मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक १४ वा

एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ब्राह्मणे पुल्कसे स्तेने, ब्रह्मण्येऽर्के स्फुलिङगके ।

अक्रूरे क्रूरके चैव, समदृक्पण्डितो मतः ॥१४॥

ज्यांचे वंदितां पदरज जाण । पवित्र होइजे आपण ।

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । ज्यांचा हृदयीं चरण हरि वाहे ॥९२॥

ऐसे अतिवंद्य जे ब्राह्मण । आणि चांडाळांमाजीं निंद्य हीन ।

तो ’पुल्कस’ द्विजवरांसमान । हरिरुपें जाण भक्त देखे ॥९३॥

सुवर्णविष्णु सुवर्णश्वान । एक पूज्य एक हीन ।

विकूं जातां मोल समान । वंद्यनिंद्य जाण आत्मत्वीं तैसें ॥९४॥

पुल्कस आणि ब्राह्मण । जातिभेदें विषमपण ।

आत्मदृष्टीं पाहतां जाण । दोघे समान चिद्रूपें ॥९५॥

जो बळेंचि ब्रह्मस्व चोरी । जो ब्राह्मणा अतिउपकारी ।

दोघे निजात्मनिर्धारीं । सद्रूपेंकरीं समसाम्य भक्तां ॥९६॥

जेवीं डावा उजवा दोनी हात । एक नरकीं एक पुण्यार्थ।

हा कर्माकर्म विपरीतार्थ । समान निश्चित ज्याचे त्यासी ॥९७॥

तेवीं सर्वस्वें ब्राह्मणांचा दाता । कां जो ब्राह्मणांचा अर्थहरिता ।

दोंहीसी कर्माची विषमता । निजात्मता समान ॥९८॥

सूर्य आणि खद्योत । तेजविशेषें भेद भासत ।

निजात्मतेजें पाहतां तेथ । समसाम्य होत दोहोंसी ॥९९॥

दावाग्नि आणि दिवा । भेद भासे तेजवैभवा ।

निजतेजें समानभावा । तेवीं तेजप्रभावा आत्मत्वें समान ॥३००॥

कर्पूराग्नि सोज्वळ कुंडीं । परी राईसंगें तो तडफडी ।

तेवीं सत्त्वतमपरवडी । शांति आणि गाढी क्रोधावस्था ॥१॥

एक सत्त्ववृत्ति अतिशांत । कां जो क्रूर तामस क्रोधयुक्त ।

गुणवैषम्यें भेद भासत । आत्मत्वें निश्चित समसाम्य भक्तां ॥२॥

एक आपत्काळीं सर्वसत्ता । होय एकाचा प्राणरक्षिता ।

एक प्राणदात्याच्या घाता । प्रवर्ते क्रूरता कृतघ्न जो ॥३॥

हे पुण्यपापविषमता जाण । ऐसेही ठायीं भक्त सज्ञान ।

वस्तु देखती समसमान । उभयतां जाण निजात्मबोधें ॥४॥

वृक्षासी जो प्रतिपाळी । कां जो घाव घाली मूळीं ।

दोघांही समान पुष्पीं फळीं । तेवीं आत्ममेळीं घातका घातीं ॥५॥

द्विजाचें सोंवळें धोत्र । कां मद्यपियाचें मलीन वस्त्र ।

सूत्रसृष्टी समान सूत्र । मशक सृष्टिकर आत्मत्वीं तैसे ॥६॥

मशक आणि सृष्टिकर्ता । भजनीं समान मद्भक्तां ।

हे चौथे भक्तीची अवस्था । अपावो सर्वथा रिघों न शके ॥७॥

जेथूनि रिघों पाहे अपावो । तेथेंचि देखती भगवद्भावो ।

तेव्हां अपाव तोचि उपावो । मद्भक्तां पहा हो मद्भजनीं ॥८॥

ईश्वर आणि पाषाण । भजनीं मद्भक्तां समान ।

हें भक्तीचें मुख्य लक्षण । ’चौथी भक्ति’ जाण या नांव ॥९॥

स्वकर्मधर्मवर्णाचार । करितांही निज व्यवहार ।

ज्यासी सर्वभूतीं मदाकार । तो भक्त साचार प्रिय माझा ॥३१०॥

ज्यासी सर्वभूतीं बुद्धि समान । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ।

तेंचि स्वानंदसमाधान । सत्य सज्ञान मानिती ॥११॥

असो सज्ञानाची कथा । ज्यासी सर्व भूतीं समता ।

तो मजही मानला तत्त्वतां । मोक्षही सर्वथा वंदी त्यातें ॥१२॥

सर्वांभूतीं आत्माराम । ऐसें कळलें ज्या निःसीम ।

तेचि भक्ति उत्तमोत्तम । ज्ञानियें परम मद्रूपें ॥१३॥

योग याग ज्ञान ध्यान । सकळ साधनांमाजीं जाण ।

मुख्यत्वें हेंचि साधन । तेंचि निरुपण हरि सांगे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP