मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक ११ वा

एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एवं विरक्तः शयने आसनाटनमज्जने ।

दर्शनस्पर्शनघ्राण भोजनश्रवणादिषु ॥११॥

ऐकें मुक्तांचें लक्षण । आसन भोजन शयन ।

दर्शन स्पर्शन घ्राण । अटन मज्जन करी कैसें ॥६३॥

मागील श्लोकार्थु संपतां । प्रकृतिकर्मअभिमानता ।

तेणें लागली दृढबद्धता । तो अहंकारु ज्ञाता नातळे ॥६४॥

सर्वकर्मीं स्वभावतां । ज्ञात्याची निरभिमानता ।

ते मी समूळ सांगेन कथा । सावधानता अवधारीं ॥६५॥

जेवीं छायेचा मानापमान । पुरुषा न बाधी अणुप्रमाण ।

तेवीं देहाचें कर्माचरण । निरभिमान मुक्तासी ॥६६॥

स्वाधिष्ठान तेंचि आसन । अखंड त्यावरी आरोहण ।

तेथें येवोंचि नेणे अभिमान । बैसलें मन उठीना ॥६७॥

नवल आसनाचें महिमान । हारपोनि गेलें विस्मरण ।

कदा एकांतु नोसंडे जाण । हें सहजासन मुक्ताचें ॥६८॥

जें आसनीं समाधान । समाधि आणि व्युत्थान ।

करी दोंहीची बोळवण । हें चालतें आसन मुक्ताचें ॥६९॥

जें बैसल्या आसनीं समाधान । त्याचि स्थिति गमनागमन ।

उठिलों बैसलों नाठवे जाण । चालतेंपण स्फुरेना ॥७०॥

चालतांही चपळ पदीं । मी चालतो हे नाठवे बुद्धी ।

चालतां न मोडे समाधी । हे लक्षणसिद्धी मुक्ताची ॥७१॥

जरी त्रैलोक्य हिंडला । तरी ठायींहूनि नाहीं हालला ।

ऐसा न चलोनि मुक्त चालला । जेवीं अभ्रें धांवला दिसे चंद्र ॥७२॥

कुलालचक्रीं बैसली माशी । ते न हालतां भंवे चक्रासरसीं ।

मुक्ताची गमनसिद्धी तैशी । देहगमनेंसीं आभासे ॥७३॥

देहो प्रारब्धास्तव हिंडे । बैसका स्वस्वरूपींची न संडे ।

जेवीं रथीं धांवतां सवेग घोडे । निद्रा न मोडे रथस्थाची ॥७४॥

ऐसें न चळतां जें चळण । तें जाण मुक्ताचें गमन ।

आतां ऐक त्याचें स्नान । निमज्जन निजरूपीं ॥७५॥

स्नान करी गंगाजळें । परी गंगादकातें नातळे ।

मन चित्स्वरूपीं केलें सोवळें । तें वोवळें हों नेणे ॥७६॥

त्यासी निजस्वरूपीं नाहतां । जाली परम पवित्रता ।

तीर्थे मागती चरणतीर्था । ऐसी सुस्नातता मुक्ताची ॥७७॥

तो चिन्मात्रचि देखे जीवन । अखंड चिद्रूपीं अवगाहन ।

इतर म्हणती केलें स्नान । त्यासी निमज्जन निजरूपीं ॥७८॥

त्याचे चरणींचे रजःकण । लाहोनि धरा परम पावन ।

त्याचेनि प्राणसंगें जाण । पवित्रपण वायूसी ॥७९॥

त्याचेनि चरणस्पर्शे तत्त्वतां । पवित्र जाल्या गंगादि सरिता ।

त्याचेनि जठरसंगे सर्वथा । अतिपवित्रता अग्नीसी ॥२८०॥

त्याच्या हृदयावकाशीं आकाश । सगळें राहिलें सावकाश ।

तेणें पवित्र जाहलें आकाश । अलिप्त उदास सर्वत्र ॥८१॥

जे चढोनि बैसले वैकुंठीं । ते सदा वांछिती तयाची भेटी ।

वेदू ऐकों धांवें गोठी । तो पहावया दिठीं देव येती ॥८२॥

एवं चित्स्वरूपीं करूनि स्नान । जाला सर्ववंद्यू अतिपावन ।

हें मुक्ताचें स्नानलक्षण । आतां निरीक्षण तें ऐक ॥८३॥

अवघें चराचर देखतां । तो देखोनीचि न देखता ।

दृष्टीसी दृश्यासी अलिप्तता । दृश्य देखतां हरि दिसे ॥८४॥

दृश्यें दुमदुमित दिसे सृष्टी । परी दृश्य न पडे त्याचे दृष्टीं ।

होतांही दृश्येंसीं भेटी । पडे मिठी अदृश्यीं ॥८५॥

दृष्टि प्रकाशे देखणेपणीं । तें देखणें देखे दृश्यस्थानीं ।

जेवीं डोळया डोळा दर्पणीं । निजदर्शनीं देखतू ॥८६॥

डोळेनि दर्पणु प्रकाशे । त्यामाजीं डोळेनि डोळा दिसे ।

मुक्ताचें देखणें तैसें । आपणयाऐसें जग देखे ॥८७॥

दृश्य द्रष्टा दर्शनीं । त्रिपुटी गेली हारपोनी ।

देखणें देखे देखणेनी । देखणा हो‍उनी सर्वांगें ॥८८॥

होतां नाना पदार्थेंसी भेटी । तें देखणेपणा दृश्य लोटी ।

दृश्यातीत निजदृष्टीं । सुखें सृष्टी देखतू ॥८९॥

मुक्ताची हे देखती स्थिती । देखणेपणें यथानिगुतीं ।

उद्धवा ये दृष्टीची ज्यासी प्राप्ती । तोचि त्रिजगतीं पावन ॥२९०॥

या दृष्टीं जे नित्य वर्तत । ते जाण पां परम मुक्त ।

या दृष्टीं जे मज पाहत । परम भागवत प्रिय माझे ॥९१॥

परादि वाचांमाजीं वचन । उपजे तेथ त्याचें श्रवण ।

श्रोता वक्ता कथाकथन । अवघें आपण होऊनि ऐके ॥९२॥

शब्दजातेंसी कान । अखंड जडले सावधान ।

श्रवणामाजीं हारपे गगन । परम समाधान श्रवणाचें ॥९३॥

ऐकतां लौकिक शब्द । कां नारायण उपनिषद ।

परिसतां नाम हरिगोविंद । अर्थावबोध समत्वें ॥९४॥

बोलातें जो बोलविता । तोचि श्रवणामाजीं श्रोता ।

येणें अन्वयें श्रवण करितां । शब्दीं निःशब्दता अतिगोड ॥९५॥

जो जो श्रवणीं पडे शब्दू । तो तो होत जाय निःशब्दू ।

यापरी श्रवणीं परमानंदू । स्वानंदबोधू मुक्ताचा ॥९६॥

अकारादि वर्णत्रिपुटी । प्रणवू मूळशब्दसृष्टीं ।

तो ओंकार ब्रह्मरूपें उठी । हे श्रवणसंतुष्टी मुक्ताची ॥९७॥

श्रवणीं पडतां शब्दज्ञान । सहजें शाब्दिक जाय उडोन ।

श्रवणीं ठसावे ब्रह्म पूर्ण । स्वानंदश्रवण मुक्ताचें ॥९८॥

परिसतां उपनिषद । कां लौकिकादि नाना शब्द ।

मुक्ताचा पालटेना बोध । श्रवणीं स्वानंद कोंदला ॥९९॥

एक अद्वितीय ब्रह्म । हें वेदशास्त्रांचें गुह्य वर्म ।

तें मुक्तांसी जाहलें सुगम । शब्दी परब्रह्म कोंदलें ॥३००॥

लौकिक वैदिक शब्द जाण । शब्दमात्रीं ब्रह्म पूर्ण ।

ऐसें मुक्ताचें हें श्रवण । घ्राण लक्षण परियेसीं ॥१॥

घ्राणासी येतां सुगंधू । मुक्तासी नोहे विषयबोधू ।

गंधमिसें स्वानंदकंदू । परमानंदू उल्लासे ॥२॥

घ्राण सुमन चंदन । अवघें तो होय आपण ।

यापरी गंध भोगी जाण । भोक्तेंपण सांडोनी ॥३॥

घ्राणा येतांचि सुवासु । सुवासीं प्रकटे परेशु ।

तेव्हां सुवासु आणि दुर्वासु । हा विषयविलासु स्फुरेना ॥४॥

मलयानिलसंगें जाण । जेथ जेथ गंधाचें गमन ।

तेथ तेथ मुक्ताचें घ्राण । अगम्यपण या भोगा ॥५॥

