मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
वर्डसवर्थचें फुलपांखरुं

दिवाकर - वर्डसवर्थचें फुलपांखरुं

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... ओ ! स्प्लेंडिड ! ब्यूटिफुल ! - छे ! वर्डसवर्थची कविता म्हणजे काय ! - मौज आहे ! फारच सुंदर, फारच उत्कृष्ट ! या महाकवीचें अंतःकरण किती प्रेमळ - अगदी मेणासारखें आहे नाहीं ? आनंदामध्यें इकडून तिकडे धिरट्या घालणार्‍या सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला, किंचित् कोणी अडथळा केला, तर या कवीच्या हदयाला लागलीच चटका बसून, अश्रूंनी डबडबलेले नेत्र त्याच्या कवितेंत ठिकठिकाणी कसे स्पष्ट दिसतात ! - हीच पहा की ' फूलपाखरुं ' ही कविता - किती बहारीची आहे ! ही एकच काय, वर्डसवर्थच्या सर्वच कविता गोड, मधुर, रसानें भरलेल्या आहेत ! - म्हणे माझी बहिण एमिलाईन आमच्या बागेंत बागडणार्‍या फूलपाखराला - त्याच्या पंखावर बसलेली धूळ प्रेमानें हळूच पुसावयालासुद्धां बोट लावीत नसे ! कां ? तर आपल्या नखाचा स्पर्श होऊन त्या बिचार्‍याचा नाजूक पंख कदाचित् दुखावेल - आणि त्याच्या आनंदाचा विरस होईल ! अहाहा ! वर्डसवर्थ कवीची सृष्टि, म्हणजे जिकडे तिकडे आनंद आहे ! धन्य तो कवि, आणी धन्य तो इंग्लंड देश ! खरोखर, अशा कवीच्या अघ्ययनानें खडक देखील मेण होऊन जाईल ! मग माणूस तर - अरे ! हें काय ? या पुस्तकांत हा ढेंकूण कोठून आला ? - हा थांब चोरा ! पळून जातोस काय ? अस्सा ! बरा सांपडलास ! आतां जा कसा पळून जातोस तो ! तरी म्हटलें सकाळी येवढें चावत काय होतें ! द्यावें याला खिडकीवाटें टाकून नाहीं ? - नको नाहीं तर, तसें नको ! कारण, हा पुनः घरांत येऊन चावेल ! चिरडून टाकूं ? इश ! हाताला उगीच घाण येईल अशानें ! मग ? - हां हां ! या दिव्यांतल्या चिमणीवाटें द्यावा आंत फेंकून ! म्हणजे चांगला भाजून मरेल ! पहा, पहा ! कसा चिकटून बसला आहे तो ! पडतो आहे का खालीं ? - स्स् ! हाय ! बोट जेवायची तयारी झाली ! - चला तर लवकर, - आपल्याला काय, जेवण झाल्यावर आणखी वर्डसवर्थ वाचूं !.... ''

१० जानेवारी १९१२


References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP