मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
एः ! फारच बोबा !

दिवाकर - एः ! फारच बोबा !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... आमचे वासुदेवराव शेक्सपीअर किती उत्तम शिकवितात म्हणून सांगूं तुला ! त्यांतून अथेल्लो तर, फारच, फारच चांगलें सांगतात ! तिकडे काय पाहात आहेस रे ? अरे ती एक तरुण विधवा उगीच रडत आहे झालें ! तुला काय करायचें आहे तिच्या रडण्याशीं ? - हो, तुला एक असें विचारायचें आहे कीं, या नाटकांतल्या यागोच्या कॅरेक्टरविषयीं तुझें काय मत आहे रे ? - फारच बेमालूम साधली आहे म्हणतोस ? - छे: ! आपलें तर मत अगदीं साफ विरुद्ध आहे ! कसें म्हणून विचारशील, तर असें पाहा कीं, मनुष्याच्या दुष्ट स्वभावाला शेक्सपीअरनें वाजवीपेक्षां फाजील - अगदीं लाल भडक - असा रंग चढविला आहे झालें ! - नाहीं, तें कबूल आहे रे ! नाट्यसृष्टींत हें पात्र उत्तम - चांगलें उठावदार दिसत असेल, हें मलासुद्धां मान्य आहे ! पण तेंच आपल्या खर्‍या सृष्टींत दुष्टपणाचा पारा इतका वर चढेल कीं नाहीं याची मला तर बोवा शंकाच आहे ! इतका कठोरपणा माणसाच्या अंगीं असणें शक्य तरी आहे ? ए: ! फारच बोवा ! तूं कांहीं म्हण. निदान अशीं दुष्ट माणसें माझ्या तरी पाहण्यांत आजपर्यंत कधींही आली नाहींत, हें मात्र खास ! - स्सुक् ! ती पहा, ती पहा ! त्या खिडकींत उभी आहे ती ! - कां ? कशी सुंदर आहे ? आहे कीं नाहीं ? - हं, हं ! - तरी रडून रडून, हिच्या तोंडावरचा तजेला पुष्कळच कमी झाला आहे ! नाहींतर किती सुंदर ! - आहे, त्या धुरकटलेल्या घरामध्यें, माझें जाळें विणण्याचें काम चांगलेंच पार पडत आलें आहे ! एकदां संपण्याचा अवकाश, कीं ही येऊन त्याच्यांत अडकलीच म्हणून समज ! हः हः..... ''

२९ ऑक्टोबर १९११


References : N/A
Last Updated : September 13, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP