मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक ३० वा

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कामैरहतधीर्दान्तो मृदुः शुचिरकिञ्चनः ।

अनीहो मितभुक् शान्तः स्थिरो मच्छरणो मुनिः ॥३०॥

उर्वशी आलिया सेजेसी । कामक्षोभ नुपजे ज्यासी ।

स्वानंद भोगितां अहर्निशीं । विषयकामासी विसरला ॥७८॥

रंकू पालखिये बैसला । तो पूर्वील वाहना विसरला ।

तेवीं हा निजानंदें तृप्त झाला । काम विसरला तुच्छत्वें ॥७९॥

कांहीं अप्राप्त पावावया कामावें । साधूसी अप्राप्तता न संभवे ।

प्राप्तपदीं यथागौरवें । निजानुभवें विराजतू ॥८८०॥

खद्योता सूर्य भेटों जातां । खद्योता न देखे सविता ।

सूर्यासी न भेटवे खद्योता । तेवीं अप्राप्तता साधूसी ॥८१॥

एवं उभय परी पाहतां । कामू निमाला सर्वथा ।

हें आठवें लक्षण तत्त्वतां । अकामता साधूची ॥८२॥

सावधानें अंतर नेमितां । तेचि बाह्येंद्रियां नियामकता ।

जेवीं कां लेंकीसी शिकवण देतां । सून सर्वथा चळीं कांपे ॥८३॥

मुख्य धूर रणीं लागल्या हाता । येर कटक जिंतिलें न झुंझतां ।

कां मूळ छेदिलें असतां । शाखा समस्ता छेदिल्या ॥८४॥

एवं अंतरवृत्तीचा जो नेम । तोचि बाह्येंद्रियां उपरम ।

ऐसेनिही जें निपजे कर्म । तें निर्भ्रम अहेतुक ॥८५॥

अंतर जडलें आत्मस्थितीं । बाह्य रंगलें मद्‍भक्तीं ।

तेथें जीं जीं कर्मे निपजती । तीं तीं होती ब्रह्मरूप ॥८६॥

बाह्येंद्रियें करितां नेम । अंतरीचें कर्मीं प्रकटे ब्रह्म ।

हा बाह्येंद्रियांचा नेम । आत्माराम जाणती ॥८७॥

ऐसी बाह्येंद्रियनियामकता । हे जाणावी साधूची दांतता ।

हा नववा गुण तत्त्वतां । ऐक आतां दशमातें ॥८८॥

आकाश सर्वांसीही लागे । परी कठिण नव्हे कोणेही भागें ।

तेवीं साधु जाण सर्वांगें । मृदु लागे सर्वांसी ॥८९॥

पिंजल्या कापुसाचा गोळा । फोडूं नेणे कोणाच्या कपाळा ।

तैसाचि साधूचा जिव्हाळा । अतिकोंवळा सर्वांसी ॥८९०॥

पाहें पां जैसें गंगाजळ । गायीव्याघ्रांसी करी शीतळ ।

तैसाचि साधुही केवळ । मृदु मंजुळ सर्वांसी ॥९१॥

साधूंची अतिमृदुता । या नाव जाण सर्वथा ।

हे दशमलक्षणयोग्यता । ऐक आता अकरावे ॥९२॥

साधूंची जे शुचिष्मंतता । ते भगवद्‍भजनेंचि तत्त्वतां ।

व्रततपदानादितीर्था । शुचिष्मंतता त्यांचेनी ॥९३॥

परदारा आणि परधन । सर्वथा नातळे ज्याचें मन ।

गंगादि तीर्थे त्यांचे जाण । चरणस्पर्शेन वांछिती ॥९४॥

स्वदारास्वधन सलोभता । अवश्य जाणें अधःपाता ।

द्रव्यदारानिरपेक्षता । शुचिष्मंतता साधूची ॥९५॥

ऐशी असोनि शुचिष्मंतता । तो निंदीना व्रततपादितीर्था ।

ते ते विधीतें आचरितां । सदाचारता अतिश्रोत्री ॥९६॥

पडलिया मगरमिठी । ते न सोडी प्राणसंकटी ।

सांपडे तें सगळेंचि घोटी । तैशी पडली मिठी जीवब्रह्मा ॥९७॥

हें पुढेंसूनि परब्रह्म । आश्रमधर्मादि स्वकर्म ।

आचरोनि दावी उत्तमोत्तम । कर्मी ब्रह्मप्रतीती ॥९८॥

कर्म करितो लोक म्हणती । तो वर्तताहे ब्रह्मस्थितीं ।

हें ज्याचें तो जाणे निश्चितीं । लोकां प्रतीती कळेना ॥९९॥

कुलाल भांडें करूनि उतरी । चक्र भोंवे पूर्विला भंवरी ।

तैसा साधू पूर्वसंस्कारी । स्वकर्मे करी वृत्तिशून्य ॥९००॥

हें साधुलक्षण अत्यंत थोर । ऐकतां सुगम करितां दुर्धर ।

हे अकरावें अतिपवित्र । ऐक विचित्र तें बारावें ॥१॥

साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता ।

देहगेहें निःसंगता । अकिंचनता त्यासी नांव ॥२॥

स्फटिकु काजळीं दिसे काळा । आरक्तीं आरक्ती कीळा ।

नीळवणीं भासे । निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वें ॥३॥

स्फटिक जपाकुसुमीं ठेविला । पाहतां दिसे तांबडा झाला ।

परी तो अलिप्तपणें संचला । नाहीं माखला तेणें रंगें ॥४॥

तैसा साधु परिग्रहामाजी वसे । परिग्रही झालाही दिसे ।

परी जागृतिस्वप्नसुषुप्तिवशे । परिग्रहो न स्पर्शे निजबोधें ॥५॥

परीस सर्व धातूंसी खेंव देतां । मिळणीं सोनें करी तत्त्वतां ।

तो सुवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥६॥

तैसा साधू म्हणे जें जें माझें । तें तें त्यासी नाठवे दुजें ।

ऐक्यभावाचीं नाचवी भोजें । अधोक्षजें अंकितु ॥७॥

चिन्मात्री जडलें मन । विश्व जाहलें चैतन्यघन ।

बुडालें परिग्रहाचें भान । अकिंचनपण या नांव ॥८॥

सकळ सांडूनि वना गेला । वनीं वनिता चिंतू लागला ।

तो त्यागचि बाधकत्वा आला । उलथोन पडिला परिग्रहीं ॥९॥

उंडणी भिंती चढों लाहे । चढते कष्ट व्यर्थ पाहे ।

ते पूर्विल्यापरीस तळीं जाये । उलंडूनि ठाये अतिदुःखी ॥९१०॥

तैशी मुंगी नव्हे पाहें । उंडणी घेऊनि वृक्षावरी जाये ।

सत्संगती मूर्ख उद्धरों लाहे । परी ते उपाये न करिती ॥११॥

मुंगी लहान उंडणी थोर । ते तिचा करूं शके उद्धार ।

तैसे अकिंचन जे नर । ते करिती उद्धार सकळांचा ॥१२॥

असो मूर्खांची जे त्यागिती गती । ते अत्यंतबाधें बाधका होती ।

जंव धरिली नाहीं सत्संगती । तंव त्यागस्थिती कळेना ॥१३॥

प्रपंच सांडूनी वना गेला । तो देहप्रपंचें दृढ अडकला ।

देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥१४॥

मूर्खासी त्याग तो झाला बाधू । परिग्रहीं असोनि मुक्त साधू ।

सबाह्य त्यागें अतिशुद्धू । शुकनारदू तिहीं लोकीं ॥१५॥

ते दोघेही लागती जनकाच्या पायीं । तो राज्य करितांही विदेही ।

त्यासी मीही मानीतसें पाहीं । अभिनव नवाई साधूची ॥१६॥

या नांव मुख्य अकिंचनता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।

हे बारावी लक्षणता । ऐक आतां अनीहा ॥१७॥

अनीहा झाली बापुडी । जेथ जाय तो दूर दवडी ।

कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रयें ॥१८॥

अनीहा हिंडता लोकीं तिहीं । तिळभरी ठावो बसावया नाहीं ।

ईहा वैरिणी लागली पाहीं । ठायींच्या ठायीं दंडवी ॥१९॥

कोणी येवों नेदी दाराकडे । अतिदीन जाली बापुडें ।

धाय मोकलोनि रडे । गार्‍हाणें संतांपुढें देवों आली ॥९२०॥

ते कृपाळू दयामेळें । निजकरें पुसोनि डोळे ।

प्रतिपाळिली स्वहितकाळें । संतबळें वाढली ॥२१॥

त्यापूर्वील वैर स्मरोनियां । ईहा वैरिणी साधावया ।

संतांसी पुसोनि उपाया । तिच्या अपाया प्रवर्तली ॥२२॥

ईहेसी नाना चेष्टीं चेष्टवितां । अहं आणि जाण ममता ।

कामें अंगीं घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥२३॥

ईहा कामफळें वाढली थोर । व्यापूनि राहिली घरोघर ।

तिसीं साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥२४॥

असंगशस्त्र मागोनि संतां । ईहेच्या करावया घाता ।

आधीं मारूं धांवे अहंममता । दोघें धाकता निमालीं ॥२५॥

अनीहा पाठीं लागल्या जाण । अंहममतेसी म्हातारपण ।

थरथरां कांपोनि प्राण । घायेंवीण सांडिला ॥२६॥

अनीहा देखोनि दिठीं । काम पळे बारा वाटीं ।

संकल्पाचे शेवटिले गोटीं । उठाउठी पाडिला ॥२७॥

कामू पडतां रणांगणीं । क्रोधादि शूर पडिले रणीं ।

ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधुनी मारिले ॥२८॥

एवं अनीहेसमोर । राही ऐसा नाहीं वीर ।

मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाहीं ॥२९॥

काम निमाल्या सर्वथा । ईहा रांडवली वस्तुतां ।

मुख न दावीच संतां । अधोगमनता पळाली ॥९३०॥

यालागीं ईहेसवें जो लागला । तो जाणावा अधोगती गेला ।

अनीहेचा जो अंकिता झाला । तो आवडला गोविंदा ॥३१॥

म्हणसी अनीहा ते कोण । काय ते ईहेचें लक्षण ।

ऐक सांगेन संपूर्ण । जेणें बाणे खूण जिव्हारीं ॥३२॥

काम्यकर्मादि क्रियाजाळ । तेचि ईहा जाणावी अतिचपळ ।

अंतरीं जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥३३॥

अंतरीं कामाची वार्ता । नुपजे कर्माची कर्मावस्था ।

अणुभरी न रिघे उद्वेगता । अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥

ऐसी अनीहा असे ज्यासी । देवो आज्ञाधारकू त्यापाशीं ।

ते अनीहा संतांची दासी । अहर्निशीं जीवेंभावें ॥३५॥

हे अनीहा अतिगौरवें । साधुलक्षण तेरावें ।

मितभोजन तें चौदावें । लक्षण वैभवें अवधारीं ॥३६॥

न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेच्या पांगडा ।

आवडीनावडीचा उपाडा । करूनि निधडा भोजनीं ॥३७॥

प्राणु आकांक्षी अन्नातें । जठराग्नि भक्षी त्यातें ।

उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवी ॥३८॥

जें जें आलें भोजनासी । दृष्टीनें त्याचे दोष निरसी ।

अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसीं सेवितू ॥३९॥

न देखे भोग्य पदार्था । नाठवे मी एक भोक्ता ।

ग्रासीं समरसीं अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥९४०॥

अग्नि आधीं आपणयाऐसें करी । मग त्या आहारातें अंगीकारी ।

साधु आधीं द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥

याचि नांव मितभोजन । साधूचे आहाराचें लक्षण ।

युक्तीवीण अल्प भोजन । तें पथ्य जाण रोग्यांचे ॥४२॥

ग्रासोग्रासीं ब्रह्मार्पण । त्या नांव परिमित भोजन ।

हें चौदावें लक्षण । साधूचें जाण उद्धवा ॥४३॥

समळजळसंभारी । सरितामेळू मिळे सागरीं ।

तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू ॥४४॥

तैशा आलिया नाना ऊर्मी । ज्यांसी गजबजु नाहीं मनोधर्मी ।

शांति संतांचि पराक्रमी । उपक्रमी निजशक्ती ॥४५॥

जेवीं कां नागवेलीची वेली । आधारावीण न वचे वेंगली ।

तैसी संतबळें शांती वाढली । मंडपा चढली चिन्मात्र ॥४६॥

झांकळोनि दश दिशांसी । आभाळ दाटल्या आकाशीं ।

गगन अविकारी त्या दोषासी । आभाळासी नातळे ॥४७॥

शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लगती अंबरा ।

तेवीं साधूचा उभारा । द्वंद्वसंभारा निर्द्वंद्व ॥४८॥

तैशा उंच नीच नाना अवस्था । निबिड दाटल्या मोहममता ।

क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नांव तत्त्वतां निजशांती ॥४९॥

संतांचेनि शांति गहन । शांतीचेनि संत पावन ।

हें अनन्य निजलक्षण । पंधरावा गुण संतांचा ॥९५०॥

जैं मीपणें नव्हतें जन्मनाम । तैंच पूर्वजांचें निजधाम ।

आपुली मिरासी जे उत्तम । तेथ मनोधर्म स्थिरू ज्याचा ॥५१॥

मज जन्मचि नाहीं झालें । मरण म्यां नाहीं देखिलें ।

ऐसें मन मुळीं स्थिरावलें । स्थिरता बोलिलें या नांव ॥५२॥

चहूं आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम ।

तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥

चहूं वर्णांमाजीं पवित्रता । जेणें ब्राह्मणांची ब्राह्मणता ।

तेथें स्थिराविलें जेणें चित्ता । जाण स्थिरता ती नांव ॥५४॥

तिहीं लोकीं स्थिरता । मरों टेंकली सर्वथा ।

कोणी नाहीं प्रतिपाळिता । हातीं धरिता न देखे ॥५५॥

दारीं राहों नेदी कोणी । कोण देईल पथ्यपाणी ।

अवघी ठाकिली निरंजनीं । ते सज्जनीं प्रतिपाळिली ॥५६॥

स्थिरता वाढली संतबळें । जिणोंनि वर्णाश्रमादि टवाळें ।

भेदोनि अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥५७॥

स्वस्वरूपीं सायुज्यता । पावोनि स्थिरावली स्थिरता ।

तेथ वाट मोकळी संतां । स्वभावतां त्यां केली ॥५८॥

तेथ स्वस्वरूपें स्वकर्म । स्वस्वरूपें वर्णाश्रम ।

स्वस्वरूपें स्वधर्म । स्थिरतासंभ्रम या नांव ॥५९॥

ऐसी स्वधर्मकर्मीं अवस्था । ती नांव उत्तम स्थिरता ।

हे सोळावी लक्षणता । मच्छरणता ते ऐक ॥९६०॥

सरिता सागरा शरण आली । ते समरसोनि सिंधू झाली ।

तैसी शरण जे वृत्ति मज आली । ते पावली दशा माझी ॥६१॥

लवण जीवना आलें शरण । तें तत्काळ जाहलें जीवन ।

तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥६२॥

मज रिघोनियां शरण । जो वांछी महिमा सन्मान ।

तो गुळांतील पाषाण । केवळ जाण गुळदगडू ॥६३॥

जो कां गुळें माखिला दगडू । तो पाहतां दिसे वरिवरी गोडू ।

शेखीं परिपाकीं निवाडू । अतिजडू कठिणत्वें ॥६४॥

तैसें वरिवरी दावी माझें भजन । हृदयीं विषय‍अभिलाषण ।

तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूषण लोभाचें ॥६५॥

सर्वांगीं सुंदर सुरेख । जिच्या नाकावरी पांढरें ठीक ।

तिसी वरीना साधु लोक । तैसा विषयलोभु देख मद्‍भजनीं ॥६६॥

रांडवा केलें काजळकुंकूं । देखोनि जग लागे थूंकूं ।

तैसा विषयांचा अभिलाखू । जेवीं वोकिला वोकू अतिनिंद्य ॥६७॥

त्रैलोक्यसाम्राज्यवैभव जाण । जो थुंकोनि रिघाला मज शरण ।

तो समरसें मीचि जाण । मानापमान त्या कैंचा ॥६८॥

या नांव मच्छरण । हें सतरावें लक्षण ।

उद्धवा जाण संपूर्ण । मननगुण तो ऐक ॥६९॥

श्रुतिगुरुवाक्यनिरूपण । ऐकतां अद्वैतश्रवण ।

युक्तिप्रयुक्तीं पर्यालोचन । मनन गुण त्या नांव ॥९७०॥

अग्निकापुरां भेटी होतां । तो अग्नीचि होय वस्तुतां ।

तेवीं माझे स्वरूपीं मन ठेवितां । मन चित्स्वरूपता पावलें ॥७१॥

मन चिदंशें असे जाण । तें चिन्मात्र जाहलें करितां मनन ।

जेवीं जीवनीं जन्मलें लवण । तें होय जीवन निजमिळणीं ॥७२॥

असो मननाचेनि लवलाहें । मन जेथवरी जावों पाहे ।

तेथवरी तया मीचि आहें । न वचतां राहें तेथही मी ॥७३॥

दीप जेउता जाउं बैसे । तेउता प्रकाशचि तया असे ।

कोठेंही न वचोनि ठायीं वसे । तेथेंही वसे प्रकाशू ॥७४॥

तैसें माझें करितां मनन । मद्‌रूपचि जाहलें मन ।

मग करितां गमनागमन । मद्‌रूपता जाण मोडेना ॥७५॥

एवं माझें स्वरूप जें केवळ । तेथें मद्‌रूपें मन निश्चळ ।

ध्रुवाचे परी अचंचळ । मननशीळ त्या नांव ॥७६॥

मुनि या पदाचें व्याख्यान । मननशीलता जाण ।

हें अठारावें लक्षण । तें हें निरूपण सांगितलें ॥७७॥

अत्यंत गोड निरूपण । पुढिले श्लोकीं दशलक्षण ।

तें ऐकावया उद्धव सावधान । सर्वांगीं कान होऊनि ठेला ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP