मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ४४ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


मत्तोऽनुशिक्षितं यत्ते, विविक्तमनुभावयन् ।

मय्यावेशितवाक्‌चितो, मद्धर्मनिरतो भव ॥४४॥

या स्थितीं तुज असतां जाण । बहुसाल तुज येतील शरण ।

तूं पावलासि माझें ज्ञान । हें सर्वही जन जाणती ॥२७॥

पावोनियां ब्रह्मज्ञान । स्वयें उद्धरला आपण ।

न करीचि दीनोद्धारण । हें भेडपण ज्ञात्याचें ॥२८॥

एक पावोनि ब्रह्मज्ञान । शिष्य उपदेशी आपण ।

बोध न करवे परिपूर्ण । ते निष्ठा हीन निर्वीर्य ॥२९॥

शिष्य बोधेंवीण चरफडी । गुरु गुरुपणें बडबडी ।

घरींच्या घरीं चुकामुकी गाढी । हे बोधपरवडी अबद्ध ॥८३०॥

परचित्तप्रबोधकवृत्ती । हे सामान्य नव्हे स्थिती ।

ब्रह्मज्ञानाची पूर्ण निष्पत्ती । या नांव निश्चितीं उद्धवा ॥३१॥

स्वयें तरोनि जनां तारी । हे ज्ञानाची अगाध थोरी ।

ते म्यां दिधली तुझ्या करीं । जन उद्धरीं उद्धवा ॥३२॥

शिष्यसुक्षेत्रीं ब्रह्मज्ञान । ज्याचें नव्हे वर्धमान ।

तंववरी नाहीं पूर्णपण । उद्धवा जाण निश्चित ॥३३॥

जेवीं पिकलिया वृक्षाप्रती । पक्षी तुटले स्वयें येती ।

तेवीं निडारली ब्रह्मस्थिती । तेथ शिष्य पावती स्वानंद ॥३४॥

बोलें उपदेशिती ब्रह्मज्ञान । बोध नव्हे तें निर्वीर्य जाण ।

तें तूं म्हणसी कायसेन । ऐक सांगेन उद्धवा ॥३५॥

अनुभवा आलें ब्रह्मज्ञान । तेणें अंगीं ये जाणपण ।

तेथ संचरे ज्ञानाभिमान । तेणें वीर्य क्षीण ज्ञानाचें ॥३६॥

जंव जंव ज्ञाता निरहंकार । तंव तंव ज्ञानासी वीर्य थोर ।

त्याची होतां कृपामात्र । बोध साचार सच्छिष्यासी ॥३७॥

तुज फावलें माझें ज्ञान । उपदेशिसी शिष्यजन ।

ते तुज देतील सन्मान । तरी तूं ज्ञानाभिमान धरुं नको ॥३८॥

शिष्य देतील सन्मान । तो ’नेघे’ म्हणतां अपक्वपण ।

घेतां आला ज्ञानाभिमान । हेंही विघ्न ज्ञात्यासी ॥३९॥

शिष्य देतील सन्मान । तो अनुद्वेगें घ्यावा आपण ।

परी न धरावा ज्ञानाभिमान । हें मुख्य लक्षण ज्ञात्याचें ॥८४०॥

तुज माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती । तेचि एकांतीं लोकांतीं ।

नित्य निरभिमानस्थिती । स्वानंदस्फूर्ती सर्वदा ॥४१॥

तेचि निरभिमान स्थिती । उपदेशीं शिष्यांप्रती ।

निरभिमानापरती । दशा त्रिजगतीं असेना ॥४२॥

तेंचि उपदेशलक्षण । वाचेसी माझें नामकीर्तन ।

शरीरीं माझें नित्य भजन । मद्रूपीं मन निमग्न सदा ॥४३॥

ज्ञाता म्हणतां न धरी श्र्लाघ । मूर्ख म्हणतां न यावा राग ।

स्वयें रहावें अनुद्वेग । हे दशा चांग ज्ञात्याची ॥४४॥

एवं नित्य निरभिमान । भक्तियुक्त वैराग्य ज्ञान ।

स्वयें आचरोनि आपण । शिष्यसज्जन उपदेशिजे ॥४५॥

तुज जे शिष्य येती शरण । ते नीच न म्हणावे आपण ।

हें गुरुत्वाचें पूर्णपण । शिष्यही पूर्ण पूज्यत्वें देखें ॥४६॥

सद्गुरुसी सर्वां भूतीं । सर्वदा ब्रह्मप्रतीती ।

तेथ शिष्याचिये भूतव्यक्तीं । काय ब्रह्मस्थिती पळाली ॥४७॥

यालागीं शिष्यीं नीचपण । सर्वथा न देखावें आपण ।

शिष्य देखावा ब्रह्म पूर्ण । हें मुख्य लक्षण गुरुत्वाचें ॥४८॥

जेवीं तानयालागीं माता । तेवीं शिष्याचिया निजस्वार्था ।

गुरुसी कळवळा तत्त्वतां । शुद्ध ’सद्गुरुता’ या नांव ॥४९॥

शिष्यलक्षणप्रकार । मागां सांगितला विचार ।

तो जेथ देखसी अधिकार । तेथ साचार उपदेशीं ॥८५०॥

तुज जें शिकविलें प्रस्तुत । तें शिष्योपदेशसंग्रहार्थ ।

तूं ठायींचा गुणातीत । तुज हें समस्त स्पर्शेना ॥५१॥

अतिव्रज्य गतिस्तिस्त्रो, मामेष्यसि ततः परम् (॥४४॥)

यापरी ज्ञान उपदेशितां । तुझी न मोडे गुणातीतता ।

ज्यांसी उपदेशिसी तत्त्वतां । तेही त्रिगुणावस्था जिंकिती ॥५२॥

पूर्वोक्त उपदेशयुक्तीं । जे शिष्य सर्वदा वर्तती ।

ते त्रिगुणांची त्रिविध वृत्ती । अतिक्रमिती गुरुकृपां ॥५३॥

त्रिगुणांचें त्रिविधपण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।

जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । ज्ञेय ज्ञाता ज्ञान साक्षेपें ॥५४॥

कार्य कारण आणि कर्ता । भोज्य भोजन आणि भोक्ता ।

शत्रु मित्र उदासीनता । या त्रिगुणावस्था बाधक ॥५५॥

तेथ येणें उपदेशें जाण । सच्छिष्य करुनि माझें भजन ।

त्रिगुणत्रिपुटी निर्दळून । माझें स्वरुप पूर्ण स्वयें होती ॥५६॥

माझिया स्वरुपाप्रती । नाहीं गुण ना गुणवृत्ती ।

भक्त मद्भावें गुणातीतीं । सहज पावती स्वानंद ॥५७॥

ऐसा आज्ञापिला उद्धवो । त्याचे अवस्थेचा अभिप्रावो ।

परीक्षितीप्रती पहा हो । स्वयें शुकदेवो सांगत ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP