सर्वं ब्रह्मात्मकं तस्य, विद्ययाऽऽत्ममनीषया ।
परिपश्यन्नुपरमेत्, सर्वतो मुक्तसंशयः ॥१८॥
काया वाचा आणि चित्तें । सर्व भूतीं भजले मातें ।
त्यासी भगवद्रूप सर्व भूतें । सुनिश्चितें ठसावतीं ॥५८॥
तेव्हां मी एक एथें । भगवद्रूप पाहें सर्व भूतें ।
हेही वृत्ति हारपे तेथें । देखे सभोंवतें परब्रह्म ॥५९॥
परब्रह्म देखती वृत्ती । तेही विरे ब्रह्मा आंतौती ।
जेवीं घृतकणिका घृतीं । होय सुनिश्चितीं घृतरुप ॥३६०॥
तेव्हां ब्रह्मचि परिपूर्ण । हेही स्फूर्ति नुरे जाण ।
गिळूनियां मीतूंपण । ब्रह्मीं ब्रह्मपण अहेतुक ॥६१॥
तेथें हेतु मातु दृष्टांतु । खुंटला वेदेंसीं शास्त्रार्थु ।
हारपला देवभक्तु । अखंड वस्तु अद्वयत्वें ॥६२॥
गेलिया दोराचें सापपण । दोर दोररुपें परिपूर्ण ।
हो कां भासतांही सापपण । दोरीं दोरपन अनसुट ॥६३॥
तेवीं प्रपंच सकारण । गेलिया ब्रह्मचि परिपूर्ण ।
कां दिसतांही प्रपंचाचें भान । ब्रह्मीं ब्रह्मपण अनुच्छिष्ट ॥६४॥
याचिलागीं सर्व भूतीं । करितां माझी भगवद्भक्ती ।
एवढी साधकांसी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६५॥
तत्काळ पावावया ब्रह्म पूर्ण । सांडूनियां दोषगुण ।
सर्व भूतीं भगवद्भजन । हेंचि साधन मुख्यत्वें ॥६६॥
याही साधनावरतें । आणिक साधन नाहीं सरतें ।
हेंचि परम साधन येथें । मजही निश्चितें मानलें ॥६७॥