मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक १० वा

एकनाथी भागवत - श्लोक १० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


दैवाधीने शरीरेऽस्मिन् गुणभाव्येन कर्मणा ।

वर्तमानोऽबुधस्तत्र कर्तास्मीति निबध्यते ॥१०॥

अदृष्टाअधीन जें शरीर । तेथ आलियाहि हरिहर ।

अन्यथा न करवे अणुमात्र । हें वेद शास्त्रसंमत ॥३८॥

देहीं ज्या गुणाचें प्राधान्य । तैसेंचि कर्म निपजे जाण ।

इंद्रियें गुणाधीन । तदनुसारें जाण वर्ततीं ॥३९॥

एवं दैवगुणें देहवर्तन । तेथ मी कर्ता म्हणवी आपण ।

तेंचि त्यासी दृढ बंधन । आपण्या आपण घातक ॥२४०॥

नळीमाजिल्या चण्यांच्या आशां । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा ।

तेवीं देहींच्या विषयविलासा । अभिमानें तैसा गुंतला ॥४१॥

जी देहातीत वस्तुतां । जो गुणकर्माचा अकर्ता ।

तो म्हणे मी देह मी कर्मकर्ता । अहंममता भूलला ॥४२॥

जो न करितांचि चोरी । मी चोर म्हणे राजद्वारीं ।

तो मारिजे लहानथोरीं । तैसी परी जडजीवां ॥४३॥

प्रकृतीचें कर्म आपुले माथां । घेऊनि नाचे अहंममता ।

तेणें अभिमानें दृढ बद्धता । आकल्पांता अनिवार ॥४४॥

तळीं मांडूनि काजळा । वरी ठेविला स्फटिकु सोज्ज्वळा ।

श्वेतता लोपूनि दिसे काळा । तेवीं आंधळा जीवू झाला ॥४५॥

कां आंधळें मातलें हातिरूं । नेणे निजपतन निर्धारु ।

तैसा जीव लागे कर्म करूं । पतनविचारू तो न देख ॥४६॥

मी देह मी कर्म कर्ता । मी ज्ञाता मी विषयभोक्ता ।

ऐसी जे कां देहात्मता । दृढबद्धता तिये नांव ॥४७॥

एवं बद्धमुक्तवर्तन । विशद केलें निरूपण ।

आतां केवळ मुक्ताचें लक्षण । आवडीं श्रीकृष्ण सांगतु ॥४८॥

ज्ञानिया तो तंव आत्मा माझा । हे अतिप्रीती गरुडध्वजा ।

हें गुह्य सांगितलें कपिध्वजा । रणसमाजा रणरंगीं ॥४९॥

तेंचि आतां उद्धवाप्रती । अत्यादरें सांगे श्रीपती ।

ज्ञानियांची मुक्तस्थिती । यथानिगुतीं निजगुह्य ॥२५०॥

ज्ञानलक्षणें सांगतां । धणी नपुरे श्रीकृष्णनाथा ।

निरूपणमिसें ज्ञानकथा । मागुतमागुतां सांगतु ॥५१॥

यालागीं ज्ञानभक्तांची गोडी । श्रीकृष्णाचि जाणे फुडी ।

कृष्णभजनाची आवडी । भक्त ते गोडी जाणती ॥५२॥

आधींच तंव हे मुक्तांची कथा । वरी श्रीकृष्णासारिखा वक्ता ।

उद्धवाचें भाग्य वर्णितां । न वर्णवे सर्वथा शेषादिकां ॥५३॥

उद्धव अर्जुनासमान । त्याहूनि हा दिसे गहन ।

ते परस्परें नरनारायण । गुह्य ज्ञान बोलिले ॥५४॥

तेचि उलथूनि ज्ञानकथा । उद्धवासी होय सांगता ।

उद्धवा ऐसें भाग्य तत्त्वतां । न दिसे सर्वथा आनासी ॥५५॥

जाणें सांडूनि निजधामा । मागें ठेऊनि आपुल्या कामा ।

उद्धव आवडला पुरुषोत्तमा । त्याचिया प्रेमा विगुंतला ॥५६॥

यालागीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवुचि धन्य धन्य ।

जयालागीं स्वयें नारायण । स्वानंदघन वोळला ॥५७॥

जो नातुडे योगयागसंकटीं । तो उद्धवाच्या बोलासाठीं ।

जेवीं व्याली धेनु वत्सा चाटी । तेवीं गुह्य गोठी सांगतु ॥५८॥

जो निजकुळासी काळु । तो उद्धवासी अतिस्नेहाळु ।

बापु भक्तकाजकृपाळू । ज्ञानकल्लोळू तुष्टला ॥५९॥

यालागीं उद्धवाचें नांव घेतां । श्रीकृष्ण निवारी भवव्यथा ।

ऐसी भक्तप्रीती भगवंता । भक्तातें स्मरतां हरि तारी ॥२६०॥

मुक्ताचीं लक्षणें निर्धारितां । लाभे आपुली निजमुक्तता ।

एकाजनार्दनु विनवी संतां । मुक्तकथा हरि बोले ॥६१॥

कृष्णु उद्धवासी म्हणे मी तुज । सांगेन आपुलें निजगुज ।

मुक्तलक्षणाचें भोज । नवल चोज परियेसीं ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP