्ही जाला ॥८५॥
मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूढ-पिशाचवत ।
तींही चिन्हें समस्त । ऐक निश्चित सांगेन ॥८६॥