देशान्पुण्यान् संश्रयेत, मद्भक्तैः साधुभिः श्रितान् ।
देवासुरमनुष्येषु, मद्भक्ताचरितानि च ॥१०॥
देश पावन कुरुक्षेत्र । अयोध्या देश अतिपवित्र ।
गंगायमुनेचें उभयतीर । पवित्र अपार अर्बुदाचळ ॥२४०॥
कलापग्राम नंदिग्राम । पावन देश बदरिकाश्रम ।
पंचवटी श्रीरामाश्रम । पावन परम गौतमीतट ॥४१॥
जेथ लागले श्रीरामचरण । पावन देश दण्डकारण्य ।
मथुरा गोकुळ वृंदावन । परम पावन ब्रह्मगिरी ॥४२॥
पावन पांडुरंगक्षिती । जे कां दक्षिणद्वारावती ।
जेथ विराजे विठ्ठलमूर्ती । नामें गर्जती पंढरी ॥४३॥
निर्दळी सकळ पापासी । पंचक्रोशी जे कां काशी ।
पुण्य देश वाराणसी । साधकांसी अतिसाह्य ॥४४॥;
पुण्य सरिता जेथ वाहती । तेही साधकां पावन क्षिती ।
गंगा यमुना सरस्वती । साबरमती वैतरणी ॥४५॥
गंडकी नर्मदा तपती । गोदावरी भीमरथी ।
कृष्णा वेण्या तुंगा गोमती । पावन क्षिती श्रीशैल ॥४६॥
कावेरीचें उभय तीर । पवित्र क्षिती चिदंबर ।
सरिता प्रतीची पवित्र । जिचेनि जळें नर पावन ॥४७॥
कृतमाला पयस्विनी । अतिपवित्र ताम्रपर्णी ।
पवित्र क्षिती नैमिषारण्यीं । साधकांलागोनि सुसेव्य ॥४८॥;
असो हें पवित्रतेचें महिमान । पावना पावन आहे आन ।
जेथें वसले भक्त सज्जन । तो देश पावन सर्वार्थीं ॥४९॥
जे गांवीं वसती माझे भक्त । तत्संगें तो गांव पुनीत ।
जे देशीं वसले साधुसंत । तो देश पुनीत त्यांचेनी ॥२५०॥
भक्तांचा वारा लागे जिकडे । अतिपवित्रता होय तिकडे ।
ते सत्संगती ज्यांसी घडे । पवित्रता जोडे तयांसी ॥५१॥
चंदनाचे संगतीवरी । सुवास होती आरीबोरी ।
त्यांतें देवद्विज वंदिती शिरीं । तेवीं साधकां करी सत्संग ॥५२॥
जें केवळ काष्ठ कोरडें । संगें मोल पावलें गाढें ।
त्याची श्रीमंतां चाड पडे । मस्तकीं चढे हरिहरांच्या ॥५३॥
जैं निजभाग्याची संपत्ती । तैंचि जोडे संत्संगती ।
सत्संगें पावन होती । जाण निश्चितीं साधक ॥५४॥
माझे स्वरुपीं ज्यांचें चित्त । अखंड जडलें भजनयुक्त ।
त्यांसीच बोलिजे ’मद्भक्त’ । तेचि संत सज्जन ॥५५॥
माझे भक्तांचें आचरित । सुर नर असुर वंदित ।
साधकींही तेंचि एथ । स्वयें निश्चित साधावें ॥५६॥
श्रेष्ठ विनटले जे भक्तीसी । नारद प्रर्हाद अंबरीषी ।
तेचि भक्ति अहर्निशीं । साधकीं सद्भावेंसी साधावी ॥५७॥