ज्ञात्वाज्ञात्वाथ ये वै मां यावान् यश्चास्मि यादृशः ।
भजन्ति अनन्यभावेन ते मे भक्ततमा मताः ॥३३॥
मी स्वस्वरूपी सच्चिदानंद । जगदांदि आनंदकंद ।
नित्य सिद्ध परम शुद्ध । माझें स्वरूप विशद जाणती ॥२८॥
देश काळ वर्तमान । सर्वीं सर्वदा अनवच्छित्र ।
सर्वात्मा सच्चिदानंदघन । भेदशून्य मी एक ॥२९॥
सत्य ज्ञान अनंत । परब्रह्म मी निश्चित ।
ऐसें जाणूनि मज भजत । उत्तम भागवत ते जाण ॥११३०॥
शुद्ध झालिया स्वरूपप्राप्ती । म्हणशी भजन कैशा रीतीं ।
देवभक्त तेचि ते होती । मी होऊन भजती मजमाजीं ॥३१॥
वाम सव्य दोनी भाग । दों नांवीं एकचि अंग ।
तेवीं देवभक्तविभाग । मद्रूपीं साङ्ग भासती ॥३२॥
पाहें पां लोखंडाचा आरिसा । लोखंडेंचि घडिजे जैसा ।
लोखंडेंचि उजळे कैसा । स्वप्रकाशा निजतेजें ॥३३॥
दर्पण उजळलिया पाही । शशी सूर्य गगन मही ।
बिंबलीं धरी आपुल्या ठायीं । अप्रयासें पाहीं स्वलीला ॥३४॥
तैसें मी होऊनि माझे भक्त । अनन्यभावें मजचि भजत ।
तैं माझें ऐश्वर्य समस्त । प्रतिबिंबत तयांमाजीं ॥३५॥
हो का तरंगू जैसा सागरीं । त्यासी जळचि तळींवरी ।
तैसा माझा भक्त मजमाझारीं । सबाह्याभ्यंतरीं मद्रूप ॥३६॥
जैसा सुवर्णाचा नरहरी । सुवर्णहिरण्यकशिपूतें विदारी ।
सुवर्णप्रल्हाद पोटींसी धरी । तैशी परी मद्भजना ॥३७॥
तेथें सगुण आणि निर्गुण । उभय रूपें मीचि जाण ।
जैसें सुवर्ण आणि कंकण । तैसें अभिन्न जाण मद्रूपे ॥३८॥
तेथ जें जें दृश्य देखे दृष्टीं । तेथ मद्रूपे पडे मिठी ।
दृश्य द्रष्टा लोपूनि त्रिपुटी । उठाउठी मज मिळे ॥३९॥
ऐसें जाणोनियां मज भजत । ते जाण पां उत्तम भक्त ।
ऐसें नेणोनियां मज भजत । भोळे भक्त ते माझे ॥११४०॥
नाहीं श्रुतीचें पठण । नाहीं वेदांतशास्त्रश्रवण ।
नाहीं विकल्पलक्षण । अनन्य जाण भावार्थीं ॥४१॥
सगुण निर्गुण नेणे काहीं । परी देवो आहे म्हणे हृदयीं ।
जडत्व असे देहाच्या ठायीं । तें देवो पाहीं वागवीत ॥४२॥
यालागीं देहाचें जें चळण । तें हृदयस्थ करवी नारायण ।
दृष्टीचें जें देखणेपण । त्याचेनि जाण होतसे ॥४३॥
काढूनि आपुला डोळा । दूरी ठेविला वेगळा ।
तो हृदयस्थेंवीण आंधळा । देखणी कळा देवाची ॥४४॥
रसना केवळ चामडी । ते काय जाणे रसगोडी ।
कापूनि टाकिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४५॥
रसनाद्वारें रसस्वादू । घेता हृदयस्थ परमानंदू ।
बुद्धीसी करिता उद्बोधू । सत्य गोविंदू हृदयींचा ॥४६॥
मनाचें गमनागमन । दिसे हृदयस्थाआधीन ।
यालागीं दूरी जावोनि परते मन । हृदयासी जाण येतसे ॥४७॥
इंद्रियें प्रेरिता वारिता । हे सत्ता आधीन हृदयस्था ।
यालागीं नांवें हृषीकेशता । त्यासचि तत्त्वतां म्हणताती ॥४८॥
एवं विचाराचा निर्वाहो । करितां निजहृदयीं असे देवो ।
तो पहावया बाहेरी धांवो । तैं मूर्ख पहा हो मी झालों ॥४९॥
तीर्थीं क्षेत्रीं भेटेल देवो । हा आपुले हृदयींचा भावो ।
निजभावेंवीण पहा हो । तीर्थीही देवो असेना ॥११५०॥
एवं देवो तो मजमाजीं आहे । त्याचेनि टवटवती इंद्रियें ।
क्रियाकर्म जें जें होये । तें त्याचेनि पाहें तत्त्वतां ॥५१॥
देह तंव बापुडें । केवळ अचेतन मडें ।
त्याचेनि कर्म नुपजे फुडें । हें तंव कुडें सर्वथा ॥५२॥
इंद्रियांचेनि चेतविता । कर्म क्रिया कर्तव्यता ।
देहाचेनि नोहे तत्त्वतां । मुख्यत्वें कर्ता हृदयस्थु ॥५३॥
यापरी जे कांहीं कर्तव्यता । ते भोळेपणें नेघे माथां ।
सर्व कर्मांचा आत्मा कर्ता । विश्वासें सर्वथा दृढ मानी ॥५४॥
मग अन्नपानादि सेवितां । मानी आत्मारामु भोक्ता ।
सर्वकर्मकर्तव्यता । अहं कर्ता हें म्हणों नेणे ॥५५॥
ऐसे भोळिवेचेनि समजें । माझें भजन निपजे वोजें ।
तें म्या आवडीं सेविजे । जाण तें माझें खाजुकें ॥५६॥
सर्वभावें सर्वथा । बाळकांसी जेवीं माता ।
तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मी सर्वथा सर्वस्वें ॥५७॥
धांवोनि मिठी घालावयासी । हितगुज आळोचासी ।
खाणें जेवणें विश्रांतीसी । जेवीं बाळकासी निजजननी ॥५८॥
तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मीचि जाण जिवलग माता ।
अर्थ स्वार्थ परमार्थता । जाण तत्त्वतां मी त्यांसी ॥५९॥
तोंडींचें पोटींचें गांठींचें । माता बाळकालागीं वेंचे ।
तेवीं भाविकांलागीं आमुचें । सर्वस्व साचें मी वेंची ॥११६०॥
बाळक न मागतां धांवोनी । कळवळोनि माता लावी स्तनीं ।
तेवी भोळ्या भक्तांलागुनी । मी अनुसंधानी लाविता ॥६१॥
ज्येष्ठ कनिष्ठ पुत्रातें पिता । एकचि जाण प्रतिपाळिता ।
ज्येष्ठातें निग्रहो करिता । लळे पुरविता बाळकांचे ॥६२॥
ज्येष्ठ वांकुडें बोलतां । तोंडावरी हाणे पिता ।
बाळक बोबडें बोलतां । संतोषे सर्वथा सर्वस्वें ॥६३॥
सज्ञानासी अबद्ध पडतां । दोष वाजती त्याचे माथां ।
भोळ्या भक्तांची अबद्ध कथा । तेणें देवो तत्त्वतां संतोषे ॥६४॥
कर्माकर्मप्रत्यवायता । हे सज्ञानासीच सर्वथा ।
भोळ्या भक्तांसी कर्मबाधकता । मी सर्वथा येऊं नेदीं ॥६५॥
भोजनीं बैसतां बापासी । दूरी बैसवी ज्येष्ठ पुत्रासी ।
अंकी वाऊनि बाळकासी । तृप्ति निजग्रासीं देतुसे ॥६६॥
तेथें जें जें गोड आपणासी । तें तें दे बाळकासी ।
न घेतां प्रार्थूनि त्यासी । तृप्तीच्या ग्रासीं जेववी ॥६७॥
तेवीं साधनीं शिणतां सज्ञानासी । प्राप्ती होय अतिप्रयासीं ।
माझिया भोळ्या भक्तांसी । मीचि अनायासीं उद्धरीं ॥६८॥
वाट चुकल्या भुयाळासी । फेरा पडे चालों जाणत्यासी ।
बाळक बापाचे कडियेसी । श्रमू तयासी येवों न शके ॥६९॥
तेवीं साधनी अंगविकळता । ते वाजे सज्ञानाचे माथां ।
भोळ्या भक्तातें मी उद्धरिता । प्रयास सर्वथा त्या नाहीं ॥११७०॥
त्यासी वाऊनि आपुल्या खांदीं । मी पाववीं सायुज्यसिद्धी ।
नवल त्याची भोळी बुद्धि । तेथही भजनविधी न सांडी ॥७१॥
हृदयीं कपटाचा थारा । तोचि भजनासी आडवारा ।
करितां युक्तिप्रयुक्ती विचारा । विचाराबाहिरा मी त्यासी ॥७२॥
नेणे आचाराविचारा । केवळ भावार्थी भोळा खरा ।
न धरत न सांवरत एकसरां । मजभीतरां तो पावे ॥७३॥
देखोन भोळिविया भक्तासी । मीचि सामोरा धांवें त्यासी ।
त्यापाशीं मी अहर्निशीं । भुललों भावासी सर्वथा ॥७४॥
केवळ जे भोळे भक्त । ते भगवंतासी आवडत ।
सांगतां कृष्ण मिटकिया देत । लाळ घोटीत उद्धवू ॥७५॥
मज भोळ्या भक्तांची आवडी । काय सांगों त्यांची गोडी ।
त्यावेगळी अर्धघडी । कोडी परवडी नावडती ॥७६॥
यापरीचे जे भोळे भक्त । ते मी मानीं उत्तम भागवत ।
त्यांच्या पायां मी लागें भगवंत । उत्तम निश्चित ते जाण ॥७७॥
त्यांलागीं मी आर्तभूत । त्यांलागीं सदा सावचित्त ।
त्यांलागीं मी दशदिशा धांवत । भोळा भक्त दुर्लभ ॥७८॥
उद्धवा काय सांगों गोठी । भोळा भक्त देखोनि दिठीं ।
मीही आपुलिये सवसाटी । उठाउठी घेतुसें ॥७९॥
येर्हवीं मोल करितां जाण । मजहूनि माझे भक्त गहन ।
यालागीं मी त्यांअधीन । भक्तवचन नुल्लंघीं ॥११८०॥
भोळ्या भक्तांचें वचन । माझेनि नुल्लंघवे जाण ।
देवकीवसुदेवाचीं आण । भावो प्रमाण भजनासी ॥८१॥
वृथा घृतेंवीण भोजन । वृथा वंध्येचें मैथुन ।
वृथा भावेंवीण भजन । सत्य जाण उद्धवा ॥८२॥
भावो तेथ भाग्य पहा हो । भावो तेथ मी निःसंदेहो ।
भावो तेथें प्रकटे देवो । निजस्वभावो स्वानंदें ॥८३॥
भावो तेथ विरक्ती । भावो तेथ प्रकटे शांती ।
भावो तेथ माझी भक्ती । उल्हासती निजबोधें ॥८४॥
एवं भाविकांमाजीं माझी भक्ति । मजसहित स्वानंदें नाचती ।
यालागीं भोळे जे भावार्थी । जे उत्तम होती भागवत ॥८५॥
नेणते भक्त जे मातें भजती । ते मज पावले या रीतीं ।
सांगीतली ते म्यां व्युत्पत्ती । आतां उत्तम भक्ती अवधारीं ॥८६॥