मदर्थे धर्मकामार्थान् आचरन् मदपाश्रयः ।
लभते निश्चलां भक्तिं मय्युद्धव सनातने ॥२४॥
माझे भक्त जे उत्तम । त्यांचा धर्म अर्थ मीचि काम ।
मजवेगळा मनोधर्म । अन्यथा कर्म करूं नेणे ॥४८॥
माझें भजन उत्तम कर्म । मज अर्पे तो शुद्ध धर्म ।
मजकामने हा शुद्धकाम । ज्याचा आराम मजमाजीं ॥४९॥
वेंचूनियां नाना अर्थ । संग्रहो करिती परमार्थ ।
नश्वर अर्थ जें वित्त । तें माझे भक्त न संचिती ॥७५०॥
ज्यांचें धनावरी चित्त । ते केवळ जाण अभक्त ।
ते जें जें कांही भजन करीत । तें द्रव्यार्थ नटनाट्य ॥५१॥
भक्तीमाजीं विरुद्धपण । विरुद्ध धर्माचें लक्षण ।
तेंही करीन निरूपण । सावधान अवधारीं ॥५२॥
मनसा वाचा कर्में जाण । जेथ नाहीं मदर्पण ।
तें तें दांभिक भजन । केवळ जाण उदरार्थ ॥५३॥
माझें भजन करूनि गौण । जो करूं रिघे धनार्जन ।
हें भजनविरुद्ध लक्षण । मुख्य जाण भक्ताचें ॥५४॥
गांठींचें वेंचूं नेणे धन । कोरडें करी माझें भजन ।
मजसी जेणें केलें वंचन । विरुद्धलक्षण मुख्यत्वें ॥५५॥
या नांव अर्थविरुद्धता । आतां दुष्टकामीं जो विचरता ।
मी भजतसें भगवंता । दोष सर्वथा मज न लगे ॥५६॥
ऐसऐसिया भावना । जो दृष्ट कामीं विचरे जाणा ।
हे भजनीं विरुद्धलक्षणा । भक्ता अभक्तपणा आणीत ॥५७॥
मज नार्पितां जें जें श्राद्ध । ते त्याची कल्पना विरुद्ध ।
श्राद्धसंकल्प अविरुद्ध । मदर्पणें वेद गर्जती ॥५८॥
श्राद्धीं मुख्य संकल्प जाण । पितरस्वरूपी जनार्दन ।
ऐसें असोनियां जाण । नैवेद्य मदर्पण न करिती ॥५९॥
अन्न ब्रह्म अहं ब्रह्म । हें श्राद्धीचें गुह्य वर्म ।
ऐसें नेणोनि शुद्ध कर्म । वृथा भ्रम वाढविती ॥७६०॥
मी सकळ जगाचा जनिता । मुख्य पितरांचाही मी पिता ।
त्या मज कर्म नार्पितां । विरुद्ध सर्वथा तें श्राद्ध ॥६१॥
मज नार्पितां जें जें करणें । तें तें उपजे अभक्तपणें ।
विरुद्ध धर्माचीं लक्षणें । दुःख दारुणें अनिवार ॥६२॥
उत्तम भक्तांचें लक्षण । संकल्पेंवीण जाण ।
अन्नपानादि मदर्पण । करिती खूण जाणती ॥६३॥
ध्रुवाच्यापरी अढळ । ते माझ्या ठायीं भजनशीळ ।
ते माझी भक्ति अचंचळ । अतिनिश्चळ पावती ॥६४॥
आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या तिघांसी जी नव्हेचि प्राप्ती ।
ते माझी जे चौथी भक्ती । प्रेमें पावती उद्धवा ॥६५॥
आर्त आर्तिहरणकाजें । जिज्ञासु जाणपणालागीं भजे ।
तिजेनि वांछिजे । अतिअर्थसिद्धी ॥६६॥
यावरी चौथियाचे ठायीं । या कल्पनांचा मागमोस नाहीं ।
यालागीं चौथी भक्ति पाहीं । त्याच्या ठायीं घर रिघे ॥६७॥
जया भक्तीमाजीं वाडेंकोडें । मीच मी चहूंकडे ।
जेथींच्या तेथें सांपडें । हें भजनें जोडे तयासी ॥६८॥
संकल्प केलियावीण । सहजें होतसे मदर्पण ।
हें चवथे भक्तीचें लक्षण । अतर्क्यभजन पैं माझे ॥६९॥
तेथ जें करणें तेचि पूजा । जें बोलणें तो जपू माझा ।
जें देखणें तें अधोक्षजा । दर्शन वोजा होतसे ॥७७०॥
तेथ चालणें ते यात्रा माझी । जें भक्षी तें मजचि यजी ।
त्याची निद्रा ते समाधि माझी । ऐसा मजमाजीं भजतसे ॥७१॥
यापरी अनायासें जाण । सहजें होतसे मदर्पण ।
हे चौथी भक्ति सनातन । उद्धवा संपूर्ण तो लाभे ॥७२॥
उद्धवा ऐसें मानिसी चित्तीं । जे मुळींहूनि चारी भक्ती ।
पहिली दुजी तिजी चौथी । मिथ्यावदंती कल्पना ॥७३॥
सहज माझी जे प्रकाशस्थिती । ते भक्ति बोलिजे भागवती ।
संविती बोलिजे वेदांतीं । शैवीं शक्ती बोलिजे ॥७४॥
बौद्ध जिनेश नेमिनाथ । जोगी म्हणती आदिनाथ ।
भैरव खंडेराव गाणपत्य । अव्यक्त म्हणत एक पै ॥७५॥
एक म्हणती हे आदिमाता । सौर म्हणती तो हा सविता ।
असो नांवांची बहु कथा । उपासकता विभागें ॥७६॥
ऐशी जे कां प्रकाशस्थिती । त्या नांव बोलिजे भक्ती ।
जेणें प्रकाशें त्रिजगतीं । उत्पत्ति स्थिति लय भासे ॥७७॥
माझ्या नाना अवतारमाळा । येणें प्रकाशें प्रकाशती सोज्ज्वळा ।
देवो देवी सकळा । येणें प्रकाशमेळां भासती ॥७८॥
माझ्या अवतारांची उत्पत्ती । तेणें प्रकाशें असे होती ।
नाना चरित्रें अंतीं । प्रवेशती ते प्रकाशीं ॥७९॥
ऐसिया प्रकाशाची जे प्राप्ती । ते जाण सनातन माझी भक्ती ।
उद्धवा म्यां हे तुजप्रती । यथानिगुती सांगीतली ॥७८०॥
निश्चळभक्ती सनातन । हें मुळींचें पदव्याख्यान ।
यालागीं भक्ति सनातन । समूळ जाण बोलिलों ॥८१॥
सांडूनि पदपदार्था । नाहीं बोलिलों जी वृथा ।
सावधान व्हावें श्रोतां । पुढील कथा अनुपम ॥८२॥
उद्धवा हे ऐसी माझी भक्ती । कैसेनि म्हणसी होये प्राप्ती ।
भावें धरिलिया सत्संगती । माझी भक्ती उद्बोधे ॥८३॥