मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक ४६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


धिष्ण्येष्वेष्विति मद्‌रूपं शङ्खचक्रगदाम्बुजैः ।

युक्तं चतुर्भुजं शान्तं ध्यायन्नर्चेत् समाहितः ॥४६॥

निर्गुणाहूनि सगुण न्यून । म्हणे तो केवळ मूर्ख जाण ।

सगुण निर्गुण दोनी समान । न्यून पूर्ण असेना ॥५८॥

विघुरलें तें तूप होये । थिजलें त्यापरी गोड आहे ।

निर्गुणापरिस सगुणीं पाहें । अतिलवलाहें स्वानंदू ॥५९॥

निर्गुणाचा बोध कठिण । मनबुद्धिवाचे अगम्य जाण ।

शास्त्रांसी न कळे उणखूण । वेदीं मौन धरियेलें ॥१४६०॥

वारा उमाणावा वावें । आकाश आकळावें खेंवें ।

भावना भांबावली धांवे । काय करावें स्फुरेना ॥६१॥

तैशी सगुण मूर्ति नव्हे जाण । सुलभ आणि सुलक्षण ।

देखतां जाय भूकतहान । निवताहे मन सप्रेमें ॥६२॥

जो नित्यसिद्धु सच्चिदानंदू । प्रकृतिपरू परमानंदू ।

सगुण जाला जी गोविंदू । स्वानंदकंदू स्वलीळा ॥६३॥

साखरेची गोडी वाखाणिली । तिची नाबद तेचि भेली केली ।

गोडिये अधिक शोभा आली । तैशी मर्ति झाली साकार ॥६४॥

लावूनियां कसवटी । उत्तम सुवर्णाची खोटी ।

बांधल्या नववधूच्या कंठीं । तेणें ते गोमटी दिसे काय ॥६५॥

त्याचींच करूनियां भूषणें । अंगीं प्रत्यंगीं लेवितां लेणें ।

नववधू अत्यंत शोभली तेणें । निंबलोण उतरिती ॥६६॥

तैसें जें निर्गुण निर्विकार । त्याची सगुणमूर्ति सुकुमार ।

चिन्मात्रैक अतिसुंदर । मनोहर स्वलीला ॥६७॥

घवघवित घनसांवळा । मुकुट कुंडलें मेखळा ।

कंठीं कौस्तुभ वनमाळा । सोनसळा झळकत ॥६८॥

आधींच तो अतिसांवळा । वरी टिळक रेखिला पिंवळा ।

आरक्तप्रांत दोहीं डोळां । कमळदळां लाजवी ॥६९॥

चिन्मात्रींचें देखणेपण । त्या डोळ्यां आलें शरण ।

सैराट हिंडतां शिणला पवन । हरीचें घ्राण ठाकिलें ॥१४७०॥

जैशा ओंकारामाजीं श्रुती । तैशा मुखामाजीं दंतपंक्ती ।

चौकीचे चारी झळकती । सच्चिद्दीप्तीं सोलींव ॥७१॥

जेवीं जीव शिव भिन्नपणीं । तेवीं अध ऊर्ध्व अधर दोन्ही ।

हरिअंगीं मिनले मिळणीं । समानपणीं समत्वें ॥७२॥

देखोनियां कृष्णवदन । चंद्रमा कृष्णपक्षीं क्षीण ।

तो तंव पूर्णिमेसी पूर्ण । हा सदा संपूर्ण वदनेंदू ॥७३॥

दिवसा चंद्राची क्षीण प्रभा । वदनेंदूची नवलशोभा ।

लोपोनि चंद्रसूर्यप्रभा । स्वयें स्वयंभा प्रकाश ॥७४॥

तो आर्तचकोरा अमृतपान । मुमुक्षुचातका स्वानंदघन ।

सगुणपणें नारायण । भूषणां भूषण तो झाला ॥७५॥

चहूं खाणींच्या क्रिया विविधा । तैशा चहू भुजींच्या चारी आयुधां ।

सगुण देखोनि गोविंदा । वेद निजबोधा आयुधें झाले ॥७६॥

देवो न कळे श्रुतींसी । लाज आली होती वेदांसी ।

जगीं मिरवावया प्रतापासी । आयुधें हरीपासीं ते झाले ॥७७॥

सामवेद झाला शंख । यजुर्वेद चक्र देख ।

अथर्वण गदा तिख । कमळ साजुक ऋग्वेदू ॥७८॥

साकारपणें सच्चिदानंदा । शंख चक्र पद्म गदा ।

चहूं करीं चहूं वेदां । निववी सदा निजांगें ॥७९॥

जगीं मिरवावया उपनिषदें । झालीं बाहुभूषणें अंगदें ।

करीं कंकणें अतिशुद्धें । सोहं शब्दें रुणझुणती ॥१४८०॥

नख केश अंगुलिका । कराग्रीं जडित मुद्रिका ।

त्रिकोण षट्कोणि या देखा । उपासकां विधिपीठ ॥८१॥

अगम्य तेज हृदयींच्या पदका । गुणत्रिवळी उदरीं देखा ।

मध्यें कळसू नेटका । क्षुद्रघंटिका मेखळे ॥८२॥

कांतीव मरकतस्तंभ जाण । तैसे शोभताती दोन्ही चरण ।

ते केवळ अचेतन । हे सचेतन हरिअंगीं ॥८३॥

ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा । दोन्ही पायीं पद्में देखा ।

यवांकित सामुद्रिका । अतिनेटका पदबंधू ॥८४॥

आरक्त रंग चरणतळां । वरील घनसांवळी कळा ।

नभीं इंद्रधनुष्यमेळा । तैसी लीळा हरिचरणीं ॥८५॥

सगुण देखोनियां जगन्नायका । दशदिशांसी चरणीं आवांका ।

पावावया निजसुखा । दशांगुलिका होऊनि ठेल्या ॥८६॥

चंद्र कृष्णपक्षीं क्षीण । तेणें ठाकिले हरिचरण ।

नखीं चंद्र जडोनियां जाण । परम पावन तो झाला ॥८७॥

हें जाणोनि त्रिनयनें । चंद्रमा मस्तकीं धरणें ।

पायवणी माथां वाहणें । जग उद्धरणें तेणें जळें ॥८८॥

सगुण देवो देखोनि पाहीं । चारी मुक्ति लागल्या पायीं ।

यालागीं संत चरणांच्या ठायीं । तत्पर पाहीं सर्वदा ॥८९॥

सलोकता समीपता । दोहीं पायीं वांकी गर्जतां ।

अंदू झाली स्वरूपता । सायुज्यता तोडरू ॥१४९०॥

ज्या तोडराचा धाक पाहीं । अहंगर्वित असुर वाहती देहीं ।

सर्व सुख तें हरीच्या ठायीं । त्याच्या पायीं समाधी ॥९१॥

धैर्य वीर्य उदारकीर्ती । गुणगांभीर्य शौर्य ख्याती ।

यांसी कारण माझी सगुण मूर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९२॥

माझे ये मूर्तीचेनि दर्शनें । होत डोळ्यां पारणें ।

जन्ममरणांचें उठवी धरणें । खत फाडणें विषयांचे ॥९३॥

माझी मूर्ति देखिल्यापाठीं । न लगे योगयाग आटाटी ।

न लगे रिघावें । गिरिकपाटीं । नाना संकटीं न पडावें ॥९४॥

न लगे आसन ध्यान । न लगे समाधिसाधन ।

माझिये प्राप्तीसी कारण । माझी भक्ति जाण उद्धवा ॥९५॥

एकादश पूजाअधिष्ठान । तेथें माझें करोनि आव्हान ।

म्यां सांगीतलें मूर्तीचें ध्यान । सावधान करावें ॥९६॥

माझें अर्चन माझें ध्यान । माझें करावें कीर्तन ।

माझ्या नामाचे स्मरण । माझे गुण वर्णावे ॥९७॥

अहर्निशीं माझी कथा । अहर्निशीं माझी वार्ता ।

अहर्निशीं मातें ध्यातां । भक्ति तत्त्वतां ती नांव ॥९८॥

दीपकळिका हातीं चढे । तैं घरभरी प्रकाशू सांपडे ।

माझी मूर्ती जैं ध्यानी जडे । तैं चैतन्य आतुडे अवघेंचि ॥९९॥

या उपपत्ति उद्धवा देख । सगुण निर्गुण दोन्ही एक ।

जाण पां निश्चयो निष्टंक । सच्चिदानंदसुख समत्वें ॥१५००॥

जो कसू सुवर्णाचिये खोटीं । तोचि वाला एका कसवटीं ।

सगुणनिर्गुणपरिपाटीं । नाहीं तुटी चित्सुखा ॥१॥

तेवीं सगुण निर्गुण निःशेष । जाण निश्चयें दोन्ही एक ।

सगळें साखरेचें टेंक । ना नवटांक सम गोडी ॥२॥

हें अंतरंग माझें ध्यान । तेथें मन करोनि सावधान ।

अतिहर्षें मदर्चन । मद्‍भक्तीं जाण करावें ॥३॥

उद्धवा ऐसें म्हणसी मनीं । हे भक्ति पाविजे कैसेनि ।

हें साध्य होय जिंहीं साधनीं । तें तुजलागोनी सांगेन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP