मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक १५ वा

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नरेष्वभीक्षणं मद्भावं, पुंसो भावयतोऽचिरात् ।

स्पर्धाऽसूयातिरस्काराः, साहङकारा वियन्ति हि ॥१५॥

जो श्रोत्रिय सदाचार उत्तम । कां जो जातिस्वभावें अधम ।

कां अनाचारें अकर्म । येथें सद्भावें सम देखे जो वस्तु ॥१५॥

चराचरीं भगवद्भावो । देखणें हा शुद्ध स्वभावो ।

तरी नराच्याच ठायीं देवो । साक्षेपें पहा हो कृष्ण कां सांगे ॥१६॥

मनुष्यांच्या ठायीं जाण । प्रकट दिसती दोषगुण ।

तेथ साक्षेपें आपण । ब्रह्म परिपूर्ण पहावें ॥१७॥

चौर्‍यायशीं लक्ष योनी अपार । त्यांत त्र्यायशीं लक्ष नव्याण्णव सहस्त्र ।

नवशें नव्याण्णव योनी साचार । मुक्त निरंतर गुणदोषार्थी ॥१८॥

परी मनुष्ययोनीच्या ठायीं । दोष न देखे जो पाहीं ।

तोचि देहीं विदेही । अन्यथा नाहीं ये अर्थीं ॥१९॥

मनुष्यदेहीं ब्रह्मभावो । देखे तो सभाग्य पहा हो ।

चहूं मुक्तींचा तोचि रावो । जगीं निःसंदेहो तो एक ॥३२०॥

सर्व भूतीं भगवद्भजन । ऐसें ज्यासी अखंड साधन ।

त्या नराचा देहाभिमान । क्षणार्धें जाण स्वयें जाये ॥२१॥

जातां देहींचा अहंकार । निघे सहकुटुंब सपरिवार ।

स्पर्धा असूया तिरस्कार । येणेंसीं सत्वर समूळ निघे ॥२२॥

देहीं ममता तोचि ’अभिमान’ । आपल्या ज्ञानेंसीं समान ।

त्याचें निर्भर्त्सणें जें ज्ञान । ’स्पर्धा’ जाण या नांव ॥२३॥

आपणाहूनि अधिक ज्ञान । ऐसें जाणोनि आपण ।

त्याचे गुणीं दोषारोपण । करणें ते जाण ’असूया’ ॥२४॥

भाविक जे साधक जन । त्यांचें छळून सांडी साधन ।

धिक्कारुनि निर्भर्त्सी पूर्ण । ’तिरस्कार ’ जाण या नांव ॥२५॥

इत्यादि दोषसमुदावो । घेऊनि पळे अहंभावो ।

सर्वां भूतीं भगवद्भावो । देखतांच पहा हो तत्काळ ॥२६॥;

सर्व भूतीं समत्वें भजतां । हेंचि श्रेष्ठ साधन तत्त्वतां ।

येणें पूर्णब्रह्म लाभे हाता । हे साधे अवस्था नरदेहीं ॥२७॥

सांडावें ममतेचें काज । सांडावें योग्यतेचें भोज ।

सांडावी लौकिकाची लाज । ब्रह्मसायुज्य तैं लाभे ॥२८॥

सांडावी देहगर्वता । सांडावी सन्मान अहंता ।

सांडावी श्रेष्ठत्वपूज्यता । ब्रह्मसायुज्यता तैं लाभे ॥२९॥

तत्काळ होइजे ब्रह्म पूर्ण । या प्राप्तीचें सुगम साधन ।

कोणाही न करवे जाण । लोकेषणा दारुण जनासी ॥३३०॥

सांडावा वर्णाभिमान । स्वयें सांडूनि जाणपण ।

अणुरेणूंसीही लोटांगण । घालितां पूर्ण ब्रह्मप्राप्ती ॥३१॥

जो सांडी लोकेषणेची लाज । त्याचें तत्काळ होय काज ॥

तेचि विखींचें निजगुज । स्वयें अधोक्षज सांगत ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP