अथात आनन्ददुघं पदाम्बुजं, हंसाः श्रयेरन्नरविन्दलोचन ।
सुखं नु विश्वेश्वर योगकर्मभिस्त्वन्माययाऽमी विहता न मानिनः ॥३॥
कमलापति कमलवदना । कमलालया कमलनयना ।
नाभिकमळीं कमलासना। तुवां ब्रह्मज्ञाना अर्पिलें ॥६२॥
त्या तुझ्या चरणींचें चरणामृत । तुझ्या कृपा ज्यास होयप्राप्त ।
मनोजय त्याचा अंकित । तो होय विरक्त भवभावा ॥६३॥
तुझ्या चरणामृताची गोडी । मनोजयातें तत्काळ जोडी ।
आधिव्याधि भवपाश तोडी । स्वानंदकोडी साधकां ॥६४॥
सकळ साधनांचें निजसार । सांख्ययोगविवेक सधर ।
त्या साराचेंही निजसार । तुझी भक्ति साचार श्रीकृष्णा ॥६५॥
जाणोनि भक्तीचें रहस्य । भजनप्रेमा लोभलें मानस ।
तेंचि विज्ञान राजहंस । भजनसारांश सेविती ॥६६॥
काया वाचा आणि मन । सद्भावें सदा संपन्न ।
ऐशिया भक्तां तुझे चरण। स्वानंदें पूर्ण दुभती ॥६७॥
धर्म अर्थकाममोक्षांसी । साङग साधनें सिद्धी त्यांसी ।
विकळ जाहलिया साधनांसी । ये साधकांसी अपावो ॥६८॥
तैशी तंव तुझी भक्ति नव्हे । तुज भजतां जीवें भावें ।
भजकां विघ्न कदा न पावे । शेखीं भक्त नागवे विघ्नासी ॥६९॥
जैं सूर्य आणि खद्योतासी । भेटी होय सावकाशीं ।
तरी विघ्नें भक्तांपाशीं । धीरु यावयासी न धरिती ॥७०॥
पडतां पंचाननाची घाणी । होय मदगजा भंगणी ।
तेवीं तुझ्या भावार्थभजनीं । होय धूळपाणी विघ्नांची ॥७१॥
येणेंचि निश्चयें निजसंपन्न । तुझ्या चरणा अनन्यशरण ।
त्यांसी नातळे जन्ममरण । मा इतर विघ्न तें कैंचें ॥७२॥
येणें भावें जे अनन्यशरण । त्यांसी तुझे निजचरण ।
स्वानंदें सदा करिती पूर्ण । जेवीं कामधेनु जाण निजवत्सा ॥७३॥
भक्तिसरोवरीं निर्मळ । नवविध रसें रसिक जळ ।
तेथ तुझे चरणकमळ । विकासत केवळ भावार्थसूर्यें ॥७४॥
तेथ स्वानुभविक भ्रमर । झेंपावोनियां अरुवार ।
कुचंबों नेदितां केसर । आमोदसुखसार सेविती ॥७५॥
तेथ विवेक-परमहंस । ते सरोवरींचे राजहंस ।
चरणकमळीं करुनि वास । आमोद सुरस सेविती ॥७६॥
हो कां आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हेही ते सरोवरीं असती ।
परी कमळामोद नेणती । ते क्रीडती कमळातळीं ॥७७॥
ऐसिया भोळ्या भक्तांसी । तूं तारिसी हृषीकेशी ।
एवं जे जे लागले भक्तीसी । अपावो त्यांसी असेना ॥७८॥
भावें करितां तुझें भजन । तूं भावार्थें होशी प्रसन्न ।
तुझ्या प्रसन्नता तुझे चरण । स्वानंद पूर्ण वर्षती ॥७९॥
तूं विश्वमूर्ती विश्वेश्वरु । तूं ब्रह्मादिकांचा ईश्वरु ।
तुझा जाहलिया अभय करु । भक्तां भवभारु स्पर्शेना ॥८०॥
तुझी भक्ति तें त्यांचें सत्कर्म । तुझा भाव तो त्यांचा स्वधर्म ।
तुज नैवेद्य अर्पणें उत्तम । तोचि याग परम भक्तांचा ॥८१॥
नित्य स्मरणें तुझें नाम । हाचि भक्तांचा जपसंभ्रम ।
तुझें कीर्तन मनोरम । ते समाधि परम भक्तांची ॥८२॥
एवं भक्त करिती जें जें कर्म । तें तें तूं होसी पुरुषोत्तम ।
ज्यासी तूं तुष्टसी मेघश्याम । त्यासी भवभ्रम स्पर्शेना ॥८३॥
यापरी भजनमुखें । भक्त तारिसी निजात्मसुखें ।
तेणें सुखाचेनि हरिखें । अतिसंतोखें डुल्लसी ॥८४॥
एवं अनपेक्षित भक्तजन । तूं निजसुखें करिसी पूर्ण ।
तुज न रिघती जे शरण । ते मायेनें जाण मोहिले ॥८५॥
जे तुझ्या चरणांसी विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख ।
चढतेंवाढतें भोगिती दुःख । मायेनें मूर्ख ते केले ॥८६॥
त्यजूनि तुझें चरणध्यान । करितां योगयागक्रिया साधन ।
तें तें साधकां होय बंधन । खवळे अभिमान ज्ञातृत्वें ॥८७॥
(पूर्वश्लोकीचा चरण) ’त्वन्माययाऽमी विहता न मानिनः’
हाचि श्लोकींचा अंतींचा चरण । उपक्रमोनियां आपण ।
पंडितांचा ज्ञानाभिमान । अभक्तपण प्रकाशी ॥८८॥
आम्ही ज्ञाते आम्ही योगी । आम्ही प्रवर्तक कर्ममार्गीं ।
आम्ही श्रोत्रिय पवित्र जगीं । आमुची मागी अतिशुद्ध ॥८९॥
लोक केवळ अज्ञान । तैसे आम्ही नव्हों आपण ।
आमचें वचन प्रमाण । सर्वार्थी जाण सर्वांशीं ॥९०॥
आम्ही ज्ञाते हें मानूनि दृढ । ज्ञानाभिमानें केले मूढ ।
पांडित्यें होऊनि गर्वारुढ । दुःख दुर्वाड भोगिती ॥९१॥
अभिमानाऐसा वैरी । आन नाहीं संसारीं ।
तो हा ज्ञानाभिमानेंकरीं । घाली दुस्तरीं सज्ञाना ॥९२॥
असो हे अभक्तांची कथा । जे चुकले भक्तिपंथा ।
यालागीं नानापरींच्या व्यथा । देहअहंता सोसिती ॥९३॥
जिंहीं भक्तीसी विकूनि चित्त । जाहले अनन्यशरणागत ।
त्यांसी तारिता तूं जगन्नाथ । निजसुखें निजभक्त नांदविसी ॥९४॥
तुझे जे कां भक्तजन । जिंहीं भक्तीसी विकला प्राण ।
त्यासी न मागतां ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥९५॥
तुझें करितां निजभजन । भक्तांसी कदा न बाधी विघ्न ।
सुखें होती सुखसंपन्न । हें नवल कोण गोविंदा ॥९६॥
जे तुज अनन्यशरण । तूं सर्वदा त्यांअधीन ।
तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥९७॥