मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
यांतही नाहीं निदान - ?

दिवाकर - यांतही नाहीं निदान - ?

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... यंदा नाहीं म्हणजे मग कायमचेंच नाहीं ! कारण कांहीं जमण्यासारखें असलें, तर तें याच वर्षी. नाहीं तर .... हो, तें खरें ! नाहीं म्हणतों आहे कुठें मी ! मार्क कमी पडले आहेत, दोन तीन विषयांत नापास झालों आहें, सर्व कांही कबूल आहे. पण .... मी तरी काय बरं करणार ? गेल्या सबंध वर्षात कोण माझी ओढाताण आणि दुर्दुशा झाली म्हणून सांगूं ! - वडलांचा तर पत्ताच नाहीं ! - कोणास ठाऊक कुठें गेले आहेत ते ! रात्री एक दिवस घरांतून नाहींसे झाले - अहो छे ! कांही भांडण नाहीं अन् कांही नाहीं ! दैव ओढवलें इतकेंच ! - झालें ! वडलांच्या शोधांत कुठें आहोंत, न आहोंत तों एक दिवस सकाळी आपळी मेहुणा गेल्याची बातमी ! भोराहून इकडे पुण्याला येत होते, तों गाडीवानाला म्हणतात रस्ता नीट दिसला नाहीं, अन जी गाडी भलतीकडे उताराला लागली, ती उपडी होऊन, पार कोणीकडच्या कोणीकडे फेकली गेली ! गाडीवाला काय तो कसाबसा जिवंत निघाला, बाकी सगळीं माणसें.... माझा मेव्हणा, त्याचा एकुलता एक बरोबरीचा मुलगा, सर्व कांहीं निकाल ! बहीण इकडे आजारी म्हणून हवा पालटायला आलेली, कळतांच जी तिची वाचा बसली, तों अद्यापपर्यंत एक शब्द नाहीं ! विचारलेंच कोणी कांहीं, तर तोंडाकडे पहाते, आणि रडूं लागते धळधळां ! - आहे ! आई आहे घरांत ! पण ती तरी काय करते बिचारी ! धीर तरी तिनें कोठवर द्यायचा ? - बरं, वडलांच्या आणि मेव्हण्यांच्या या प्रसंगांतून आम्ही कुठें हातापाय हालवतों आहोंत तों .... महिना पंधरा दिवसांचीच गोष्ट ! काय बाबाला बुद्धि झाली कुणास ठाऊक ! बंधुराज आमचे सहज कोणाबरोबर तरी पोहायला म्हणून गेले, तेही.... तिकडे कायमचेच ! - घरांत मिळवता.... आधार असा तोच काय तो उरलेला ! पण तोही असा .... तेव्हां कशाची प्रिलिमिनरी, अन् कसला अभ्यास होतो नीट ! त्यांतूनही करायची तेवढी धडपड केली मी ! आणि याहीपुढें .... येवढें सांगतों मी आपल्याला कीं, जर मिळाला फॉर्म, तर तो .... वाया नाहीं जायचा ! कारण.... काय असेल तें असो ! सारखें मला आपलें वाटतें आहे येवढें खरें ! कीं सगळीकडून असें .... इथें नाहीं, तिथें नाहीं, चोहोंकडूनच जर असें अपयश, तर .... मी म्हणतों .... देव यांतही नाहीं निदान मला ? .... ''

२७ ऑक्टोबर १९३०


References : N/A
Last Updated : September 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP