उद्धव उवाच -
सुदुस्तरामिमां मन्ये योगाचर्यामनात्मनः ।
यथाऽञ्जसा पुमान् सिध्येत्तन्मे ब्रह्मञ्जसाऽच्युत ? ॥१॥
पूर्वाध्यायीं ब्रह्मस्थिती । सांगितली ते दुर्गम गती ।
भोळ्या भाविकां अबळांप्रती । हे ब्रह्मप्राप्ती साधेना ॥३२॥
वस्तु व्यक्त ना अव्यक्त । शेखीं प्रकट ना नव्हे गुप्त ।
न कळे मूर्त कीं अमूर्त । केवीं साधकां तेथ प्रवेशु ॥३३॥
जें स्थूल ना सूक्ष्म होये । जें आहे नाहीं हा शब्द न साहे ।
जेथ पाहतें पाहणें दोनी जाये । तें साधकां होये केवीं साध्य ॥३४॥
जें दिसें तें ब्रह्म म्हणावें । तंव ते माया रुपें नांवें ।
आतां नाहींचि म्हणोनि सांडावें । तेणेंही नाडावें साधकीं ॥३५॥
जें आकार ना नव्हे शून्य । जेथें न रिघे ध्येय ध्यान ।
ज्यासी लाजे ज्ञेय ज्ञान । ज्यातें साधन स्पर्शेना ॥३६॥
जें न चढे शब्दांचे हात । जें नातुडे मौना आंत ।
आंत बाहेर नाहीं जेथ । काय साधकीं तेथ धरावें ॥३७॥
नाहीं आंतबाहेर विचारा । तेथ काय धरावें निर्धारा ।
जेथ निर्धारुही पुरा । धरावया धीरा धीर नव्हे ॥३८॥
साधकीं स्थिर करावया मन । कांहीं न दिसे अवलंबन ।
तेथें अनात्मे अज्ञान जन । त्यांसी दुस्तर जाण हा योगु ॥३९॥
यापरी निजात्मप्राप्ती । कदा न चढे अबळांहातीं ।
मज तंव मानलें निश्चितीं । हे आत्मस्थिति दुस्तुरु ॥४०॥
ऐशिया ब्रह्मयाची प्राप्ती । अज्ञान अप्रयासें पावती ।
तैशी सुगम साधनस्थिती । सांग श्रीपती कृपाळुवा ॥४१॥
तुवां निजधामा प्रयाण । मांडिलेसें अति त्वरेन ।
एथ तरावया अज्ञान । सुगम साधन सांगिजे ॥४२॥
म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण ।
तुज गेलिया, अज्ञान जन । तरावया साधन सुगम सांगें ॥४३॥
पव्हणियापरिस पाय उतारा । स्त्रियां बाळां अतिसोपारा ।
तैशिया उपायप्रकारा । शार्ङगधरा सांगिजे ॥४४॥
तुझ्या ठायीं सद्भाव पूर्ण । आणि नेणती शब्दज्ञान ।
ऐसे जे अज्ञान जन । त्यासी तरावया साधन सुगम सांगें ॥४५॥
मनोनिग्रहो अतिकठिण । साधकां नेमवेना संपूर्ण ।
तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥४६॥