जितुका चळता वायु जाण । तितुकें मुक्ताचें घ्राण ।

यापरी गंधग्रहण । स्वभावें जाण होतसे ॥६॥

यापरी जाण तत्त्वतां । होय तो गंधाचा भोक्ता ।

हे घ्राणक्रिया जाण मुक्ता । रसभोग्यता अवधारीं ॥७॥

रस रसना भोजन । तो स्वयेंचि आहे आपण ।

हातु न माखितां सर्वापोशन । रसनेविण सेवितु ॥८॥

षड्रसांचा स्वादु जाणे । परी एकी चवीं अवघें खाणें ।

भोक्तपणा आतळों नेणे । ऐसेनि भोजनें नित्यतृप्तु ॥९॥

भूक उपजोंचि नेणे । जेवूं बैसल्या पुरे न म्हणे ।

सर्व भक्षी नखातेपणें । उच्छिष्ट होणें त्या नाहीं ॥३१०॥

ताट अन्न आणि आपण । तो न देखे भिन्नपण ।

रसमिसें स्वानंदपूर्ण । सर्वांगें जाण सेवित ॥११॥

जंव रसना घेवों जाय रसस्वादू । तंव तेथें प्रकटे परमानंदू ।

करूनि रसरसने उच्छेदू। निजानंदु सेवितू ॥१२॥

सकळ गोडियांची मूळ गोडी । तेथ बैसली निजआवडी ।

सेवितां नाना परवडी । तेचि गोडी गोडपणें ॥१३॥

सकळ गोडियां जें गोड आहे । ते गोडीच तो जाला स्वयें ।

आतां जो जो रसविषयो खाये । तेथ तेथ आहे ते गोडी ॥१४॥

कैसा मुक्ताचा निजबोधू । घेवों जातां रसस्वादू ।

रसत्व लोपूनि स्वानंदकंदू । परमानंदू वोसंडे ॥१५॥

यालागीं जो जो रस सेवूं जाये । तो तो ब्रह्मरसूच होये ।

मुक्ताची रसना यापरी पाहें । घेत आहे रसातें ॥१६॥

एवं मुक्ताचें जें भोजन । ते करिती क्रिया ऐसी जाण ।

आतां तयाचें जें स्पर्शन । तेंही लक्षण परियेसीं ॥१७॥

मुक्तासी लागतांचि जाणा । शीत सांडी शीतळपण ।

स्पर्शे उष्ण मुकलें उष्णा । स्पर्शनलक्षणा हें त्याची ॥१८॥

जेवीं कां टेंकितां अग्नीसी । धुरें आणी चंदनासी ।

जाळूनि त्यांच्या विकारासी । आपणाऐसी करी वन्ही ॥१९॥

तेवीं मुक्तासी द्वंद्वें आदळतां । द्वंद्वांची बुडाली द्वंद्वता ।

तो सर्वी सर्वपणें असतां । सहजे द्वंद्वता निमाली ॥३२०॥

तेथ कैंचे मृदु कैंचें कठिण । कैंचें शीत कैंचें उष्ण ।

सर्वीं सर्वात्मा तो जाण । द्वंद्वाचें भान स्पर्शेना ॥२१॥

आगीसी पोळीना उन्हाळा । हींव पीडीना हिमाचळा ।

तैसी द्वंद्वांची हे माळा । मुक्ताचे गळां पडेना ॥२२॥

सुवर्णाचे अलंकार भले । सुवर्णपेटीमाजी झांकिले ।

झांकिले म्हणतां उघडे ठेले । तेवीं द्वंद्वें सकळ परब्रह्म ॥२३॥

त्यासी अंगीं जें जें आदळें । तें अंगचि होय तत्काळें ।

कांहीं नुरे त्यावेगळें । द्वंद्वे सकळें निमालीं ॥२४॥

हातीं लीलाकमळ सांपडे । तंव कमळीं कमळत्वचि उडे ।

कमळजन्मा तोही बुडे । करी रोकडे निजरूप ॥२५॥

स्पर्श स्पर्शतें स्पर्शावें । हेही त्रिपुटी न संभवे ।

किंबहुना आपणचि आघवें । निजस्वभावें होऊनि ठेला ॥२६॥

तो देवपूजा हातीं धरी । तरी मीचि ते देवपूजेभीतरीं ।

अथवा खेळों रिघाल्या पाथरीं । त्याहीमाझारीं मी त्यासी ॥२७॥

