मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक १३ वा

एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इति सर्वाणि भूतानि, मद्भावेन महाद्युते ।

सभाजयन्मन्यमानो, ज्ञानं केवलमाश्रितः ॥१३॥

उद्धवा तुझें भाग्य अमूप । तूं ज्ञाननिधि कैवल्यदीप ।

सर्व भूतीं माझें रुप । चित्स्वरुप सबाह्य ॥७९॥

यापरी गा सर्वभूतीं । माझ्या स्वरुपाची अनुस्यूती ।

लक्षोनि जो करी भक्ती । नानाव्यक्ती समभावें ॥२८०॥

भिन्न रुप भिन्न नाम । भिन्न स्थिति भिन्न कर्म ।

जग देखतांही विषम । मद्भक्ता सम मद्भावो ॥८१॥

भूतें देखतांही भिन्न । भिन्नत्वा न ये ज्याचें ज्ञान ।

मद्भावें भजे समान । त्यासी सुप्रसन्न भक्ति माझी ॥८२॥

ज्यासी प्रसन्न माझी भक्ति । त्याचा आज्ञाधारक मी श्रीपती ।

जो भगवद्भावें सर्व भूतीं । सुनिश्चितीं उपासक ॥८३॥

आशंका ॥ ’तुझी वेदाज्ञा तंव प्रमाण । अतिशयें पूज्य ब्राह्मण ।

उपेक्षावे असुरजन । चांडाळ जाण अतिनिंद्य ॥८४॥

कर्मभ्रष्ट जे जे लोक । त्यांचें पाहों नये मुख ।

हे वेदमर्यादा देख । तुवांचि निष्टंक नेमिली ॥८५॥

तेथ सर्व भूतीं समान । केवीं घडे भगवद्भजन’ ।

ऐसा विकल्प धरील मन । तरी ऐक महिमान भक्तीचें ॥८६॥

जंव अंधारासीं सबळ राती । तंवचि प्रतिष्ठा दीपस्थिती ।

तेथें उगवल्या गभस्ती । दीपाची दीप्ती असतांचि नाहीं ॥८७॥

तेवीं जंववरी दृढ अज्ञान । तंवचिवरी वेदाज्ञा प्रमाण ।

ज्यासी माझें अभेदभजन । तयासी वेद आपण स्वयें वंदी ॥८८॥

वेद बापुडा तो किती । ज्यासी माझी अभेदभक्ती ।

त्यासी मी वंदी श्रीपती । सदा वशवर्ती तयाचा ॥८९॥

अभेदभक्ति जेथ पुरी । मी नाटिकारु त्याचे घरीं ।

त्याचा संसार माझे शिरीं । योगक्षेम करीं मी त्याचा ॥२९०॥

अभेदभक्तीचें महिमान । तिच्या पायां लागे आत्मज्ञान ।

तेथ वंद्यनिंद्य समसमान । विषमींही जाण विकारेना ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP