पृथक् सत्रेण वा मह्यं, पर्वयात्रामहोत्सवान् ।
कारयेद्गीतनृत्याद्यैर्महाराजविभूतिभिः ॥११॥
वार्षिकी यात्रा पर्वपूजा । भावें अर्पावी अधोक्षजा ।
छत्रचामरादि वोजा । गरुडध्वजांकित चिह्नीं ॥५८॥
ऐशिया महाराजविभूती । देवासी अर्पाव्या श्रद्धास्थितीं ।
भजनालागीं अहोरातीं । उल्हास चित्तीं अनिवार ॥५९॥
अश्वगजादिआरोहण । शेषशयन गरुडासन ।
महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ॥२६०॥
टाळ घोळ निशाण भेरी । शंख मृदंग मंगल तुरीं ।
नाद न समाय अंबरीं । जयजयकारीं गर्जावें ॥६१॥
तेथ गीतनृत्यपवाडे । कीर्तन करावें वाडेंकोडें ।
हुंबरीं आखरीं बागडें । देवापुढें करावें ॥६२॥
तोंड करुनि वांकुडें । वांकुली दावावी देवाकडे ।
वर्णावे देवाचे पवाडे । रंगापुढें गर्जत ॥६३॥
गोपाळकाल्याचा विन्यास । रासक्रीडेचा उल्हास ।
गोपाळवेषाचा विलास । मनोहर वेष दावावा ॥६४॥
दावावी मालखडयांची परी । झोंबी घ्यावी नानाकुसरी ।
दंडीं मुडपीं उरीं शिरीं । परस्परीं हाणत ॥६५॥
मल्लविद्येच्या आसुडीं । थडक हाणोनियां गाढी।
माळमर्दना परवडी । रंगीं गुढी उभवावी ॥६६॥
कुवलयापीड उन्मत्त । त्याचे उपटोनि गजदंत ।
गोपाळवेषें डुल्लत । रंगाआंत मिरवावें ॥६७॥
वानावी देवाची वाढीव । करावी देवाची भाटीव ।
ऐसे दावूनि हावभाव । महामहोत्सव करावा ॥६८॥
असल्या सामर्थ्यवैभव । स्वयें करावे सकळ उत्सव ।
ना तरी मिळोनियां सर्व । महामहोत्सव करावे ॥६९॥
ऐशिया अनन्य आवडीं । भजन करितां चढोवढी ।
माझिया भक्तीची लागली गोडी । जोडिलें जोडी हरिप्रेम ॥२७०॥
सप्रेम भक्ती करितां जाण ।तेणें मी भक्तांसी तुष्टमान ।
माझें अंतरंगभजन । मद्भक्त आपण स्वयें लाहे ॥७१॥
’अंतरंगभक्ति’ म्हणसी कोण । तें भक्तीचें निजलक्षण ।
उद्धवाप्रति श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥७२॥