भिंती नानावर्ण चित्राकृती । तेथें जें जें स्पर्शे तें तें भिंती ।

तेवीं मुक्ताची स्पर्शनस्थिती । पूर्ण अद्वैतीं निजबोधू ॥२८॥

यापरीं गा तत्त्वतां । स्पर्शलक्षण वर्ते मुक्ता ।

त्याचें बोलणें जें सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥

सुरस कथा सांगे वाडेंकोडें । अथवा लौकिक बोलणें घडे ।

परी त्याची समाधिमुद्रा न खंडे । मौन न मोडे बोलतां ॥३३०॥

बोलतांही नोमडे मौन । हेचि अनुभवाची आंतुल खूण ।

शब्दामाजीं निःशब्दगुण । सज्ञान जाण जाणती ॥३१॥

स्त्रीपुरुषें अबोला चालती । तो अबोला कीं अतिप्रीती ।

तेवीं मुक्ताची बोलती स्थिती । शब्द शब्दार्थी निःशब्द ॥३२॥

जयाचीं बोलतीं अक्षरें । अक्षररूपेंचि साचारें ।

त्याचीं ऐकतां उत्तरें । चमत्कारें मन निवे ॥३३॥

मी एकु चतुर बोलका । हाही नाहीं आवांका ।

अथवा रंजवावें लोका । हेंही देखा स्मरेना ॥३४॥

निःशब्दीं उठती शब्द । शब्दामाजीं ते निःशब्द ।

यापरी करितांही अनुवाद । बोलोनि शुद्ध अबोलणा ॥३५॥

जळामाजीं उपजे तरंग । जळ तंरगीचें निजांग ।

तेवीं निःशब्दीं शब्द सांग । शब्दाचें सर्वांग निःशब्द ॥३६॥

वाच्यवाचकता त्रिपुटी । लोपूनि सांगे गोड गोठी ।

करितां सैराट चावटी । न सुटे मिठी मौनाची ॥३७॥

म्यां सत्यचि बोलावें । हेंही त्यासी जीवें नाठवे ।

मिथ्या बोलों लोभस्वभावें । हेंही न संभवे मुक्तासी ॥३८॥

सत्य मिथ्या जीं बोलणीं । निःशेष प्राशूनि नेलीं दोनी ।

मुळींच्या मौनें जाला मौनी । नाना वचनीं बोलतां ॥३९॥

तेथ सैराट हाक देतां । कां सिंहनादें गर्जतां ।

शब्दीं ठसावली निःशब्दता । मौन सर्वथा मोडेना ॥३४०॥

जरी तो माझें स्तवन करी । तरी मी त्याच्या स्तवनामाझारीं ।

तो जरी सैरा बडबड करी । त्याही माझारीं मी त्यासी ॥४१॥

जरी त्यासी येऊनि भांडण पडे । तरी भांडणही करणें घडे ।

त्या कलहामाजीं मागेंपुढें । चहूंकडे मज देखे ॥४२॥

त्याचे वांकडेतिकडे व्यंग बोल । ते जाण ब्रह्मचि केवळ ।

तया आम्हां अभिन्न मेळ । निजात्मसाक्ष वस्तीसी ॥४३॥

अवचटें त्याच्या मुखाबाहेरीं । ज्यासी म्हणे तुज देवो तारी ।

त्यासी मी वाउनियां शिरीं । ब्रह्मसाक्षात्कारीं पाववीं ॥४४॥

यालागीं त्याच्या वचनाआधीन । मी सर्वथा असें जाण ।

त्याचें वचन तें प्रमाण । सर्वस्वें जाण मी मानीं ॥४५॥

आतां तो मी हे ऐसी बोली । बाहेर सवडी वाढिन्नली ।

मी तोचि तो हे किली । मागीं चोजवली मद्भक्तां ॥४६॥

यालागीं तो माझा जीवप्राण । मी त्याचें निजजीवन ।

तयासीं मज भिन्नपण । कल्पांतीं जाण असेना ॥४७॥

एवं तो सगळा मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं ।

ऐसेनि अभिन्नपणेंकरीं । सुखें संसारीं नांदतू ॥४८॥

त्याचे मुखींचे जे जे बोल । ते मीचि बोलता सकळ ।

मुक्ताचें बोलणें केवळ । तुजप्रती विवळ म्यां केलें ॥४९॥

हातीं कांही घेवों जाये । तंव ते घेणें देवो होये ।

देतां कांहीं देवो पाहे । तेंही होये तद्रूप ॥३५०॥

तेव्हां दान आणि देते घेते । भिन्नपणें न देखे तेथें ।

यालागीं करोनियां अकर्ते । यापरी करांतें वर्तवी ॥५१॥

निजस्वभावें ते कर । जो कांहीं करिती व्यापार ।

तेथ नकेलेपणाचें सूत्र । सहजीं साचार ठसावे ॥५२॥

करीं पडलिया शस्त्र । करूं जाणे तो व्यापार ।

परी मी कर्ता हा अहंकार । अणुमात्र असेना ॥५३॥

पुढें वोढवलें अवचितें । तरी खेळों जाणे द्यूतकर्मातें ।

हारी जैत नाठवे चित्तें । निजस्वभावें तें खेळतु ॥५४॥

वोडवल्या ब्राह्मणपूजा । करूं जाणे अतिवोजा ।

पूज्यपूजकत्वें भावो दुजा । न मनूनि द्विजां पूजितु ॥५५॥

धनुषीं काढूं जाणे वोढी । अनुसंधानें बाण सोडी ।

अलक्ष्य लक्षूनि भेदी निरवडी । परी न धरी गोडी श्लाघेची ॥५६॥

कैसें कर्म निपजे करीं । जैशा समुद्रामाजीं लहरी ।

तैसा निजस्वरूपामाझारीं । नाना व्यापारीं निश्चळु ॥५७॥

सूर्य मृगजळातें भरी । तैसा व्यापारू निजनिर्विकारीं ।

परी केलेंपण शरीरीं । तिळुभरी असेना ॥५८॥

सूर्यकांतीं अग्नि खवळे । तें कर्म म्हणती सूर्यें केलें ।

तैसें हस्तव्यापारें जें जें जालें । नाहीं केलें तें त्याने ॥५९॥

सूर्यकांतीं पाडावा अग्नी । हें नाहीं सूर्याचे मनीं ।

तेवीं मुक्त निरभिमानी । क्रियाकरणीं विचरतु ॥३६०॥

त्यासी चालवूं जातां पायें । तळीं पृथ्वी नाहीं होये ।

आपण आपणियावरी पाहे । चालतु जाये स्वानंदें ॥६१॥

जळींचा जळावरी तरंग । अभिन्नपणें चाले चांग ।

तैसा तो निजरूपीं सांग । चालवी अंग चिद्रूपें ॥६२॥

तयासी असतांही चरण । आवडीं चाले चरणेंविण ।

करी सर्वांगें गमन । सर्वत्र जाण जालासे ॥६३॥

जेवीं अखंड दंडायमान । पायेंवीण चाले जीवन ।

तेवीं चरणेंविण गमन । नित्य सावधान मुक्ताचें ॥६४॥

सर्वथा पायेंविण । वायूचें सर्वत्र गमन ।

तैसेंच मुक्ताचें लक्षण । स्वरूपीं जाण सर्वत्र ॥६५॥

यापरी न हालतां जाण । त्याचें सर्वत्र गमन ।

नाठवे चालतेंपण । ऐसेंच लक्षण मुक्ताचें ॥६६॥

मूळीं आत्मा आत्मी नाहीं जाणा । यालागीं स्त्रीपुरुषभावना ।

त्यासी सर्वथा आठवेना । दैवें अंगना तो भोगी ॥६७॥

नटू नाटकु अवगला । पुरुष स्त्रीवेषें दिसों आला ।

स्त्रीपुरुषभावो संपादिला । तेवीं हा जाहला गृहस्थु ॥६८॥

कां अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।

मुक्तासी जाण तैशापरी । स्त्रीपुरुषाकारीं निजबोधू ॥६९॥

जेवीं कां आपुली साउली । आवडीं आपण आलिंगिली ।

तेवीं मुक्तें स्त्री भोगिली । द्वैताची भुली सांडोनी ॥३७०॥

छाया कोठें असे कोठें वसे । सरशी असतां ज्याची तो न पुसे ।

मुक्तासी जाण तैसें । लोलुप्य नसे स्त्रियेचें ॥७१॥

एवं स्त्रीपुरुषविकारप्राप्ती । त्याची न मोडे आत्मस्थिती ।

दैवें जाहलिया संतती । आत्मप्रतीती तेथेंही ॥७२॥

’आत्मा वै पुत्रनामासि’ । सत्यत्व आलें ये श्रुतीसी ।

पुत्रत्वें देखे आपणासी । निजरूपेंसीं सर्वदा ॥७३॥

स्वयें जनकू स्वये जननी । स्वयें क्रिडे पुत्रपणीं ।

आपणावांचूनि जनींवनीं । आणिक कोणी देखेना ॥७४॥

एवं स्त्रीपुत्रसंतती । जेवीं आकाशी मेघपंक्ती ।

काळें येती काळें जाती । तैशी स्थिती मुक्ताची ॥७५॥

स्त्रीसंभोगीं जें होय सुख । तें सुख मुक्तासी सदा देख ।

यालागी स्त्रीकाम‍अभिलाख । नाही विशेख मुक्तासी ॥७६॥

जैसे राजहंसापाशीं शेण । तैसें मुक्तापाशीं जाण धन ।

त्यावरी त्याचें नाहीं मन । उदासीन सर्वदा ॥७७॥

व्याघ्रासी वाढिलें मिष्टान्न । तें त्यासी जैसें नावडे जाण ।

तैसें मुक्तासी नावडे धन । धनलोभीपण त्या नाहीं ॥७८॥

पोतास कापुराचा डळा । जेवीं नातळे काउळा ।

तेवीं अनर्घ्यरत्‍नमाळा । मुक्तें सांडिल्या थुंकोनि ॥७९॥

ज्यासी धनलोभाची आस्था । त्यासी कल्पांतीं न घडे मुक्तता ।

तैसें स्त्रीकामिया सर्वथा । नव्हे परमार्थता निजबोधू ॥३८०॥

मुक्ताचिये निद्रेपाशीं । समाधि ये विश्रांतीसी ।

शिणली धांवे माहेरा जैसी । तैसी विसाव्यासी येतसे ॥८१॥

जागृतिस्वप्नसुषुप्तीसी । नातळोनि तींही अवस्थांसी ।

निजीं निजे निजत्वेंसीं । अहर्निशीं निजरूपें ॥८२॥

निजीं निजों जातां निर्धारा । तळीं हरपली धरा ।

वरी ठावो नाहीं अंबरा । ऐसिया सेजारामाजीं निजे ॥८३॥

नवल निजत्याची वोज । चालतां बोलतां न मोडे नीज ।

खातां जेवितां अखंड नीज । सहजीं सहज निजरूप ॥८४॥

निजवितें कां उठवितें । दोनी तोचि आहे तेथें ।

कोण कोणा जागवितें । निजेरूपचि तें निजरूपें ॥८५॥

जागतां निजेशीं वागे । वागतांही नीज लागे ।

एवं नीजरूप जाहला अंगें । निद्रेचेनि पागें पांगेना ॥८६॥

शय्या शयन सेजार । अवघे तोचि असे साचार ।

आपुल्या निजाचें आपण घर । नित्य निरंतर निजीं निजे ॥८७॥

ऐसें जें जें करूं जाय कर्म । तेथ तेथ प्रकटे परब्रह्म ।

मुक्तासी एकुही नाहीं नेम । हें मुख्य वर्म मुक्ताचें ॥८८॥

मुक्तासी नेमबंधन । तैं अंगीं लागलें साधन ।

साधन असतां मुक्तपण । न घडे जाण सर्वथा ॥८९॥

मुक्तासी तंव आसक्ती । सर्वदा नाहीं सर्वार्थी ।

शेष प्रारब्धाचे स्थितीं । कर्में निपजतीं निरपेक्षे ॥३९०॥

ज्याचा निमाला अहंकारू । तो माझें स्वरूप साचारू ।

ये अर्थी न लगे विचारू । वेदशास्त्र-संमत ॥९१॥

जो नित्यमुक्त निर्विकारी । तो वर्ततां वर्ते मजमाझारीं ।

मी तया आंतुबाहेरीं । जेवीं सागरीं कल्लोळ ॥९२॥

यापरी जाला जो परब्रह्म । त्यासी स्वप्नप्राय धर्माधर्म ।

बांधूं न शके इंद्रियकर्म । हें त्याचें वर्म तो जाणे ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP